Friday, April 12, 2013

दुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..

मुबंइ सकाळ 5 April, 2013: Good Morning: 'सॅम पित्रोडा’ हे नाव आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाची दीक्षा घेतलेल्या  तरुणांच्या भारताला चांगलंच  परिचयाचं आहे.   १९८४ पूर्वीचा भारत देश आणि २०१३ या चालू वर्षातला महान भारत देश यांत कुणाच्याही लक्षात यावा असा विलक्षण फरक आहे...   ’८४ पूर्वीचा भारतात घरी साधा टेलिफोन आला की लोक सत्यनारायणाची पुजा सांगायचे आणि घरगुती गॅस आला की पेढे वाटायचे!  साधारणं 12 तासांनी येणारी पोस्टाची तार हेच महत्वाच्या निरोपाचे सगळ्यात जलद साधन होतं!  म्हणजे भारत एका पारंपरिक मार्गाने वाटचाल करणारा देश होता.   देशातील अगदी पुढारलेला वर्गही  आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल अशिक्षितच नव्हे तर अडाणी होता.    

पण गेल्या तीस वर्षात नुसतेच ‘पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे’ असे नव्हे, तर संपूर्ण जीवनाची शैली, जीवनाचा पोत आणि जीवनाची गतीही पुर्णपणे बदललेली आहे.  पोस्टकार्डाच्या जागी प्राईव्हेट कुरिअर, कुरिअरच्या जागी ईमेल, ईमेलच्या जागी एसेमेस आणि आता ब्लॅकबेरी मेसेंजर, व्हॉट्स-अप आणि जगाशी जोडणारे फेसबुक!  खरेतर आजच्या वास्तवाची कल्पना करावी इतकीही कल्पनाशक्तीच तीस वर्षांपूर्वी संपूर्ण भारतात नव्हती.  ज्याची कल्पना देश करू शकत नव्हता त्याची केवळ कल्पनाच नव्हे; तर कार्यप्रणालीही ज्यांना परिपूर्ण अवगत होती असे एक दृष्टा म्हणजे सॅम पित्रोडा!
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे व्यक्तिगत मित्र, ‘डून स्कूल’चे विद्यार्थी आणि भारत सरकारचे तंत्रज्ञान विषयक सल्लागार याहूनही माहिती आणि तंत्रज्ञान, दूरसंचार आदी विषयातील तज्ञ, संशोधक म्हणून सॅम पित्रोडा यांची योग्यता मोठी आहे.  राजीव गांधी ते राहुल गांधी असा देशाचा प्रवास घडत असण्याच्या काळात पित्रोडा हे शासनाचा एक महत्वपुर्ण भाग आहेत हे आपले खरोखरीच भाग्य आहे! 

समाजातील सर्व आर्थिक स्तर ओलांडत कम्युनिकेशन प्रणालीने एक नवी लोकशाही प्रस्थापित केली, रुजवली आणि जोपासली.  गेल्या तीन दशकातलं आपलं सर्वांचं प्रत्यक्ष रोजचं जीवन या क्रांतीची साक्ष देतं आहे.  पंतप्रधानांपासून ग्रामसेवकापर्यंत आणि महान उद्योगपतीसह घरातील नोकरापर्यंत सर्वांनाच्या हातात असणारा मोबाईल किती क्रांतीकारक आहे हे आपण सर्वच अनुभवतो!
१९८४ ते साधारण १९९० या काळात इथे संगणक आला आणि बघताबघता तो या देशात असा काही रुजला की आता घरटी एक नव्हे तर दरडोई एक अत्याधुनिक कंप्युटर, लॅपटॉप आणि आयपॅड वापरात आहे... अर्थात आपल्याकडे तंत्रज्ञान आले म्हणून आपली दृष्टी बदललीय असे मुळीच झालेल नाही!   आपण फारच मर्यादित तंत्रविश्वात वावरतो आहोत आणि त्याहून अधिक दोष म्हणजे आपण अजूनही माहिती-तंत्रज्ञानाचा  मर्यादित वापर करतो आहोत आणि त्याहूनही त्याच्याकडून  मर्यादित  अपेक्षा करतो आहोत हीच खंत डॉ.सॅम पित्रोडा यांनी मागच्या आठवड्यात दुसऱ्या क्रांतीची घोषणा करतांना व्यक्त केली आहे.  अजुनही आयटी क्षेत्र किंवा कंप्युटर म्हणजे ईमेल पाठविणे आणि एखादी वेबसाईट बनविणे हेच आपण समजतो.  माहिती आणि तंज्ञानाचा वापर शिक्षणं, उद्दोग, व्यवसायात आणि रोजच्या जीवनात करुन आपण मोठी प्रगती करु शकतो.  त्यासाठी आपल्याला मनाची दार उघडावी लागतील, ठाम निश्चय करावा लागेल, बदल घडवावे लागतील आणि तरच  आपण जागतिक स्पर्धेत टिकाव धरु शकु.  सतत बदल हेच शाश्वत सत्य आहे हे आपण समजुन घेतलं पाहिजे. 

डॉ. सॅम पित्रोडा यांनी दुसऱ्या क्रांतीची घोषणा करतांना असे म्हटले आहे की, ‘’आपल्या देशात इंटरनेट आहे पण त्याचा अर्थपूर्ण वापर होत नाही. आपण फक्त माहितीचा पूर अंगावर घेतो आहोत!  आपल्या विकासाच्या आणि ज्ञानविस्ताराच्या कल्पना फारच मर्यादित आहेत.   आपण तंत्रज्ञानाने प्रभावित झालो आहोत पण त्याच्या वापराची संकल्पना आपल्यापाशी नाही.   आपण Virtual Universities ची कल्पनाही करत नाही.”   हे सारे पित्रोडा म्हणत आहेत आणि त्यात गंभीरता आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.   आता त्यांना देशातील २५००० पंचायती इंटरनेटच्याद्वारे एकमेकांशी जोडून आधुनिकतेचे  नविन पर्व प्रारंभीत करायचे आहे. एक नवी झेप घ्यायची आहे. आणि भारतीय राष्ट्र जगात अव्वल स्थानी न्यायचे आहे.  हे पित्रोडा घडवून आणतील आणि भारत महासत्ता होण्याच्या दिशेने एक लांब उडी मारेल यात शंका नाही.  वर्षेनवर्षे  न मिळणारा टेलिफोन पसुन आजच्या आयफोन आणि आयपॅड पर्यंत  माध्यमातली ही दुसरी क्रांती खरोखरीच वास्तवात येवो आणि यशाची गुढी उभारली जावो एवढीच इच्छा!   
nitinpotdar@yahoo.com

No comments: