Friday, February 15, 2013

नेतृत्व 2014!


मुबंइ सकाळ 15 फेब्रुवारी 2013: Good Morning  माझा एक नियम आहे, कुठल्याही विमान तळावर मी पुस्तकाच्या दुकानाला भेट देतो आणि एक तरी पुस्तक घेतोच घेतो.   काल दिल्ली विमानतळावर इंडियन एक्स्प्रेसचे संपादक शेखर गुप्तांच “रिफॉर्मस 2020” हे पुस्तक मिळालं.   पुस्तकांत गेल्या 20 वर्षातले व भविष्यातील 20 रिफॉर्मर्स आणि 20 रिफॉर्मस (सुधारणा), तसेच 20 उद्दोजक, ब्रॅण्ड्स, ट्रेण्ड्स आणि विझन ह्यावर मान्यवारांचे लेख त्यांनी दिले आहेत. गेल्या वीस वर्षाचा आणि पुढे येणार्र्या काळात विविध क्षेत्रात नेतृत्व कस होत आणि कस असणार आहे याचा धावता आढावा म्हटंल तरी चालेल. 
ह्याच  पार्श्वभुमीवर देशात एकामागोमाग एक घडलेल्या काही राजकीय घटनांचा केंद्रबिंदू तसं पाहता एकच होता असं म्हणायला हवं.  कारण या घटना आगामी काळातील राजकीय वास्तव काय असेल आणि ते कोणत्या दिशेने जाणार याचं सूचन करणाऱ्या ठसठशीत घटना आहेत.  राहूल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद स्वीकारलं ही पहिली घटना, तर नितीन गडकरींनी पक्षाचं अध्यक्षपद राजीनामा देऊन सोडलं ही दुसरी.  एकीकडे नरेंद्र मोदींना राष्टीय पातळीवर सक्रीय करणासाठीची काही मंडळींची उत्सुकता, तर दुसरीकडे  देशभरात कॉग्रेंसची बिघडलेली छ्बी सुधारण्यासाठी कंबर कसुन कामाला लागलेले अर्थमंत्री चिदंबरम.  इकडे शरद पवारांनी पक्षाच्या आगामी नेतृत्वातील बदलांबद्दल केलेलं सुतोवाच, तर नेतृत्वाचे नवीन गणित मांडू पाहत असलेले उध्दव  ठाकरे, आणि महाराष्ट्र काबीज करण्यासाठी बाहेर पडलेले राज ठाकरे!   उद्दोगक्षेत्रात रतन टाटा यांनी पदमुक्त होऊन सायरस मिस्त्री यांना नेता म्हणून केलेली घोषणा.

या सर्व घटनांचा रोख नीट लक्षात घेतला तर असं लक्षात येत की, यातून ‘नेतृत्व’ ही गोष्ट, हा अतिमोलाचा गुण कसाला लागतो आहे.  जे बदल घडत आहेत घडणार आहेत त्यात नेतृत्वाबद्दलच्या कल्पना,  त्यांचा दृष्टिकोन, नीतिमुल्ये, अपेक्षा यांचा अग्रक्रमाने विचार होतांना दिसतो आहे.   अर्थात ज्यांचा ‘लोकनायक किंवा ‘तारणहार’ म्हणून उदोउदो होतो आहे ते खरच तसे आहेत- असू शकतात का हे काळच ठरवणार आहे.   अत्युच्च जागी टिकून राहाण्यासाठी आणि ‘तारणहार सर्वोच्च नेता’ म्हणून प्रतिष्ठीत होण्यासाठी असंख्य उत्तमोत्तम गुणांचा फार मोठा संचय असणं गरजेच आहे.   नाक्यावरच्या मोठ्या बॅनर्सवरुन नेतेगिरी करणं सोपं आहे,  पण अनेक दशकं खर्र्या अर्थाने लोकनायक होणं  सर्वोत्तम नेता म्हणून टिकून राहाणे ही एक साधना आहे...  ते एक अग्निदिव्य आहे!   हे दिव्य पार पाडण्याची ज्याची इच्छा आहे त्याच्यापाशी अनेक उत्तमोत्तम गुण असावे लागतात. त्यातला एक गुण म्हणजे स्वतः स्वतःची परीक्षा करणं... यासाठी त्यान काही प्रश्नांची उत्तर प्रथम शोधायला हवी.  यातला पहिला प्रश्न म्हणजे ‘मी नेतृत्व करू शकतो’ यावर माझा स्वतःचा विश्वास आहे का, हा होय.  

सार्वकालीक विचार करू शकणारा द्र्ष्ठा,  नविनतेचा आग्रह धरुन बदलाला अनुकूल असलेला, कामाच आणि वेळेचं योग्य संयोजन करणारा आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे स्वतःशी आणि ठरवलेल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असलेला व सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणाराच या देशाच राजकारणं, उद्दोग, व्यवसाय, क्रिडा अशा कुठल्याही क्षेत्राच नेतृत्व करु शकेल.   संधी आहे म्हणून ‘मी नेतृत्व करतोय की खरोखरच त्यासाठी मी लायक आहे म्हणून मी नेतृत्व करतोय?’ याचंही उत्तर स्वतःशी प्रामाणिकपणे द्यावं लागेल.  माहिती आणि तंत्रज्ञाच्या युगात नेतृत्वाला प्रत्येक शब्दात आणि कृतीत पारदर्शता ठेवावी लागेल.  तसेच नेतृत्वासाठी लागणारं  मानसिक सामर्थ्य,  लोकसंग्रह, यशासाठी लागणारा संयम, संकटांशी संघर्ष करायला लागणारी निर्भयता आणि योग्य वेळी निर्दयतेने निर्णय घेण्याची क्षमता -  होय निर्णय घेण्याची क्षमता.   हे सारेच गुण सर्वोत्तम नेतृत्वासाठी अनिवार्य आहेत.. शेवटी 120 कोटींच्या देशाचे असंख्य जटिल प्रश्न आहेत अपेक्षा आहेत – म्हणुन लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवणार्र्या नेतृत्वाची आपल्याला नितांत गरज आहे, त्याही पेक्षा असे नेतृत्व तयार करणार्र्या लोकनायकाची जास्त गरज आहे...  सध्या 2014चे फक्त बॅनर्सच तयार आहे!   
nitinpotdar@yahoo.com

No comments: