Friday, January 4, 2013

सर्वोत्तमता हाच ध्यास, सर्वोत्तमता हाच धर्म...


MUMBAI 4th January, 2013
GOOD MORNING!  मित्रांनो आज पासुन दर शुक्रवारी मुंबई सकाळ, मुंबई Today  मधे एक लेख लिहिणार आहे.  आजचा पहिला लेख खाली देत आहे.......तुमची प्रतिक्रिया जरुर कळवा!

सर्वोत्तमता हाच ध्यास, सर्वोत्तमता हाच धर्म

2012 साल गेल आणि 2013 उजाडलं! मागील वर्षी घडलेल्या घटनांचा वेध घेताना, अनेक उतूंग आणि अत्तरिय माणसे आपल्याला सोडुन गेली हे प्रकर्षाने जाणवलं…

... आणि दुसर्र्याच क्षणी मनात विचार आला कि जगात अनेकांचे आयुष्य पाहात राहावे इतके सरळ रेषेतील असते. त्यांची जीवनरेषा कमालीची सरळ असते, पण ती चित्त ढवळत राहाणारी खचितच नसते, ती उत्तम अर्थाने मनाला अस्वस्थ करणारी तर नसतेच नसते; आणि मुख्य म्हणजे ती देते ते समाधान आयुष्याला पुरणारे तर कधीच असू शकणारे नसते....

थंडपणे जगण्यात खूप वर्षे जगण्याचे कृतक सुख आहे पण त्यात उफाळत जाणारी उत्तुंग उठणारी जीवनाची झिंग कुठे आहे ? माणूस जन्माला आला आहे तर तो जगत राहातोच. नुसते जगत राहाण्यासाठी फार तोशीस, किंवा डोंगराएवढे प्रयत्न खरोखरच करावे लागत नाहीत. ‘किती जगलो यापेक्षा कसे जगलो’ असा प्रश्न ज्यांना सतत पडत असतो ते जगण्यासाठी एक झिंग देणारे रसायन शोधत असतात. चौकटीबाहेर जगण्याचा एक वेडेपणा असला पाहिजे! स्वत:चा मार्ग स्वत:च निर्माण करण्याचा अट्टाहास नसेल तर कित्येकदा जगणे म्हणजे केवळ औपचारीकता होते! असे औपचारीक जीवनच कोट्यावधी लोक शेवटपर्यंत जगत असतात. ‘को अहम ?’ हा प्रश्न फार मोलाचा असला तरी तो जगणाऱ्या सर्वांनाच पडत-भेडसावत नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधणारे आणि जीवनाला हवा तसा अर्थपूर्ण आकार देऊ पाहाणारे खरोखरच फारच थोडे! ‘माझ्या जीवनाचा मीच निर्माता आहे’ ही जाणीव ज्याच्या मनात येते आणि स्वत:च्या जीवनाला आकार देण्याची धमक ज्याच्या मनोरुपी मनगटात असते तोच जीवन समृध्द, आणि अर्थपूर्ण करू शकतो.

गीतेमध्ये कर्माची इच्छा मनात असण्याला अनन्य महत्व दिलेले दिसते! खरं तर जगण् म्हणजे देखिल कर्म करण्यासारखेच आहे. पण ‘मी या जगात सर्वोत्तम आणि अनन्य निर्मिती करण्यासाठीच जन्माला आलो आहे’ असा विश्वास, अशी श्रद्धा आपल्यापैकी किती लोकांच्या मनात असते? माणसे जगण्यासाठी विलक्षण झगडतात, आयुष्यभर संघर्ष करतात, प्रसंगी प्राण पणाला लावतात हे कटु सत्य असलं तरी त्यांच्या हातून जी निर्मिती होते ती सर्वार्थाने श्रेष्ठ प्रतीचीच असते असे नाही. अनेकदा या निर्मितीला स्वार्थाचेच रंग चढलेले असतात. तसे होणे काहीसे स्वाभाविकही आहे; कारण कित्येवेळा निर्मितीचा उद्देश स्वत:चे सुख हेच असते. मात्र जी व्यक्ती अधिक व्यापक विचार करते-करू शकते ती व्यक्ती जे निर्माण करते ते विश्वाकडे, विश्वाच्या आनंदाकडे झेपावणारेच असते-असू शकते.....कारण अशा निर्मितीशील माणसाला ‘स्वत:च्या बाहेर’ पडून विश्वाच्या श्वासात आपला श्वास मिसळून गंधीत करण्याची अथांग लालसा असते...

‘जे करायचे ते सर्वोत्तम ,जे जगायचे ते सर्वोत्तम’ असा जीवनमंत्र क्षणोक्षणी आपल्या उराशी बाळगत जे जगू पाहातात ते ‘जगणे’ आहे त्याहून वरच्या स्तरावर नेण्याचा, ते अधिक अर्थपूर्णसे, अधिक तेजस्वी करण्याचा हरघडी प्रयत्न करत राहातात. अशी माणसे म्हणजे खरेतर ‘अत्तरीये’च असतात ! आपल्यापाशी असलेले अस्सल अत्तर दशदिशात वाटावे , भोवताल सुगंधाने भारून आणि बहरून टाकावा हीच त्यांची मनोमन इच्छा असते. ही माणसं कोणत्याही क्षेत्रातील असू शकतात... ते शिक्षण, व्यापार, मनोरंजन, विज्ञान, तंत्रविद्या, कला, समाज आणि संस्कृती यापैकी कोणत्याही विषयातील असू शकतील ! या व्यक्तींचा जीवनमंत्र सर्वोत्तमतेची निर्मिती हाच असेल...त्यांचा धर्म सर्वोत्तमता हा असेल! किमान यांच्या श्वासात आपला श्वास आपल्याला मिसळता येईल का?


प्रतिक्रिया कळवा

No comments: