Friday, April 5, 2013

मुंबई कोणाची राहाणार ?


मुबंइ सकाळ 5 April, 2013: Good Morning:  'मुंबई कोणाची राहाणार?’ हा प्रश्न कदाचित काल पर्यंत राजकीय भुकंप करणारा होता, पण आता तो जास्त गंभीर झालेला आहे.   खरं तर हा प्रश्न मुंबईत राहाणाऱ्या आणि खास करुन इथल्या मुळ पुरुषाला मुळीच नवा नाही.  पण आता हा प्रश्न खरोखरीच मुंबईवर प्रेम करणार्र्या इथल्या मुंबईकरांनाच नव्हे तर देशाच्या इतर भागातून येऊन इथं स्थाईक झालेल्यांना देखिल हा गंभीर वाटेल, कारण साऱ्यांनाच आता मुंबईची चिंता करण्याची गरज आहे.  आणि आता तर हाच प्रश्न देशातील इतर शहरांदेखिल लागु पडणार आहे.  
याला जी अनेक कारणे आहेत त्यात आता भर पडली आहे ती अलीकडेच झालेल्या दोन घोषणांमुळे -एकीकडे जपान सरकारच्या मदतीने केंद्र सरकार मुंबई-दिल्ली कॉरीडॉर बांधण्याच्या तयरीत आहे;  तर त्याच्या जोडीला आताच्या  अर्थसंकल्पात अर्थमंत्री असलेले श्री.पी. चिदंबरम यांनी ‘मुंबई- बंगरूळ’ हा नविन कॉरीडॉर निर्माण करण्याची घोषणा केली.  मुंबई आहे तरी किती?  तीचा पसारा अजुन किती वाढवायचा?  अजुन का आणि किती लोक इथं कोंबायची?   मुंबईच नेमकं आपल्याला काय करायच आहे याचा कुठलाच विचार कुणीही करताना दिसत नाही.  एका दिशेने मुंबईचे आकर्षण संपूर्ण भारताला आहे;  तर दुसरीकडे तिला कोणीही पालक वा तिची काळजी करणारा आप्त राहिलेला नाही अशी अवस्था आहे.   हे शहर आता खऱ्या अर्थाने पोरके आणि अनाथ झाले आहे... मुंबईच्या ज्या अनेक जीवावरच्या समस्या आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे या शहराला आता हातपाय पसरायला एक सेमी सुद्दा जागा उरलेली नाही.  दुसरी शहराच्या भयावह बकालीकरणाची... मुंबईचे आरोग्य, मुंबईतील शिक्षण, मुंबईतील कलागृहे आणि संस्कृती, मुंबईतील जनजीवन, मुंबईची खास विशिष्टता हे सारेच आज दुभंगलेल्या स्थितीत आहे.  ‘धनाढ्यांची मुंबई’ या शहराची सारी यंत्रणा आणि इथले सारे लाभ संपत्तीच्या बळावर गिळंकृत करते आहे आणि ‘कंगालांची मुंबई’ अठरा विश्वे दारिद्र्य भोगत एखाद्या दमेकरी माणसाप्रमाणे जगण्याचा नाश उघड्या नजरेने पाहते आहे.

हे शहर गेल्या ५० नव्हे तर अवघ्या १५च वर्षात असे काही बदलले आहे की त्याची सारी पूर्वपुण्याई, सारी शहर-संस्कृती, सारी अभिजातता, आदर वाटावा अशी रसिकता आणि उदारता अर्धीअधिक धारातीर्थीच पडली आहे.  हे कालपर्यंत ओळखीचे असणारे शहर दिवसेंदिवस सर्वांनाच अनोळखी, परके होत चालले आहे. पूर्वीच्या काळात शहरे लुटली  जात असत, पण त्या काळातसुद्धा ती शहरे जेवढी नागवली गेली नसतील तेवढे आज प्रगती, विकास आणि आंतरराष्ट्रीय शहर या भुरळ घालणाऱ्या नावांखाली मुंबई शहर लुटले जाते आहे, भकास आणि उजाड केले जाते आहे.   
याला जबाबदार कोणाला धरायचे? राज्य सरकार, महानगरपालिका की स्वतःला ‘मी मुंबईकर’ म्हणवणाऱ्यांना? दुर्दैवाने मुंबईच नव्हे तर देशातल्या कुठल्याच मोठ्या शहराबद्द्ल एक ठोस भुमिका कुणी घेताना दिसत नाही.  नियोजन आणि योजना म्हणजे फक्त पैसे बनविण्याच एक साधन होऊन बसलयं.  जे उद्या मुंबईच होईल तेच उद्या देशातल्या सगळ्या मोठ्या शहरांच होईल.  मुंबई ही आंतरराष्ट्रीय पातळीवरीलही सोन्याची खाण असल्याने तिची भरभराट होणे आणि या शहराची जुनीपानी ओळख नाहीशी होऊन तिला अतिप्रगत देशांची नामवंत बाजारपेठ म्हणून कीर्ति लाभणे सर्वांना खरोखरीच सोयीचे आणि अभिमानाचे होणार आहे का? 

भारतातल्या एका मोठ्या शहराचे असे बाहुले झाले की इतर अनेक शहरांचे होत जाईल...या उद्याच्या विकासात मुंबई महाराष्ट्राची तरी राहील का?  निदान मुंबईची मुळ ओळखं तरी शिल्लक राहील का हाच खरा प्रश्न आहे.  त्या मुंबईची कसलीच नाळ आजच्या मुंबईशी नसेल. त्या मुंबईत आजच्या मुंबईतले काय बरे शेष राहील? मुंबईची मराठी ओळखं? मराठी माणूस ?

No comments: