Friday, March 22, 2013

महाराष्ट्राचे पहिले साहेब...

मुबंइ सकाळ 22 मार्च 2013: Good Morning:  गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने संपुर्ण महाराष्ट्रात होर्डिंग्स – पोस्टर्स वर बंदी आणली आणि गल्लो-गल्लीतले साहेब अचानक गायब झाले.   ज्याच्याकडे लक्ष्मीची माया मोठी आणि त्या जोडीला मनगटशाही मोठी तो आता पक्षात सहजच ‘साहेब’ या पदवीला जाऊन पोहोचतो.  आता कुठल्याही राजकीय पक्षाच्या चरित्राचा वेध घेतला तरी एकाच पक्षात पाच-पन्नास ‘साहेब’ सहज वावरतांना दिसतील... अर्थात हा आजच्या काळाचा आणि आजच्या राजकारणाची जी पत-प्रत  त्याचा परिणाम आहे.   आता राजकारण हा सेवाधर्म राहिला नसून तो एक व्यवसाय, एक बिनभांडवली धंदा किंवा संपूर्ण कुटुंबाने करायची एक लाभदायक गुंतवणूक झाली आहे.   काल महाराष्ट्र विधीमंडळात झालेल्या मारामारीत आजचे आमदार साहेब कुठल्या थराराला गेलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं.अर्थात सारे राजकारण आणि सारे राजकारणी असेच आहेत असे मुळीच म्हणता येणार नाही हे खरेच आहे .  आजही राजकारणात काही  ‘प्रकाशाची  बेटे’ नक्कीच आहेत; आणि तशी ती आहेत म्हणूनच महाराष्ट्राचे ‘पहिले साहेब’ आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या नुकत्याच सांगता झालेल्या जन्मशताब्दीला काहीतरी मौलिक अर्थ आहे. माननीय यशवंतराव म्हणजे महाराष्ट्राने दिल्लीच्या सत्तेला दिलेला एक सार्वकालिक सर्वोत्तम ठरावा असा आधाराचा भलाभक्कम खांब होता असे म्हटले तरी चालेल.  आयुष्यातील अनेकानेक वर्षे ज्यांनी दिल्लीच्या राजकारणात सदैव जागृत राहून आणि आपल्या  अतुलनीय कर्तृत्वाचे विजयध्वज उभारत व्यतीत केली त्या यशवंतरावांची तुलना कुणाही बरोबर होऊच शकत नाही.  त्यांच्या अगोदर कुणीही महाराष्ट्रीय त्यांच्या इतके दिल्लीत ‘ वजनदार’ झाले नाही आणि त्यांच्यानंतर  अनेक कर्तबगार माणसे दिल्लीत गेली तरी त्यांना ‘पहिल्या साहेबां’इतकी अस्सल प्रतिष्ठा कधी मिळाली नाही हे आरपार सत्य आहे.   असे का झाले याचे उत्तर यशवंतरावांच्या असीम राष्ट्रीय कामगिरीतच दडलेले आपणास दिसेल.
एका अत्यंत गरीब घरात जन्मलेला हा मुलगा स्वतःची विलक्षण चिकाटी, अढळ देशनिष्ठा, सदैव कार्यरत असलेले शरीर आणि मन, सतत नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची तयारी, अक्षरशः अफाट जिद्द आणि तितकाच मोठा लोकसंग्रह, थक्क करणारी स्मरणशक्ती, लोक कल्याणासाठी आसुसलेले मन या गुणांच्या जोरावर प्रथम राज्याचा मुख्यमंत्री आणि नंतर देशाचा संरक्षण, अर्थ, गृह, परराष्ट्रमंत्री होतहोत देशाचा उपपंतप्रधानही झाला. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम लोकनेते तर होतेच पण ते देशाचेही सर्वोत्तम आणि आदर्श असे नेते होते.   आज महाराष्ट्र हे देशातील सर्वोत्तम, प्रगत, आधुनिक, कारभाराच्या संदर्भात उत्तम आणि शिस्तबद्ध, शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले राज्य गणले जात असेल तर त्याचे यश हे खरे तर यशवंतरावानी त्याला जी आद्य दिशा आणि भूमिका दिली त्यात आहे. असा एकही विषय नाही की ज्यात त्यांचा सहभाग नाही.  यशवंतराव महाराष्ट्राची सर्वोत्तम उभारणी करू शकले कारण त्यांच्याकडे एक मानसिक विशालता, काळाला ओलांडून जाणारी कल्पकता आणि विधायक- सकारात्मक दृष्टी होती.  येणाऱ्या काळाचे त्यांचे वाचन इतके नेमके आणि अपूर्व होते.  त्यामुळेच त्यांनी देशातील इतर राज्यात ज्या सुधारणा आकाराला यायला अनेक दशके जावी लागली त्या बाबी सुरवातीच्या काळातच केल्या.

यशवंतराव चव्हाण हे सारे करू शकले कारण त्यांच्या मनात प्रगत भारताचे एक सुस्पष्ट चित्र कायम जागृत होते.  महात्माजी, पंडित नेहरू आणि सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनातला भारत आणि यशवंतरावांच्या मनातला भारत यात त्यांच्या अखेरच्या श्वासापावेतो कधीही अंतर पडले नाही.  त्यांच्या यशाचे आणि जीवनाचे हेच मर्म म्हणावे लागेल!   महाराष्टाचा सर्वोत्तम राजकीय नेता म्हणुन सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण यांचच नाव घ्याव लागेल.  महाराष्ट्राचे ते खरे पहिले साहेब आता होणे नाही हेच खरे!   
टीप:  1947 नंतर जन्माला आलेल्या पिढीला महात्मा गांधी कोण हे सांगण्यासाठी रिचार्ड अ‍ॅट्नबरो यांना चित्रपट काढावयास लागला तसे आधुनिक, औध्योगिक आणि सुसंकृत महाराष्ट्र  घडवणर्र्या ह्या सह्याद्रीचे होता कामा नये!   
nitinpotdar@yahoo.com

No comments: