Friday, February 22, 2013

आपण फक्त धावतोय का?

मुबंइ सकाळ 22 फेब्रुवारी 2013: Good Morning  काल रात्री एका मित्राचा फोन आला – आनंदात म्हणाला की “दोन दिवस भारत बंद मुळे मुंबईच्या रस्त्यावर नो ट्रॅफिक – बोरिवली ते नरीमन पॉईंट डॉट पंचेचाळीस मिनिटात सुसाट जाउ शकलो.  जाऊन येऊन तीन तास वाचले म्हणुन जास्त काम करु शकलो.   म्हणजे संपुर्ण भारत बंद असुनही जास्त काम झालयं!  खर तर मुंबईचा आत्मा आहे वेग.. इथं प्रत्येकाला काहीतरी मिळवायचयं आहे आणि तेही लवकर, अती वेगात मिळवायच आहे... कधी कधी वाटतं की आपण फक्त धावतोय का?

आजकाल सगळं फारच फास्ट म्हणजे वेगवान झाल्याची तक्रार जवळपास प्रत्येकजण करीत असतो.   माहिती आणि तंत्रज्ञानामुळे जग फारच जवळ आणि खुपच वेगवान झालेलं आहे.   कंप्युटरच्या एका क्लिक वर आपण जगाच्या दोन टोकाशी असलेल्या लाखो लोकांशी सहज जोडले जातो!  रोजच्या जगण्याला आलेला हा अभूतपूर्व वेग इतका जोरकस आहे की या वेगाचं नियंत्रण कसं करायचं आणि या वेगाशी आपल्या आयुष्याचा वेग कसा जुळवायचा याचीच चिंता प्रत्येकाच्या वर्तनातून सतत व्यक्त होतांना जाणवते.  वेगाचं गणित,  वेगाचं तर्कशास्त्र, वेगाचा स्वभाव सर्वांनाच कळलेला असतो असं नाही; तसा तो सर्वांनाच उमजण्याची शक्यता कमीच असते. कारण वेग ही माणसाची जन्मजात ओळख नाही.   ‘ससा आणि कासव’ च्या कथेत सांगितल्याप्रमाणे  ‘संथगती पण निश्चित विकास’ हेच भारतीय माणसाच्या जीवनाचं पूर्वापार सूत्र राहात आलेलं आहे....
प्रचंड वेग, अवाढव्यता, जीवघेणी स्पर्धा आणि जीवनातील यशाचं वेगावर आधारलेलं तर्कशास्त्र आज भारतातही लोकप्रिय झालं आहे ते गेल्या फक्त वीस वर्षात!  आजचा मंत्र वेगाचा-अतिवेगाचा आहे, आणि त्यात यशाचं एक अजब गणित आहे.  पण त्यात जीवावरचे धोकेही फार मोठे आहेत.  

Friday, February 15, 2013

नेतृत्व 2014!


मुबंइ सकाळ 15 फेब्रुवारी 2013: Good Morning  माझा एक नियम आहे, कुठल्याही विमान तळावर मी पुस्तकाच्या दुकानाला भेट देतो आणि एक तरी पुस्तक घेतोच घेतो.   काल दिल्ली विमानतळावर इंडियन एक्स्प्रेसचे संपादक शेखर गुप्तांच “रिफॉर्मस 2020” हे पुस्तक मिळालं.   पुस्तकांत गेल्या 20 वर्षातले व भविष्यातील 20 रिफॉर्मर्स आणि 20 रिफॉर्मस (सुधारणा), तसेच 20 उद्दोजक, ब्रॅण्ड्स, ट्रेण्ड्स आणि विझन ह्यावर मान्यवारांचे लेख त्यांनी दिले आहेत. गेल्या वीस वर्षाचा आणि पुढे येणार्र्या काळात विविध क्षेत्रात नेतृत्व कस होत आणि कस असणार आहे याचा धावता आढावा म्हटंल तरी चालेल. 
ह्याच  पार्श्वभुमीवर देशात एकामागोमाग एक घडलेल्या काही राजकीय घटनांचा केंद्रबिंदू तसं पाहता एकच होता असं म्हणायला हवं.  कारण या घटना आगामी काळातील राजकीय वास्तव काय असेल आणि ते कोणत्या दिशेने जाणार याचं सूचन करणाऱ्या ठसठशीत घटना आहेत.  राहूल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद स्वीकारलं ही पहिली घटना, तर नितीन गडकरींनी पक्षाचं अध्यक्षपद राजीनामा देऊन सोडलं ही दुसरी.  एकीकडे नरेंद्र मोदींना राष्टीय पातळीवर सक्रीय करणासाठीची काही मंडळींची उत्सुकता, तर दुसरीकडे  देशभरात कॉग्रेंसची बिघडलेली छ्बी सुधारण्यासाठी कंबर कसुन कामाला लागलेले अर्थमंत्री चिदंबरम.  इकडे शरद पवारांनी पक्षाच्या आगामी नेतृत्वातील बदलांबद्दल केलेलं सुतोवाच, तर नेतृत्वाचे नवीन गणित मांडू पाहत असलेले उध्दव  ठाकरे, आणि महाराष्ट्र काबीज करण्यासाठी बाहेर पडलेले राज ठाकरे!   उद्दोगक्षेत्रात रतन टाटा यांनी पदमुक्त होऊन सायरस मिस्त्री यांना नेता म्हणून केलेली घोषणा.

Friday, February 8, 2013

पाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...

मुबंइ सकाळ 8 फेब्रुवारी 2013: Good Morning - परवा अत्यंत लोकप्रिय कवी, गीतकार आणि लेखक असलेल्या श्री. मंगेश पाडगांवकर यांना भारत सरकारने   त्यांच्या साहित्यातील अत्यंत सकस योगदानाबद्दल पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित केला.  मला असं वाटतं की पाडगांवकरांचा हा वैयक्तिक सत्कार आणि त्यांच्या कार्याचा हा अनन्य गौरव व त्यांच्या प्रतिभेचा लोकगौरव आहे.  हा सत्कार आहे तो एका पारदर्शीपणाचा, लोकमनाशी घट्ट नाळ जोडण्याचा आणि त्याहूनही मोलाचं म्हणजे हा गौरव आहे तो त्यांच्या साहित्यातून साकार झालेल्या साधेपणाचा;  म्हणजेच एका simplicity चा!
आपण सर्वोत्तमतेचा शोध घेतो आहोत. या सर्वोत्तमतेची संकल्पना आणि तिचे नानाविध पैलू आपण जसजसे समजून घेण्याचा प्रयत्न करतो;  तसं हे प्रकरण एका क्षणाला फार सोपंही वाटतं आणि फार कठीणही वाटतं. शांतपणे स्वतःशी विचार करतांना सर्वश्रेष्ठतेचा, सर्वोत्तमाचा एक खास विशेष म्हणजे ‘साधेपणा’ हाच असतो हे मनाला चटकन पटून जातं.  जणू साधेपणा हा सर्वोत्तमतेचा अंगभूत गुणच आहे हे लक्षात येतं.  या गुणाच्या स्वाभाविक, सहज अंगीकारामुळे अत्यंत कठीण, गुंतागुंतीच्या गोष्टी किती सहज आणि सरळ वाटतात ते आपण मंगेश पाडगांवकरांच्या अनेकानेक कवितांतून प्रत्यक्ष अनुभवलेलं आहेच!  त्यामुळेच तर त्यांना लिज्जत पापडासाठी दर पावसाळ्यात गाणे द्यायलाही कधी संकोच वाटला नाही.  लोकांच्या रोजच्या बोलण्यातले शब्द ते कवितेत वापरायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची प्रेमावर लिहीलेली लोकप्रिय कविता - “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.”  ही कविता कविला आणि आपल्याला एकाच पातळीला आणते. दोघातला दुरावाच नाहीसा करते.Friday, February 1, 2013

बाळासाहेबांचा थेट संवाद ..

मुबंइ सकाळ 1 फेब्रुवारी 2013: Good Morning - गेल्या आठवढ्यात म्हणजे 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिली जन्मदिन होता...  जमलेल्या माझ्या तमाम बंधु आणि भगिनीनो... हे चार शब्द ऐकायला लाखो लोक चाळीस वर्ष का जमतं ह्याच उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करुया...  जगाच्या इतिहासात महान वक्ते अगदी पूर्वापार होत आले आहेत.  आम समुदायांशी संवाद साधणं, त्यांची मतं घडवणं आणि लाखोंच्या मनांवर गारुड करून त्यांना आपलं म्हणणं मान्य करायला लावणं ही एक अदभूत कला आहे.  जगाचा इतिहास अशा उतुंग-वक्तृत्व-सम्राटांनी सदोदित गाजता ठेवला आहे.   अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग, डॅनिअल वेब्स्टर, मुसोलिनी, हिटलर, फ्रॅक्लीन रूझवेल्ट आणि अर्थात विन्स्टन चर्चिल या सर्वोत्तम संवादकांनी वेळोवेळी इतिहासाला नवं वळण दिलं आहे.  आपल्याकडे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, असे महान वक्ते झाले.  यातल्या प्रत्येकानं भारतीय समाजाला  स्वतः बरोबर वैचारिक प्रवास करायला लावला आणि इतिहास घडवला. अमोघ वक्तृत्व हा या सर्वांचा खास विशेष!  विन्स्टन चर्चिल यांनी संवादाचं एक थोर शक्तीस्थळ सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ”We are masters of the unsaid words and slaves of the time” तर जगातील सर्वोत्तम संवादक असलेल्या श्रीकृष्णाने म्हटलं आहे की, “माझे शब्द तुझ्या भविष्यात डोकावणारे आहेत, ते ऐक आणि कर्म करायला सिध्द हो!”

23 जानेवारी - बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांच्या प्रिय शिवसैनिकांचे जथ्येच्या जथे मातोश्रीवर सकाळपासून दाखल होत.  ते सारे तासनतास साहेबांच्या केवळ दर्शनाची वाट पाहात; आणि एकदा का साहेब त्यांच्या खिडकीत येऊन उभे राहिले की अत्यंत प्रेमभरानं त्यांचा जयजयकार करत.  बाळासाहेब हीच त्या सैनिकांची ऊर्जा होती, चेतना होती आणि तेच जणू त्यांचे मायबाप होते..  ह्याच मुख्य कारणं म्हणजे तिथं जमलेल्या प्रत्येकाशी ते प्रेमाने संवाद साधु शकत होते!