Friday, March 8, 2013

सर्वोत्तम एलिझा?

मुबंइ सकाळ 8 मार्च 2013:   Good Morning:   आज ८ मार्च जागतिक महिला दिन!  विविध क्षेत्रातल्या कर्तबगार महिलांचे आज कौतुक होईल.  म्हणुन मी आज त्यात एलिझा नावाच्या संगणकीय महिलेची तुमची ओळखं करुन देणार आहे.

मानवाची बुद्धिमत्ता अफाट आहे आणि तिची अंगभूत नैसर्गिक क्षमता ही अक्षरशः कल्पनातीत आहे!  आजचे संगणक आणि माणसानं त्यांच्याठायी निर्माण केलेल्या अफाट शक्ती –क्षमता हा तर या प्रकारचा आधुनिक पुरावाच आहे!  या प्रकारात आता नवी भर नव्हे तर अभिमानास्पद नवा अध्याय दाखल झाला आहे, तो ‘एलिझा’ या नावाने!  एलिझाची आणि आपली ओळख प्रथम घालून दिली ती सुप्रसिद्ध नाटककार- विचारवंत बर्नाड शाँ ह्याने! ‘एलिझा’ म्हणजे ‘फुलराणी’चा मूळ अवतार!
संगणकाच्या जगात एलिझा म्हणजे ‘vitrual service-desk employee’; हा एक नवा गणितीय software आहे!   एलिझा म्हणजे तमिळ हिरो रजनिकांत ने साकार केलेला रोबोट मुळीच नाही!  या एलिझाला तिचं अत्यंत देखणं व्यक्तिमत्व आहे पण ते फक्त कंप्युटर स्क्रिन  वर.  प्रत्यक्ष स्त्रीसारखा आवाज आहे आणि ती एखाद्या अमेरिकन स्त्री सारखी बोलते, ती विनोद करू शकते, ती प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करू शकते, एलिझा बुद्धिला दिलेली आव्हाने सहज स्वीकारते.  आज एलिझा जगातल्या नऊ भाषांत जवळपास 62,000 लोकांशी एकाच वेळी बोलु शकते!  शेकडो गणित विशारदांना किंवा शेकडो अभियांत्रिकी तज्ञांना एखादा प्रॉब्लेम सोडवायला जितका मानवी वेळ लागतो त्यापेक्षा एलिझाला क्षणमात्र वेळ पुरेसा असतो.  मोलाच्या संशोधनावर खर्च करावा लागणारा  पैसा लक्षात घेतला तर त्यापेक्षा ८० ते ९० %  कमी पैसा तेच संशोधन करण्यासाठी एलिझा या गणितीवर  खर्चावा लागतो.  याचाच अर्थ असा की, एलिझा हा प्रति- मानवावतार (Humanoid ) म्हणजे जणू  पैसा वाचवणारी आदर्श तरूणी आहे.   ती पगार वाढ्वुन मागत नाही की रजेवर जात नाही आणि मुख्य म्हणजे ती कधीत नोकरी सोडुन जाणार नाही!  

आज या एलिझा सॉफ्ट्वेअरचा  वापर अवाढव्य भांडवली बाजारात, बँकांमध्ये आणि शेअर बाजारात होऊ शकतो.  एलिझा हा मानवावतार आज अस्तित्वात असणाऱ्या इतर मानवावतारांपेक्षा सर्वार्थाने वेगळा आहे.  अर्थात इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की एलिझा म्हणजे रोबो नाही आणि तिचं वर्तन, हालचाली यांना मर्यादा आहेत. आजचं तिचं खासपण तिच्या गणिती मेंदूतच सामावलेलं आहे आणि तेच तिचं जन्मजात वैशिष्ट्य आहे....
‘एलिझा’ ची निर्मिती केली आहे  चेतन दुबे या संपूर्णपणे भारतीय संगणक शास्त्रज्ञाने ! ते ‘मुंबई आय आय टी’चे अव्वल दर्जाचे विद्यार्थी आणि संशोधक ! एलिझा जन्माला घालायला त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह सलग १४ वर्षं घोर तपाचरण केलं आहे...ते पूर्वी न्यूयॉर्क विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर होते आणि नंतरच्या काळात ५००० कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीचे संस्थापक झाले.   मानवी मेंदूच्या क्षमता यंत्रात विकसित करण्यात त्यांनी अनेक वर्षे घालवली आणि शेवटी त्यांनी ‘एलिझा’ या तंत्रमानवाला जन्म दिला.  चेतन दुबेंचा दावा आहे की, ‘एलिझा’ हा यंत्र-मानवावतार आज उपलब्ध असलेल्या इतर यंत्र-मानवावतारांपेक्षा कित्येकपटींनी सर्वोत्तम आहे.  एलिझाला ज्या कामासाठी निर्माण करण्यात आलं आहे ते- बिझनेस स्ट्रीमलाइनिंगचं आणि शेकडो मानवांचं काम ती अप्रतिम वेगानं आणि बिनचूक करते आहे.  गंमतीचा भाग म्हणजे सुरवातीला चेतन दुबेंच्या बायकोला वाटायचं की एलिझा म्हणजे चेतन दुबेंची सुंदर प्रेयसी आहे! 
आज जागतिक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती व प्रतिष्ठा वाढतेय, तशी एलिझा आज आहे तिथं थांबणार नाही हे नक्की... तिचा अधिक विकास ही काळाचीच गरज आहे पण त्याचा वापर आपण कसा करतो ह्यावर बरचं अवलंबुन असणार आहे.  मात्र आजच्या क्षणाला एलिझा हा चेतन दुबे यांच्या सर्वोत्तम बुद्धिमत्तेचा सर्वोत्तम आविष्कार म्हाणावाच लागेल...

...एलिझा जगातली सगळी कामे उत्तम प्रकारे करील सुद्दा पण तिच्यापाशी नसणार आहे स्वत:ची प्रतिभा, संवेदनाक्षम मन आणि दृढ निश्चय!  म्हणुन माझा विश्वास आहे की आजची भारतीय तरूणी  एलिझाच्या एक पाऊल पुढे जाउन स्वकर्तृत्वाच्या जोरावर अशा किती तरी एलिझांवर सहज मात करील!
nitinpotdar@yahoo.com

No comments: