Friday, February 8, 2013

पाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...

मुबंइ सकाळ 8 फेब्रुवारी 2013: Good Morning - परवा अत्यंत लोकप्रिय कवी, गीतकार आणि लेखक असलेल्या श्री. मंगेश पाडगांवकर यांना भारत सरकारने   त्यांच्या साहित्यातील अत्यंत सकस योगदानाबद्दल पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित केला.  मला असं वाटतं की पाडगांवकरांचा हा वैयक्तिक सत्कार आणि त्यांच्या कार्याचा हा अनन्य गौरव व त्यांच्या प्रतिभेचा लोकगौरव आहे.  हा सत्कार आहे तो एका पारदर्शीपणाचा, लोकमनाशी घट्ट नाळ जोडण्याचा आणि त्याहूनही मोलाचं म्हणजे हा गौरव आहे तो त्यांच्या साहित्यातून साकार झालेल्या साधेपणाचा;  म्हणजेच एका simplicity चा!
आपण सर्वोत्तमतेचा शोध घेतो आहोत. या सर्वोत्तमतेची संकल्पना आणि तिचे नानाविध पैलू आपण जसजसे समजून घेण्याचा प्रयत्न करतो;  तसं हे प्रकरण एका क्षणाला फार सोपंही वाटतं आणि फार कठीणही वाटतं. शांतपणे स्वतःशी विचार करतांना सर्वश्रेष्ठतेचा, सर्वोत्तमाचा एक खास विशेष म्हणजे ‘साधेपणा’ हाच असतो हे मनाला चटकन पटून जातं.  जणू साधेपणा हा सर्वोत्तमतेचा अंगभूत गुणच आहे हे लक्षात येतं.  या गुणाच्या स्वाभाविक, सहज अंगीकारामुळे अत्यंत कठीण, गुंतागुंतीच्या गोष्टी किती सहज आणि सरळ वाटतात ते आपण मंगेश पाडगांवकरांच्या अनेकानेक कवितांतून प्रत्यक्ष अनुभवलेलं आहेच!  त्यामुळेच तर त्यांना लिज्जत पापडासाठी दर पावसाळ्यात गाणे द्यायलाही कधी संकोच वाटला नाही.  लोकांच्या रोजच्या बोलण्यातले शब्द ते कवितेत वापरायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची प्रेमावर लिहीलेली लोकप्रिय कविता - “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.”  ही कविता कविला आणि आपल्याला एकाच पातळीला आणते. दोघातला दुरावाच नाहीसा करते.
अत्यंत जटील, गुंतागुंतीच्या भावना आणि अति तरल असे अनुभव पाडगावकरांनी इतक्या पारदर्शी साधेपणाने कवितेतून मांडले आहेत की आपण त्या साधेपणात विरघळून जातो.  आणि हीच पाडगावकरांची किमया,जादू आणि अपूर्वता आहे.   अल्बर्ट आईनस्टाईन यांनी असं म्हटलं आहे की,’If you can’t explain it to six year old, you don’t understand it yourself’.   साहित्याच्या क्षेत्रात असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असो निखालस साधेपणाला फार मोठे मोल असते आणि आहे.  सहा वर्षाच्या मुलाला उमजेल-कळेल आणि ज्या वाचनाने त्याच्या अनुभवाच्या कक्षा विस्तारतील असे लेखन / अशी अगदी वैज्ञानिक  कृतीसुद्धा सर्वोत्तम असते असं आईनस्टाईन यांना म्हणायचं आहे.   जे साहित्य स्वतःच एखाद्या बंद घरासारख किंवा एखाद्या बंद  चिरेबंदी राजवाड्यासारखं आहे ते आंतरिकदृष्ट्या कितीही श्रेष्ठ असलं, पण तरी ते वाचकाशी दोस्ती करू शकत नसेल तर तो आटापीटा व्यर्थ आहे.  साहित्याचा संबंध थेटपणे मानवी जगण्याशी!  माझ्याच जगण्याची मिरर इमेज म्हणा किंवा प्रतिध्वनी जेव्हा पाडगावकरांच्या कवितेतून माझ्या मनात उमटतो तेंव्हा वाचक म्हणून मला जो आनंद होतो तो खास माझा असतो.  
‘जे साधं असतं ते साधं दिसतं, पण ते साधं नसतं’ असं म्हटलं जातं; आणि ते खरंही आहे.  पाडगांवकरांची कविता साधेपणानं सामोरी येत असली तरी ती आंतून साधी वा एकरेषीय आहे असं नाही.  लिओ टालस्टाय या महान लेखकानं असं म्हटलं आहे की, ‘ There is no greatness where there is no simplicity, goodness and truth’!   साधेपणा, चांगलेपणा आणि सत्य यातूनच महानता निर्माण होते.  आपण आपल्या इतिहासातील साधेपणाची आणि महान कर्तृत्वाची उदाहरणं पाहिली तरी हा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो.  संतांच्या रचना, लोकभारुडं, स्त्रियांनी निर्माण केलेलं काव्य किंवा शाहिरी कविता, गाडगे महाराजांची कीर्तनं असे कितीतरी दाखले देता येतील.  पण ही साधेपणाची गोष्ट फक्त साहित्यापुरती मर्यादित नाही, असुच शकत नाही.  जगभर गाजलेल्या सर्वोत्तम जाहिराती असोत वा पेटिंग्स, कलाकृती किंवा चित्रपट असोत त्यात हेच साधेपणाचं सोपेपणाचं तत्व खेळतांना दिसून येतं.  याच साधेपणाचा व सोपेपणाच गौरव मंगेश पाडगांवकरांच्या गौरवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा झाला याचा आनंद खूप मोठा आहे.  अखेरीस इतकचं म्हणावंसं वाटतं की, One day I hope to find the right words, that would be simple!       

No comments: