Friday, February 1, 2013

बाळासाहेबांचा थेट संवाद ..

मुबंइ सकाळ 1 फेब्रुवारी 2013: Good Morning - गेल्या आठवढ्यात म्हणजे 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिली जन्मदिन होता...  जमलेल्या माझ्या तमाम बंधु आणि भगिनीनो... हे चार शब्द ऐकायला लाखो लोक चाळीस वर्ष का जमतं ह्याच उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करुया...  जगाच्या इतिहासात महान वक्ते अगदी पूर्वापार होत आले आहेत.  आम समुदायांशी संवाद साधणं, त्यांची मतं घडवणं आणि लाखोंच्या मनांवर गारुड करून त्यांना आपलं म्हणणं मान्य करायला लावणं ही एक अदभूत कला आहे.  जगाचा इतिहास अशा उतुंग-वक्तृत्व-सम्राटांनी सदोदित गाजता ठेवला आहे.   अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग, डॅनिअल वेब्स्टर, मुसोलिनी, हिटलर, फ्रॅक्लीन रूझवेल्ट आणि अर्थात विन्स्टन चर्चिल या सर्वोत्तम संवादकांनी वेळोवेळी इतिहासाला नवं वळण दिलं आहे.  आपल्याकडे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, असे महान वक्ते झाले.  यातल्या प्रत्येकानं भारतीय समाजाला  स्वतः बरोबर वैचारिक प्रवास करायला लावला आणि इतिहास घडवला. अमोघ वक्तृत्व हा या सर्वांचा खास विशेष!  विन्स्टन चर्चिल यांनी संवादाचं एक थोर शक्तीस्थळ सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ”We are masters of the unsaid words and slaves of the time” तर जगातील सर्वोत्तम संवादक असलेल्या श्रीकृष्णाने म्हटलं आहे की, “माझे शब्द तुझ्या भविष्यात डोकावणारे आहेत, ते ऐक आणि कर्म करायला सिध्द हो!”

23 जानेवारी - बाळासाहेबांच्या वाढदिवसाला त्यांच्या प्रिय शिवसैनिकांचे जथ्येच्या जथे मातोश्रीवर सकाळपासून दाखल होत.  ते सारे तासनतास साहेबांच्या केवळ दर्शनाची वाट पाहात; आणि एकदा का साहेब त्यांच्या खिडकीत येऊन उभे राहिले की अत्यंत प्रेमभरानं त्यांचा जयजयकार करत.  बाळासाहेब हीच त्या सैनिकांची ऊर्जा होती, चेतना होती आणि तेच जणू त्यांचे मायबाप होते..  ह्याच मुख्य कारणं म्हणजे तिथं जमलेल्या प्रत्येकाशी ते प्रेमाने संवाद साधु शकत होते! 
सर्वोत्तमतेच्या अनेकानेक कसोट्यांवर लीलया उतरणारं बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं असं म्हटलं जातं.  ते एक सर्वोत्तम व्यंगचित्रकार होते, सर्वोत्तम राजकारणी होते, सर्वोत्तम पक्षप्रमुख होते, सर्वोत्तम संघटक होते आणि सर्वोत्तम पोलादी रसायन होते असंही अनेक दाखले देत सांगितलं जातं.  मला बाळासाहेब कायम लक्षात राहतील ते एक सर्वोत्तम संवादक- communicater म्हणून!  मला वाटतं आपले विचार, आपल्या भावना, आपले आग्रह, अग्रक्रम थेटपणे आणि कोणत्याही नकली बुरख्याआड न लपवता ते समोरच्या माणसापर्यंत सहज पोहचवत असतं.  बाळासाहेबांनी ओरडुन भाषणं केल्याच मला आठवत नाही.  आवाज न चढवता ते बोलायचे;  शब्द धारदार असले तरी ते सहज आणि शांतपणे बोलायचे,  बोलताना स्पष्ट उच्चार तसेच एक आरपार खुलेपणा, एक बिनधास्तपणा होता.  त्या त्या प्रसंगी म्हणा वा त्या क्षणी म्हणा जे मनात आणि विचारांत असेल ते तसंच्यातसं ते समोर बसलेल्या एका माणसाशीही बोलतं आणि लाखोंच्या गर्दीशीही बोलत.  एक संवादक म्हणून त्यांचा अधिक एक गुण असा की, समोरचा माणूस ज्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वर्गातला असेल त्याच्याशी ते त्याला परिचित असलेल्या भाषेत सहज संवाद साधू शकायचे.  आपल्याला सहज आठवेल की बाळासाहेब अमिताभ बच्चन, लतादीदी, सचिन यांच्यापासून ते जावेद मियांदाद किंवा एखाद्या रॉक स्टारपर्यंत कोणाशीही मस्त संवाद साधत होते.  ते ज्या शैलीत सामान्य सैनिकाशी खुलेपणानं बोलत, तशीच थेट भाषा आणि खुलेपणा ते सन्मान्य व्यक्तींशी बोलतानाही वापरत.
साहेबांच्या दृष्टीने मोलाचे होते ते मनांतले समोरच्यांच्या  मनांत नेण्याला... ही गोष्ट त्यांना अगदी नैसर्गिकपणेच साधत होती.  समोरच्या माणसांचे जे क्षेत्र असेल त्याची समग्र माहिती वा समग्र ज्ञान त्यांच्या कडे होतेच असं नाही;  पण  त्यांना प्रत्येक क्षेत्रातील सर्व आवश्यक माहिती असायची.  ते उत्तम संवादक होते- होऊ शकले याचं मुख्य श्रेय जातं ते त्यांच्यामध्ये असलेल्या अपार उत्सुकतेला! ते स्व तः जातीवंत आणि श्रेष्ठ कलावंत होते.  त्यांना अक्षरशः सर्वच कलांमध्ये आतून ओढ होती.  बाळासाहेब  जीवनातल्या आणि भोवतीच्या सर्व गोष्टींमध्ये प्रचंड रस घेत असतं.  त्यांचं माणसांचं वाचन जसं चोख होतं तसं त्यांचं पुस्तकी वाचनही चोख होतं. जगाची बित्तंबातमी आणि समाजातल्या सर्वांच्या सर्व गोष्टींची मनात पक्की नोंद करणारं ते एक मोठ्ठ पुस्तकचं होतं, असं म्हणायला हवं..  तसे ते होते म्हणूनच समाजाच्या सर्व थरांत त्यांचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणात होता.  

मला वाटतं कुणाशीही चांगला संवद साधता येणं ही यशाची पहिली गुरुकिल्ली आहे.   जो सामान्यातल्या सामान्य माणसाशी प्रेमाने त्याच्या भाषेत जो बोलु शकतो, त्याच्याशी जो कनेक्ट  होवु शकतो तोच खरा लोकनायक!  बाळसाहेबांनी आपल्या संवादशक्तीनं माणसं अशी कांही जोडली की त्यांचे शिवसैनिक, प्रतिस्पर्धी, हितशत्रू, राजकीय वैरीही त्यांचे अखेरपावेतो मित्रच राहिले…  नाहीतरी संत रामदासांनी म्हटलंच आहे की, ‘संवादे तुटती वैरे, आधी संवाद साधिजे’!  

No comments: