Friday, January 18, 2013

Are we growing from inside?

मुबंइ सकाळ 18 जानेवारी 2013:  Good Morning - नविन वर्षाची सुरुवात काहीशी उद्दासीनच झाली –देशात सध्या काय चाललेल आहे हेच कळेनास झालंय. आपण कुठे चुकतो? कुठे कमी पडतो? आपण खरं आणि स्पष्ट बोलण्याचा, सत्याच्या पाठीशी उभं राहण्याचा, चांगलं काम करण्याचा कुठेतरी आत्मविश्वास हरवुन बसलोय का? आपण नकारात्मक होतोय का? आतुन कुठे तरी कमजोर होत आहोत का? ह्या प्रश्नावर मी आलो असताना कालच्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन झाला. “you have to grow from inside out” अस ते म्हणाल्याच वाचण्यात आलं. ज्या माणसाने साता समुद्रापलिकडे जाऊन जगातील स्त्री पुरुषांकडे बघण्याचा संपुर्ण दृष्टीकोन एका वाक्यात बदलला त्या माणसाचा आत्मविश्वास केवढा शिखरासारखा असेल! स्वामी विवेकांचे जीवन भरचे कार्य त्यांच्या ठिकाणी असलेल्या आत्मविशासाने झगमगताना दिसते. देशाच्या आजच्या परिस्थितीत जगत असलेले आपण आणि गेल्या दोन लेखात मी ‘सर्वोत्तमता’ म्हणजे नेमक काय ह्या विषयावर लिहीलेले लेख, मला वाटतं त्याचा एक महत्वपुर्ण भाग आहे ‘आत्मविश्वास’!

ज्या माणसाला चारचौघांपेक्षा वेगळं दिसायचं असतं त्याला आपल्या दिसण्याचा सतत विचार करावाच लागतो. त्याला स्वत:च्या दिसण्याबद्दल –दर्शनाबद्दल उदासीन राहून चालत नाही. मला वाटतं की, चांगलं वा वेगळं दिसण्यासाठी जो विचार करावा लागतो; ती विचार- प्रक्रिया प्रत्यक्ष चांगलं दिसण्यापेक्षा जास्त कठीण असते. हे म्हणणं आरपार खरंच आहे. आपल्या चटकन लक्षात येईल की ही गोष्ट फक्त ‘दिसण्या’पुरती नसून ती आपल्या सबंध ‘असण्या’शीच करकचून बांधलेली आहे. तशी ती असतेच असते..... म्हणुनच कदाचित स्वामी विवेकानंदानी म्हटलं असेल की “You have to grow from the inside out”! या विचाराचे बोट धरून आपण सर्वोत्तमकामासाठी लागणार्र्या आत्मविश्वासाची उकल करून बघूया......


‘आत्मविश्वास’ ही सफल आणि सुकर जीवनासाठी फार मोलाची गोष्ट आहे. एखाद्या माणसाकडे अनेक उत्तमोत्तम गुण आहेत, पण त्यांच्याठायी आत्मविश्वास नसेल तर त्या गुणांचा त्याना स्वत:ला आणि इतरांनाही उपयोग शून्य आहे. आत्मविश्वास ही बाहेरून मिळवायची गोष्ट नाही, ती आतून प्राप्त करायची अनमोल चीज आहे. आत्मविश्वास म्हणजे स्वत:चा स्वत:वरचा विश्वास! माझ्यामध्ये मला जाणवणारे आणि इतरांमध्ये सहसा न आढळणारे काही गुण आहेत याची मला होणारी जाणीव ही आत्मविश्वासाची पहिली खूण आहे. ज्याला स्वत:त डोकावता येत नाही, स्वत:ला ओळखता येत नाही, आपले गुण-अवगुण ज्याला कळलेलेच नसतात त्याला आत्मविश्वास म्हणजे काय हेच कळणार नाही.

आत्मविश्वासाची जोपासना करण्यासाठी विचारांची स्पष्टता, मनाचा अविचल निर्धार, काहीतरी मोलाचे करण्याची उमेद, कोणत्याही संकटात ठाम उभे राहण्याची क्षमता यांची अतीव गरज असते. ‘None can make you feel inferior without your consent’ असं एलनॉर रूझवेल्टचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे ‘ No one will listen to you until you listen to yourself ‘असंही एक वचन आहे. या वचनांचा अर्थ काय? त्यांचा रोख आहे तो माणसाच्या inner strengthवर म्हणजे आंतरिक शक्तीवर, त्याच्या मनोनिग्रहावर!

आपण स्वत:कडे कसं बघतो, आपल्यातील दोषांना कसं नाहीसं करतो किंवा त्यावर मात कशी करतो यावर आपल्या आत्मविश्वासाची जाती ठरणार असते. जागृत झालेला आत्मविश्वास आणि त्याच्या संगतीनं काहीतरी अपूर्व करण्याची चिवट इच्छा हीच कर्तृत्वाचे महान निशाण आहे! याचाच एक अर्थ असा की, मी मला प्रथम आहे तसे स्वीकारायला शिकलं पाहिजे, नंतर स्वत:त आवश्यक सुधारणा करत करत स्वत:ला सिद्ध केलं पाहिजे आणि त्यानंतर मनात योजलेलं पूर्णत्वाला नेण्याची अक्षय धडपड केली पाहिजे. ज्याच्या मनात आणि कार्यात आत्मविश्वास आहे त्याचे मन आणि कार्य कोणतीही बाह्य शक्ती रोखू शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य म्हणूनच मान्य झालेलं आहे.

आत्मविश्वासाची झगमगती ज्वाला ज्याच्या मनात उसळी घेतं असते त्याला सारा जीवनपथ ‘त्याचा’वाटतो. तो स्वतःला घडवत इतरांनाही घडवू लागतो. असा माणूस समाजाचं सर्वंकष नेतृत्व करू शकतोच पण तो शिक्षण, उद्योग, संस्कृती,व्यवसाय,साहित्य यापैकी कोणत्याही क्षेत्रात बिनीची कामगिरी खासच करेल! करूच शकतो! आज देशाला अशा आत्मविश्वासाची खरी गरज आहे.

nitinpotdar@yahoo.com

No comments: