Friday, April 19, 2013

‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ!

मुंबई सकाळ 19 एप्रिल 2013 Good Morning:  ‘आरपीजी’ याच नावाने भारतात आणि परदेशात विख्यात असणारे महान उद्योगपती  रामप्रसाद  गोएंका  यांचं  गेल्या  रविवारी -    वयाच्या ८३ व्या वर्षी- निधन झालं. त्यांच्या निधनाने आपण एका आदिगुरुला, एका विलक्षण सरसेनापतीला मुकलो आहोत‍!

भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील तब्बल बासष्ठ वर्षे रामप्रसादजी उद्योगपती म्हणून बंगालमधे सदैव कार्यरत होते.  याचाच अर्थ असा की, देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक वाटचालीत, प्रगतीत आणि समग्र विकासात त्यांचा मोलाचा सहभाग तर होताच पण या विकासाचे ते मार्गदर्शक होते.  नायकही होते.  देशाच्या औद्योगिक विकासाचे जे बिनीचे शिल्पकार म्हणून नावाजले गेले आहेत त्यात रामप्रसाद  हे नाव टाटा-बिर्ला यांच्या बरोबरीने अगदी अग्रक्रमाने घेतले जाईल ह्यात शंका नाही.

विलक्षण मेहनत, अपूर्व धडाडी, सुस्पष्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळाच्या पुढे जाणारे  उद्दोजकिय नेतृत्वगुण ही  रामप्रसाद गोएंका यांची खास विशेषता होती.  रामप्रसाद वयाच्या २१ व्या वर्षी खानदानी उद्योगात आले आणि १९७९मध्ये त्यांनी ‘आरपीजी एन्टरप्राइजेस’ या चार कंपनीजच्या समूहाची पायाभरणी केली आणि यश त्यांच्या मागेच लागले.   प्रारंभीच्या फक्त १०५ कोटींचे उद्दोग समूहातुन आज संजीव आणि हर्ष ह्या दोन मुलांत विभागलेले त्यांचे  संपत्तीविश्व तब्बल ३१,००० कोटींचे आहे.  

कुठल्या कंपन्या विकत घ्यायच्या हे कदाचित सोपं असेल पण त्या केंव्हा घ्यायच्या हे गणित ज्याला कळलं ते म्हणजे आरपीजी!  कंपन्या विकत घ्यायला पैशा पेक्षाजास्त एक दुर दृष्टी लागते ती आरपीचींकडे इतरांपेक्षा नक्कीच जास्त होती असं म्हणायला काहीच हरकत नाही.  म्हणुनच रामप्रसाद उर्फ रामबाबूंना original takeover tycoon! असं म्हणायचे. टायर, कार्बन, औषध कंपन्या, आयटी उद्योग, वीज निर्मिती, करमणूक, प्रसारण, प्रसारसेवा अशा कितीतरी उद्योगातील कंपन्या त्यांनी स्वतःच्या स्वामित्वाखाली तरी आणल्या किंवा त्यांच्याशी हातमिळवणी केली.  रामबाबू म्हणजे कंपन्या विकत घेणारा एक महासम्राटच! 
रामबाबू हे जसे राज्यसभा सदस्य म्हणून वावरले तसेच ते तारुण्यात असतांना बैडमिंटनपटू आणि क्रिकेटपटू म्हणून बरेचसे नावारूपाला आलेले होते. शिक्षण, राजकारण, क्रीडा आणि आध्यात्म यात सारखीच रूची असणारा हा उद्योगपती सर्व क्षेत्रातले सर्वोत्तम भांडवल गोळा करणारा एक मर्मज्ञ रसिक होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सारा देश इंदिरा गांधी यांच्या विरोधात असतांना रामप्रसाद त्यांची साथ करीत होते आणि ते स्वतः खमके भांडवलदार असतांना डाव्या पक्षातले अस्सल कडवे डावे त्यांचे अत्यंत जिवलग मित्र होते. रामप्रसाद गोएंका हे अनेक वर्षे ‘फिकी’चे अध्यक्ष जसे होते तसेच ते अनेक वर्षे ‘आयआयटी, खरगपूर’चे चेअरमनही होते. तर दुसऱ्या टोकाला ते तशीच कामगिरी ‘तिरुपती देवालया’च्या संचालक मंडळावर राहूनही करीत होते. त्यांचापाशी जसा उद्योगाचा वारसा होता तसाच सामाजिक कार्याचाही होता. नेहरू-गांधी घराण्यांशी संबंधीत असणाऱ्या तीन संस्थांशी जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा निकटचा संबंध होता.
आक्रस्ताळ्या, रागलोभ तीव्र असलेल्या,  मूलतः डावी विचारसरणी असणाऱ्या बंगालमध्ये रामप्रसाद गोएंका हा अस्सल मारवाडी माणूस परम आनंदाने नुसता जगलाच नाही तर त्यांनी बंगाली माणसाहूनही बंगालवर थोडे अधिकच निरतियश प्रेम केले आणि तेथे राहूनच डाव्यांच्या नजरेला  नजर देत आपले विश्वविख्यात साम्राज्य विकसित केले.  मराठी तरूण उद्दोजकांनी त्यांच्या कडुन शिकण्याचा गुण म्हणजे ते त्यांच जन्म गाव राजस्थान असताना देखिल त्यांनी उभी हयात  बंगाल मधे म्हणजे साहित्य आणि कलेच्या महेरघरी उद्दोग उभा करण्यात घालविली!  म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही पैसा कमावता येतो!    

‘कामगार हाच माझ्या यशाचा खराखुरा कणा आहे. तो नसेल आणि त्याचा तुमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही एक पाऊलही पुढे सरकू शकत नाही... मी जे जे करू शकलो त्या त्या यशाचा खरा धनी माझा कामगार आहे’ असे म्हणणारे रामबाबू आत्ताच्या भांडवली भारतात किती असतील?  त्यांच्या यशाच गणित हार्वड, व्हॉर्टन किंवा कुठल्याही मॅनेजमेंटच्या कॉलेज मधे शिकायला मिळणार नाही.  खरं तर आरपीजी म्हणजे एका उद्दोग समुहाची नुसतीच यशाची केस स्टडी नसुन एक मोठं मुक्त विद्दापीठंच होतं असं म्हणायला काही हरकत नाही! 
nitinpotdar@yahoo.com

No comments: