Friday, January 25, 2013

अनमोल रतन!

मुबंइ सकाळ 25 जानेवारी 2013: Good Morning -रविवरी मुंबईत संपन्न झालेल्या मॅरेथॉन मधील धावपटुंसारखे हल्ली आपण सगळे सतत धावतोय!  फक्त धावतोय!  प्रत्येकाचं आयुष्य एक रॅट रेस झाल्यासारखं वाटतयं.  लाखो धावणार्र्यात एक विजयी होतो!  आणि शर्यत बघणार्र्यांसाठी तो हीरो ठरतो!  शर्यत हरलेले सगळे, शर्यत पुर्ण केली या आनंदात असतात मात्र शर्यत जिंकणारा कित्येकवेळा त्याच्या वैयक्तीक कामगीरीवर समाधानी नसतो!  प्रचंड यशात सुध्दा तो आत्मपरिक्षणं करतो, तेंव्हा नकळतपणे तो स्वत:ला नव्याने घडवत असतो...एका नविन यशाकडे त्याचा प्रवास सुरु होतो...

मागच्या महिन्यात भारतातल्या बलाढ्या अशा टाटा ग्रुपचे चेअरमन श्री. रतन टाटा यांनी सुध्दा त्यांच्या  करिअरची रेस यशस्वीपणे संपवली!  ती किती आणि कशी यशस्वी  झाली याची चर्चा जवळपास प्रत्येका वृतपत्रांनी केली.  अशा परमोच्च यशाला पोहोचलेल्या श्री. रतन टाटा यांनी एका मुलाखतीत स्वतःच्या कारकीर्दीतील यशा पेक्षा अपयशाबद्दल, टाटा समुहातील त्रृटींबद्दल जाहीर चर्चा केली.   टाटा ग्रुप दैनिक कामकाजात आपण पूर्ण पारदर्शकता, पूर्ण आणि निखालस विश्वास आणि सर्वोत्तमता आणू शकण्यात अपयशी ठरलो अशी कबूली त्यांनी दिली.  इतक कठोर आत्मपरिक्षणं आणि तेही जाहिररित्या कुणी केल्याचं माझ्या ऐकिवात नाही.  मला वाटतं असं धाडस ज्यांची सर्वश्रेष्ठता, गुणात्मक सर्वोत्तमता आणि ऐतिहासिक मूल्यात्मकता बावन्नकशी आहे, आणि जगन्मान्यही  आहे त्याच व्यक्ती करू शकतात!

रतन टाटा, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर किंवा बाळासाहेब ठाकरे वा शरद पवार ... ही किंवा यांच्यासारखी महत्त्म माणसं आपल्याआसपास असतात,आपल्या जगण्यावर प्रभाव टाकत असतात. थोडा अधिक विचार केलात तर आपल्याला अस लक्षात येईल की, इथे उल्लेख केलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी वेळोवेळी कठोर आणि प्रामाणिक आत्मपरीक्षणं केलं, स्वत:  स्वत:ला आव्हान देत, नव्या दिशा शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न केला.  म्हणुनच आज त्यानां  त्यांच्या क्षेत्रात ‘रोल मॉडेल’म्हणून गेली अनेक वर्षं अनेकांकडून स्वीकारण्यात आलं आहे.   ही माणसं त्यांच्या कामामुळे अत्युच्च पदाला तर पोहोचली आहेतच पण त्यांचा लौकिक ‘Cult person’ म्हणून नक्की झाला आहे.  अशी माणसं आपले समधर्मीय  निर्माण करतात. आपल्या गुणांचा एक सशक्त वारसा आणि एक नवी दिशा घडवतात. या माणसांच्या कारकीर्दीकडे पहातच पुढच्या पिढ्या पुढे सरकत राहतात. आपापल्या क्षेत्राचा चेहरा ठरलेली अशी सर्वोत्तम माणसं हेच एका प्रकारे त्या क्षेत्राचं आणि समाजाचंही संचित असतं...अर्थात सर्वोत्तम झाली तरी ती अखेरीस माणसंच असतात हे लक्षात ठेवणं गरजेचं असतं,नाहीतर त्यांचे फक्त देव होतात!

भारतीय उद्योगांच्या विश्वात ‘टाटा’ या घराण्याचं योगदान अक्षरशः हिमालयाशी बरोबरी करणारं आहे. या घराण्याने उद्योग, कारखानदारी, अनेक राष्ट्रीय स्तरावरचे उद्योग-प्रकल्प यात आपला असीम ठसा तर निर्माण केलाच;  तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही कमालीची चतुरस्त्र कामगिरी करून दाखवली. ‘टाटा’ म्हणजे भारतीय उद्योगांची संकल्पनाभूमी, उद्योगांची प्रयोगशाळा, भारतीय ज्ञानाची सर्वोत्तमता हे जसं वादातीत सत्य;  तसंच  टाटा म्हणजेच गुणश्रेष्ठता, सर्वोत्तमता, अस्सल भारतीयत्व आणि परम विश्वासार्हता हेही काळाच्या कसोटीवर अनुभवाला आलेलं सत्यच आहे.
श्री. रतन टाटा हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे आणि ते कमालीचे प्रामाणिक आहेत.  जो स्वतःशी, स्वतःच्या कामाशी आणि आपल्या ‘आतल्या आवाजा’शी प्रामाणिक असतो मुख्य म्हणजे जो कठोर आत्मपरिक्षणं करु शकतो तोच आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगीरी करु शकतो.  म्हणुनच रतन टाटा अनमोल आहेत!

No comments: