Friday, February 22, 2013

आपण फक्त धावतोय का?

मुबंइ सकाळ 22 फेब्रुवारी 2013: Good Morning  काल रात्री एका मित्राचा फोन आला – आनंदात म्हणाला की “दोन दिवस भारत बंद मुळे मुंबईच्या रस्त्यावर नो ट्रॅफिक – बोरिवली ते नरीमन पॉईंट डॉट पंचेचाळीस मिनिटात सुसाट जाउ शकलो.  जाऊन येऊन तीन तास वाचले म्हणुन जास्त काम करु शकलो.   म्हणजे संपुर्ण भारत बंद असुनही जास्त काम झालयं!  खर तर मुंबईचा आत्मा आहे वेग.. इथं प्रत्येकाला काहीतरी मिळवायचयं आहे आणि तेही लवकर, अती वेगात मिळवायच आहे... कधी कधी वाटतं की आपण फक्त धावतोय का?

आजकाल सगळं फारच फास्ट म्हणजे वेगवान झाल्याची तक्रार जवळपास प्रत्येकजण करीत असतो.   माहिती आणि तंत्रज्ञानामुळे जग फारच जवळ आणि खुपच वेगवान झालेलं आहे.   कंप्युटरच्या एका क्लिक वर आपण जगाच्या दोन टोकाशी असलेल्या लाखो लोकांशी सहज जोडले जातो!  रोजच्या जगण्याला आलेला हा अभूतपूर्व वेग इतका जोरकस आहे की या वेगाचं नियंत्रण कसं करायचं आणि या वेगाशी आपल्या आयुष्याचा वेग कसा जुळवायचा याचीच चिंता प्रत्येकाच्या वर्तनातून सतत व्यक्त होतांना जाणवते.  वेगाचं गणित,  वेगाचं तर्कशास्त्र, वेगाचा स्वभाव सर्वांनाच कळलेला असतो असं नाही; तसा तो सर्वांनाच उमजण्याची शक्यता कमीच असते. कारण वेग ही माणसाची जन्मजात ओळख नाही.   ‘ससा आणि कासव’ च्या कथेत सांगितल्याप्रमाणे  ‘संथगती पण निश्चित विकास’ हेच भारतीय माणसाच्या जीवनाचं पूर्वापार सूत्र राहात आलेलं आहे....
प्रचंड वेग, अवाढव्यता, जीवघेणी स्पर्धा आणि जीवनातील यशाचं वेगावर आधारलेलं तर्कशास्त्र आज भारतातही लोकप्रिय झालं आहे ते गेल्या फक्त वीस वर्षात!  आजचा मंत्र वेगाचा-अतिवेगाचा आहे, आणि त्यात यशाचं एक अजब गणित आहे.  पण त्यात जीवावरचे धोकेही फार मोठे आहेत.  
या वेगाचा महामंत्र देणारी ‘फेरारी’ तर सर्वांनाच परिचित आहे. ‘ फेरारी फॉर्मुला वन’ ही शर्यत म्हणजे तर अफाट वेगाचं महाप्रतिक आहे. वेग आणि वेगाची नशा, वेग आणि पौरुष, वेग आणि सामर्थ्य, वेग आणि यश याबरोबर ‘वेग म्हणजेच सर्वोत्तमता’असा एक संदेश देणारी गोष्ट म्हणजे जणू ‘फेरारी!’
पण फेरारीच्या या वेगाचे जनक आणि आंतरराष्ट्रीय मोटार खेळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष Jean Todt हे परवा मुंबईत आले आणि त्यांनी या शहरातली वाहतूक पाहताच एक नवा सुरक्षामंत्र मुंबईकरांना दिला. त्यांनी एका बाईकवर बसलेली चार माणसं पाहिली (अर्थात डोक्यावर हेल्मेटची ‘अडगळ’नव्हतीच! ) आणि त्यांना या शहराचा स्वभाव लक्षात आला.   ते पाहून ते उदगारले की, ‘Life is not a race…slow down for life!’ असं विधान करून ते थांबले नाहीत तर त्यांनी असंही म्हटलं आहे की, ‘ज्या शहरात दरसाल पंचवीस हजाराहून अधिक माणसं रस्त्यांवरच्या अपघातात मरण पावतात ते शहर आणि त्या शहरातली वाहतूक यांनी वेग विसरण्याची गरज आहे... आयुष्य हे वेगापेक्षा अधिक मोलाचं आहे!’  त्यांच्या म्हणण्यात अर्थ आणि मुद्दा आहेच आहे. आपल्या देशात प्रतिवर्षी अपघातांत मरण पावणाऱ्याची संख्या काही लाखांच्या घरात आहे.  फेरारीच्या वेगाचा जनक वेगाला विरोध करतोय ह्याचा नेमका अर्थ आपण आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाच्या पातळीवर लक्षात घेतला पाहिजे.   प्रथम आपण हे मनाशी बिंबवलं पाहिजे की, वेग म्हणजे यश किंवा सर्वोत्तमता नसून वेगावर नियंत्रण ठेवण यात यशाच बीज सामावलेलं आहे.

आपण यशाला वेगाशी जोडण्यात काही चूक करतो आहोत का ह्याचा विचार प्रथम केला पाहिजे.  वेग म्हणजे सर्वस्व नव्हे आणि झटपट यश म्हणजे सर्वोत्तम ठरणे नव्हे हे आपल्याला समजलं पाहिजे.   सर्वोत्तमतेला वेगाची नाही तर चांगल्या विचाराची, मानसिक कणखरपणाची, वाहवत जाण्यापेक्षा खंबीर निर्णयांची आणि घेतलेल्या निर्णयांशी प्रामाणिक राहाण्याची गरज असते.   मोटार पैशाने विकत घेता येते पण मोटारीने दूरचा पल्ला गाठायचा असेल तर मनावर नियंत्रण हवे आणि रस्त्याच्या स्वरूपाचे यथायोग्य भान हवे.   ज्याला दूरचे आणि जवळचे यथायोग्य दिसत नाही किंवा ज्याचे मन साध्य विसरून भरकटते त्याचा अपघात अटळ असतो.   आपण असे अपघातप्रवण होणार आहोत का याचे उत्तर आजच शोधायला नको?
nitinpotdar@yahoo.com

No comments: