Friday, March 15, 2013

जेंव्हा संयम सुटतो.....


मुबंइ सकाळ 15 मार्च 2013: Good Morning:  ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा बॉक्सिंगपटू विजेंदरसिंगवर सध्या अमंली पदार्थ दलालाशी संबध असल्याचा आरोप आहे.  काही महिन्यापुर्वी सायकलवीर आर्मस्ट्राँग आणि ब्लेड रनर पिस्टोरियस या दोघेही असेच वादाच्या भोवर्र्यात सापडले होते.  हे दोघेही कल्पनातीत संपत्ती, अत्यंत दुर्लभ आणि जणू दैवायत्त वाटावी अशी प्रसिद्धी, जगभर पसरलेले चाहते आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात उच्चतम कर्तृत्व करण्याची आकांक्षा बाळगणारे खेळाडू यांचे धनी आहेत.
सलग सात वेळा ‘टूर द फ्रान्स’ ही अतिशय मानाची आणि अत्यंत कष्टाची सायकल स्पर्धा जिंकणारा आर्मस्ट्राँग म्हणजे दोन चाकांवरून जग जिंकणारा अजिंक्य योद्धाच म्हणावा लागेल.  आज त्याचं वय आहे फक्त सव्वीस आणि त्याला प्राप्त झालेली दिगंत कीर्ती मिळवायला त्याच्यापेक्षा दुप्पट- तिप्पट वय खर्च करणारेही अगणित आहेत.  एवढं वय खर्च करूनही त्यांना आर्मस्ट्राँगची जागा आणि लौकिक प्राप्त करता आलेला नाही ; आणि येणारही नाही.


हीच किंवा यापेक्षाही अधिक रंगतदार गोष्ट आहे  एक्केचाळीस वर्षांचा तरुणच असलेल्या ब्लेड रनर पिस्टोरियसची. बालवयातच गुडघ्याच्या खालचे दोन्ही पाय कापून टाकावे लागलेल्या या मुलाने आपलं पुढचं सारं आयुष्य एका अफाट जिद्दीच्या, न भुतो न भविष्यती अशा तपाच्या, काही तरी अदभूत, जगावेगळं आणि सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं प्राप्त करण्यासाठी अक्षरशः कणाकणानं उपयोगात आणलं... पातळ पत्र्याचे कृत्रिम पाय लावून अपंगांच्या ऑलम्पिक स्पर्धेत सलग पांचवेळा सुवर्णपदक प्राप्त करणारा हा अॅथलिट केवळ अपूर्व आहे.
आर्मस्ट्राँग आणि पिस्टोरियस या दोन्ही महान खेळाडूंनी ऑलम्पिक खेरीज इतर स्पर्धांतूनही जागतिक दर्जाची असामान्य कामगिरी करू तर दाखवलीच, पण स्वतःच्या खेळाला अमाप कीर्तीही मिळवून दिली. या खेळाडूंना प्रसिद्धी, संपत्ती, सर्वोच्च प्रतिष्ठा आणि देवदुर्लभ असे मानसन्मान मिळाले खरे पण ते त्यांना सोसले नाहीत आणि पचवता तर त्याहूनही आले नाहीत हेच खरेखुरे सत्य आहे.  कारण एकच दिसते; आणि ते म्हणजे त्यांना स्वतःला आवर घालायला व मोहावर आणि संतापावर मात करायला कोणी शिकवलंच नाही.  समजा तसं  कोणी शिकवलं असलं तरी ऐन मोक्याच्या वेळेला त्यांना त्या शिक्षणाचा उपयोग करून घेता आला नाही अस म्हणायला हवं.  कलावंत आणि खेळाडू मनस्वी असतात आणि त्यांची दुनिया वेगळीच असते हे मान्य करूनही असं म्हणावसं वाटतं की यांना मोह आणि संताप या आपल्या भावनांवर ताबा मिळवता आला असता तर आज ते सामान्य अपराध्यांप्रमाणे तुरुंगात नसते.  जगाने त्यांची हेटाळणी आणि निर्भत्सना केली नसती... पण तसे झाले हे मात्र खरे.  थोडक्यात आर्मस्ट्राँग आणि पिस्टोरियस यांनी जे जे कष्टाने कमावले ते ते स्वत:वर संयम नसल्याने गमावले!
या दोन महान खेळाडूंचे असे का झाले? एकाला सतत जिंकत राहाण्याच्या असीम वेडाने इतके झपाटले की त्यासाठी त्याने डोपिंगचा आश्रय घेतला. प्रत्येक शर्यत हा जणू जीवनमरणाचा प्रश्न बनवून ती जिंकण्यासाठी तो उत्तेजकांचा वापर करत विजेता होत गेला. सारे आत्मगुण बाजूला ठेवून तो आपले बलदंड बाहू उत्तेजकांच्या शक्तीला शरण गेला आणि सारेच लखलखते यश गमावून काळोखाचा धनी झाला; तर दुसरा संताप आणि संशय यांच्या जीवघेण्या भोवऱ्यात सापडून आपल्या प्रेयसीचाच खून करता झाला. दोघांचे सर्व आयुष्य तात्कालिक भावनांवर ताबा मिळविता न आल्याने आता घनघोर काळोखाचाच एक गच्च तुकडा झाले आहे. दोघेही सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम होते तेच आता नीचोत्तम झाले आहेत.
या दोघांच्या आयुष्यात घडलेल्या या आक्रीताचा अर्थ आपण घ्यायचा झाला तर तो इतकाच की, जीवनात सर्वोत्तम ते मिळवावेच, हवे ते साध्यही करावे पण तसे करतांना संयम नावाचा महामौलिक गुणही अपार प्रयासाने अंगी बाणवावा लागतो.  विद्या जशी विनयाने शोभते तसेच सर्वोत्तमता संयमाने अधिक प्रकाशते. एक चिनी म्हण अशी आहे की, ‘संयम हा कोळश्याच्या खाणीतील हिऱ्यासारखा असतो, तो कष्टाने मिळवावा आणि आयुष्य वेचून जपावा!’

No comments: