Friday, January 11, 2013

आमीर खान सर्वोत्तम आहे का?


मुबंइ सकाळ 11 जानेवारी 2013:  Good Morning - सर्वोत्तमतेचा ध्यास असायला हवा असं मी माझ्या पहिल्याच लेखातुन लिहिलं; त्यावर माझ्या मित्राच्या कॉलेज कन्येनं मला गंभीर स्वरात प्रश्न केला की ‘Excellence’ - सर्वोत्तमता’, म्हणजे नेमक तुम्हाला काय अभिप्रेत आहे? थोडा पॉझ घेत मी म्हटंल excellence is not a skill, it’s an attitude!

सर्वोत्तमाचा ध्यास घेणं आणि सर्वोत्तमता हाच जीवनधर्म मानणं ही खरं तर एक खास ‘मानसिकता’ आहे. प्रत्येकाला आपण इतरांपेक्षा थोड हटके काही करावं, वेगळं असावं-वेगळं दिसावं असं वाटतं. असं तीव्रतेने वाटणं- वाटत राहाणं हे सर्वोत्तमतेच्या मानसिकतेचं बीज आहे असं म्हणता येईल. लगेच तिने मला पुढचा प्रश्न केला मग अमीर खान सर्वोत्तम आहे का?

मी म्हटंल - आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडे आपण जर नीट पाहिलं तरी आपल्याला काही माणसांच्या वागणुकीतला एक विशेष फरक चटकन लक्षात येतो तो म्हणजे इतरांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यासाठी चाललेली त्यांची सततची धडपड! अगदी सोप करुन सांगायच झाल्यास आपलं ‘असणं’इतरांच्या लक्षात आणायचं असेल तर आपण त्यांच्यापेक्षा अधिक काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी आगळंवेगळं केलं पाहिजे, आपल्याकडे कोणतीतरी विशेष गुणवत्ता असली पाहिजे ही जाणीव होणं ही सर्वोत्तमतेची वाटचाल करू पाहाणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पहिली अटच असते. ज्याला ही जाणीव होत नाही तो एका अर्थाने शून्यच!

ज्याला ही जाणीव होते, ती व्यक्ती स्वतःचा नव्या दृष्टीने शोध घेऊ लागते... जसं अमीर खान गेल्या काही वर्षात करतो आहे. आपले मन, आपले कल, आवडीनिवडी, आपले अग्रक्रम, स्वतःची सुख-कल्पना आणि इतरांविषयी आपल्या मनात खोलवर उमटणारे विचार या ‘आतल्या’ दुनियेचा अशी व्यक्ती शोध घेते, अधिक खोलवर विचारमंथन करू लागते... हा आत्मशोध आणि त्यामागोमाग मानसिक पातळीवर तीव्रतेने जाणवणारी कामाची तातडी सर्वोत्तमतेचा मार्ग ज्याला खुणावतो त्याची खूणच आहे. अशा माणसात एक Madness दिसतो, आणि मग एका ध्येयाची आणि अनेक शक्यतांची जणू नवी पहाटच उमलायला सुरुवात होते.

ज्याला सर्वोत्तम असं काही करायचं आहे त्याला ‘तसं काही करता येणं केवळ अशक्य आहे, अतिकठीण आहे किंवा ते निव्वळ स्वप्न आहे’ अशी जहरी टीका सुरुवातीच्या काळात तरी सोसावीच लागते. पण बर्र्याच वेळ अशा कर्महीनांची टीका फक्त दुर्लक्ष करण्याच्याच योग्यतेची असते. ज्याला सर्वोत्तम असं काही निर्माण करायचं असेल त्याला अगोदर स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल! यशासाठी अपयश म्हणजे काय हे कळणं सुद्दा फार महत्वाच आहे.

मनाची खंबीरता, अतुलनीय अशी कामावरची निष्ठा, शक्य आणि अशक्य यांचे स्वच्छ भान, उत्तम दर्जाची संकल्पनाशक्ती, अथक परिश्रमांची तयारी, आपण ज्या समाजाचा घटक आहोत त्या समाजाच्या मानसिकतेचे पूर्ण ज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ज्या काळात जगतो आहोत त्या काळाचे यथायोग्य वास्तव भान! हे गुण आणि प्रत्येक क्षणाचे विचारपूर्वक केलेले नियोजन माणसाला अपेक्षित यश किंबहुना त्या पेक्षाही जास्त यश नक्कीच मिळवून देऊ शकतात. अर्थात सर्वच गोष्टी सर्वकाळ योजनेनुसार, वेळापत्रक पाळून , सर्वांचे सहकार्य मिळून पार पडतील असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. पण अशा सर्व संकटांसाठी तयार असणं, त्यांचा धैर्याने सामना करणं, हातून निसटू पाहणारी संधी आणि संभाव्य यश मनाच्या निग्रहानं घट्ट धरून ठेवणं याचं महत्व थोर आहे...यातच खरी लढाऊ माणसाची कसोटी आहे!

मानवी मन हे सर्व विद्या, तंत्रशास्त्रे, नाना कला, तत्वज्ञाने, वस्तूविश्व यांचे गर्भालय आहे. सर्व विश्वच मानवी मनाला साद घालत असते आणि मन त्याला अखंड प्रतिसाद देत असते. निसर्ग आणि माणूस यांचे नाते देवघेवीचे, एकमेकांना समृद्ध करणारे असते....निसर्गाचं निर्मितीचं सामर्थ्य आणि माणसाचं सर्वोत्तमाची निर्मिती करण्याचं सामर्थ्य ही एकाच महाशक्तीची दोन प्रसन्न रूपं आहेत. प्रत्येक मन म्हणजे ब्रह्मांड (Universe) आहे आणि ब्रह्मांड अनंत आहे... सर्वोत्तमाचा ध्यास घेणं म्हणजे आनंदयात्रा आहे आणि अशी आनंदयात्रा अनंतच असायला हवी!

ज्याला जगावेगळं काही करायचं आहे , इतरांनी त्या त्या क्षेत्रात केलेल्या निर्मितीहून वेगळी गोष्ट निर्माण करायची आहे किंवा असलेल्या गोष्टींचा नव्या रीतीनं विकास साधायचा आहे तर त्याला विषय अनंत आहेत आणि संधीही अनंत आहेत. साधारणपणे सर्वसामान्यच नव्हे तर अनेक कर्तबगार माणसेही नवतेचा मार्ग टाळून रुळलेल्या, सवयीच्या वाटेनेच जाण्याचे पत्करतात. जीवनातले आव्हान टाळून जगत राहाण्यात खोटे सुख-समाधान असेलही, पण त्यात सर्वोत्तमता प्राप्त केल्यानंतर होणारा अपरिमित दिव्य आनंद कदापीही असू शकत नाही. आपण त्या दिव्य आणि भव्यही आनंदापासून का बरं दूर राहायचं ?

नितीन पोतदार
nitinpotdar@yahoo.com

No comments: