Friday, May 31, 2013

राष्ट्रीय चारित्र्य ?

मुंबई सकाळ 31 मे 2013 Good Morning: शनिवार आणि रविवारी अहमदाबादला काही कामा निमित्ताने गेलो होतो.  संपुर्ण दिवस आयपीएलच्या बातम्यांनी डोक बधिर केले होतं, म्हणुन म्हटंल संध्याकाळी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमास जाऊन येऊ.   सायंकाळचे सात वाजले होते अंधार होता तरी तेथिल सुरक्षा रक्षकाने मला जाऊ दिलं... वीज निर्मितीत आज गुजरात राज्य सरप्लस असताना गांधीजींच्या घरात अंधार कसा, मी त्या सुरक्षा रक्षकाला थोडा नाराजीच्या स्वरात प्रश्न विचारला, तो चेहर्र्यावर कसलाही ताण ना आणता म्हणाला इधर ऐसाही है....

त्या आयपीएलच्या अंधाराचा मी आणखी वेध घेण्याचा प्रयत्न केला.   माझ्या पिढीचं बोलायचं झालं तर मी भ्रष्टाचाराची सुरुवात हर्षद मेहता आणि केतन पारिख यांनी केलेला स्टॉक एक्सचेंज मधील घोटाळा पाहिली पुढे  टु-जी,  कॉमन वेल्थ, तेलगी, सत्यम, बोफोर्स, चारा (फॉडर), संसदेतला कॅश-फॉर-वोट, आदर्श गृह संकुल, हवाला आणि कालचा आयपीएल... सत्ते मधे असलेल्या काही मुठ भर लोकांनी अती श्रीमंतांच्या जोडीने केलेला हजारो लाखो कोटींचा घोटाळा आज न्युज चॅनेल्स आणि वृतपत्रातुन बघितला की संपुर्ण देशच हा आकंठ भ्रष्टाचारात बुडाला आहे का?  असा प्रश्न कुणलाही पडेल.   त्यांच्या बरोबरीने रॅशन ऑफिस, महानगर पालिका ते मंत्रालय आणि शेवटी सिग्नलवर उभा असलेल्या ट्रॅफिक हवालदारा पर्यंत इथंला प्रत्येक माणुस हा पैसे खाणारच अशी आपली समजुत झालेली आहे?  खरचं आपला संपुर्ण देशच भ्रष्ट आहे का?  आणि या पुढे आपण एक भ्रष्टाचारी देश म्हणुन ओळखले जाउ का?   आपलं राष्ट्रीय चारित्र्य खरचं इतक वाईट होत चाललं आहे का? 

Friday, May 24, 2013

Cricket is not the game for silent spectators..


मुंबई सकाळ 24 मे 2013 Good Morning: क्रिकेट हा कधीतरी सभ्य लोकांचा खेळ होता आणि कधीतरी देशोदेशीचे खेळाडू जीवाचे रान करून या खेळाला अधिकाधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी झटत होते ही आज केवळ एक ऐतिहासिक अफवा ठरली आहे... साहेबांच्या खेळाची इतकी वाईट अवस्था आज खरचं बघवत नाहीय.  माझ्या पिढीने अजित वाडेकरांचे यश्स्वी नेतृत्व पाहिले, नंतर सुनिल गावस्करची स्ट्रेट ड्राईव्ह पाहिली, चंद्रा बेदी आणि प्रसन्नाच्या फिरकीची जादु पाहिली... आणि फॉर्वर्ड शॉर्ट-लेगला जिवाची पर्वा नकरणारा एकनाथ सोलकर बघितला!  कॉमेंट्री बॉक्स मधे आपल्या करारी शब्दांची सिक्सर मारणारे विजय मर्चंट... खरोखरं सोन्याचे दिवस!  मला वाटतं 1984 साली कपिल देव ने वर्ल्ड-कप जिंकल्यानंतर आपले क्रिकेट्पटु हळू हळू क्रिकेट सोडुन सर्व काही करायला लागले आणि तिथंच घात झाला त्याला एकमेव अपवाद फक्त होता तो म्हणजे सचिन तेंडूलकर!   
आयपीएलच्या नावाखाली या सभ्य खेळाचे जेव्हा पद्धतशीर व्यापारीकरण सुरु झाले तेव्हांच त्याच्या सुसंस्कृततेची आणि बाळबोध सभ्यतेची मृत्यूघंटा वाजायला सुरुवात झाली. गेल्या दशकात ही मृत्यूघंटा इतक्या उच्च स्वरात वाजायला लागली की ‘क्रिकेट म्हणजे सर्व अनाचारांचं आगर, महाआगार’ ही नवी व्याख्या म्हणा वा नवी ओळख रुजायला सुरुवात झाली. यंदाची आयपीएल आयोजित सहावी क्रिकेट स्पर्धा म्हणजे या खेळाच्या सर्वंकष अधोगतीची अगदी पक्की अदा आहे..  
‘राजस्थान रॉयल’चे पकडण्यात आलेले तीन खेळाडू हे हिमनगाचे टोक आहे असेही म्हणवत नाही, याचे कारण हा हिमनग एवढा महाकाय आहे की त्याचे दिसणारे-असणारे टोक इतके क्षुल्लक असूच शकत नाही.  क्रिकेटमधला अतिरिक्त पैसा आणि त्याच्या पटीत वाढणारे अनाचार, त्याविषयी रकाने भरभरून येणारा चित्तथरारक मजकूर, ज्यांना अटक झाली त्यांनी उपयोगात आणलेली सिग्नल यंत्रणा आणि केलेली बेताल खरेदी पाहिली की भाबडा क्रिकेट रसिक पार चक्रावून जाण्यापेक्षा पण हताशही होतो आहे. अर्थात त्याची ही हताशतासुद्धा खोटी, पोकळ आणि दांभिक ठरते आहे.
तो खराच हताश आणि झालेल्या फसवणूकीमुळे व्यथित असता तर तो प्रत्यक्षात वेगळा वागला असता.  पण आज जे चित्र दिसते आहे ते विपरीत आहे.   क्रिकेटचा चाहता वर्ग म्हणा की ग्राहकवर्ग म्हणा तो इतका बदलला आहे की त्याचे लक्ष खेळापेक्षा त्या खेळाशी निगडीत जी बाजारपेठ उदयाला आली आहे तिचा एक अपरिहार्य घटक होण्यात गुंतले आहे. शुद्ध स्वरूपातल्या खेळाची त्याची अपेक्षा आज इतकी विकृत झाली आहे की आपण बघतो आहोत ते क्रिकेटचे मोठे सोंग आहे याची जाणीवच त्याला उरलेली नाही...पाच दिवसांच्या मॅच वरुन  आपण घसरलो ते थेट चार तासांच्या टुकार सिनेमां पेक्षाही वाईट अस्वथेत.  
आज जगभरातले आणि भारतातले क्रिकेट हा सगळी सभ्यता बासनात गुंडाळून ठेवणारा आणि काही लाख कोटींची उलाढाल करणारा एक जुगाराचा खेळ झाला आहे.  क्रिकेट हे क्रिकेट न राहता ते  काळ्या पैशाचे व्यवस्थापन करणारे आणि अक्षरशः मूठभरांची समृद्धी गगनाला नेणारे माध्यम झाले आहे.  ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’, बीसीसीआय, क्रिकेटच्या सर्व शाखा, सर्व क्लब्जनां त्यांच्या पदधिकार्र्यांना  याची काहीच कल्पना नव्हती असं जर कुणी म्हणत असेल तर ते या देशाच मोठं दुर्दैव! 
खरे तर खेळ खेळाच्या परंपरेत आणि चौकटीतच राहायला हवा.  क्रिकेट लोकप्रिय आहे म्हणून त्याच्या मूळ चौकटीला धक्का लावणे, त्याचे नियम हवे तसे वाकवणे, त्यात मनमानी बदल करणे, कसोटीला लोक कंटाळले आहेत अशी हाकाटी करून चार तासांच्या टी-20 सारख्या थिल्लर प्रकारांचा सिलसिला रुजवणे हाच मूळात नैतिक अपराध आहे.   हे आपल्याकडे झाले कारण तशी बाजाराची आणि सट्टेबाजांची मागणी होती आणि आहेही.  आपण त्या खेळाच्या परंपरेचा आणि तिच्याशी निगडीत सभ्यतेचा, नैतिकतेचा राजरोस  खून करून उजळपणे वावरतो आहोत. त्याला आपले जुने विश्वविख्यात आणि चारित्र्यवान खेळाडूही विरोध करत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे...  आज विजय मर्चंट असते तर ते नक्कीच कडाडले असते की....Cricket is not the game for silent spectators.  I will not allow it to get killed in the hands of unscrupulous people.  Let’s get together and fight this out.

Sunday, May 19, 2013

मॅक्सेल अवॉर्डस 2013चा दिमाखदार सोहळा!

महाराष्ट्र टाईम्स दि. 13 मे 2013: उद्योगजगतातील मराठी नवरत्नांनी आपली कल्पकता उद्याच्या पिढीला  राजकारण, समाजकारणासह सर्वच क्षेत्रांत कर्तृत्ववान पिढी दिसेल. ग्रामीण भागात शालेय शिक्षण अधिकाधिक किफायतशीर चांगल्या दर्जाचे करण्यामध्ये या नवरत्नांनी आपली कल्पकता ऊर्जा यांचे योगदान द्यावे , त्यांची ज्ञानाधारित नावीन्यता हाच गरिबीनिर्मूलनाचा पाया ठरेल , अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मराठी उद्यमशीलते गौरव करणाऱ्या ' मॅक्सेल पुरस्कार ' सोहळ्यात व्यक्त केली.

सातासमुद्रापार मराठी कार्यकतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या उद्योगपतींचा तसेच, सार्वजनिक क्षेत्राला कलाटणी देणाऱ्या नेतृत्वाचा रविवारी सायंकाळी भाभा सभागृहातील दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला . प्रत्येक मुलाला समान संधी आणि दर्जेदार शिक्षण मिळावे , खेडेगावातील वंचितांना इंग्रजीचे धडे मिळावेत , यासाठी या यशस्वी उद्योजकांनी योगदान द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.   विविध वित्तीय बाजारांच्या वाढीत योगदान देणारे फायनान्शिअल टेक्नॉलॉजिसचे जिग्नेश शाह हेही मराठी नावीन्यतेला अभिवादन करण्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . डॉ . रघुनाथ माशेलकर, अमेरिकास्थित उद्योगपती सुनील देशमुख, न्या. अरविंद सावंत, पत्रकार कुमार केतकर यांनी कल्पकता बुध्दिसंपदा हीच आजच्या युगात विकासाची गुरूकिल्ली कशी आहे , याबाबत मार्गदर्शन केले.   तर मॅक्सेल पुरस्कारांचे योजक कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार  यांनीही कल्पकता हेच भांडवल असून शालेय अभ्यासक्रमातही इतिहास - भूगोलाप्रमाणेच उद्योजकतेचाही समावेश व्हावा , अशी अपेक्षा व्यक्त केली . हे पुरस्कार नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आहेत , असे ते म्हणाले . महिलांची शक्ती ओळखण्यात आपले उद्योगक्षेत्र अजूनही कमी पडले आहे , असे मत सुनील देशमुख यांनी नोंदविले .

मालेगावला इथेनॉलच्या प्रयोगाने हरितऊर्जेची सुरुवात करणारे नंतर ५० हून अधिक देशांपर्यंत बायोफ्युएल उद्योगाचा विस्तार करणारे आयआयटीतील उच्चविद्याविभूषित प्रमोद चौधरी हे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले . मासळी व्यवसायाला विशाल उद्योगात रुपांतरित करणारे मरीन एक्सपोर्ट्स कंपनीचे दीपक गद्रे , हवाई वाहतूक , एरोस्पेस संरक्षण सामग्री क्षेत्रात अमेरिकेत आपला ठसा उमटविणारे यूएस एअरोटीमचे सीईओ सुहास काकडे , मर्सिडीझ - बेन्झ कंपनीच्या कॉर्पोरेट अफेअर्स एचआर विभागाचे संचालक सुहास कडलस्कर , सध्या कोलकात्यापर्यंत आपला आवाज नेणाऱ्या अलाहाबाद बँकेच्या अध्यक्ष शुभलक्ष्मी पानसे , महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानयुगाचे प्रवर्तक ठरलेले महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे संचालक डॉ . विवेक सावंत तसेच कोल्हापूरमधून हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स पुरविणाऱ्या मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या अश्विनी दानीगोंड या पुरस्कारप्राप्त उद्योगपतींच्या यशोगाथांना मॅक्सेल पुरस्कारांच्या रुपाने उपस्थितांनी मनःपूर्वक दाद दिली

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स.

Friday, May 3, 2013

उद्योग क्षेत्रातील कर्तृत्वाचा गौरव - मॅक्सेल अवॉर्डस 2013.

महाराष्ट्र टाईम्स दि. 3 मे 2013:   उद्योग क्षेत्रात आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने विविध शिखरे गाठणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योजकांच्या कार्याचा गौरव ' मॅक्सेल फाउंडेशन ' ही ' ना नफा ' तत्त्वावरील धर्मादाय संस्था करीत असून , त्याअंतर्गत येत्या १२ मे रोजी मुंबईत ' मॅक्सेल अॅवार्ड्स ' प्रदान करण्यात येणार आहेत .

या कर्तृत्ववान उद्योजकांचा वारसा पुढील पिढीला मिळावा व उद्याचा सक्षम महाराष्ट्र घडावा या उद्देशाने ' मॅक्सेल फाउंडेशन ' हे पुरस्कार देत आहे . ' मॅक्सेल अॅवार्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स ' ची संकल्पना कॉर्पोरेट लॉयर व ' मॅक्सेल फाउन्डेशन ' चे संस्थापक - व्यवस्थापकीय विश्वस्त नितीन पोतदार यांनी मागील वर्षी मांडली व शास्त्रज्ञ डॉ . रघुनाथ माशेलकर , निवृत्त न्याधीश अरविंद सावंत , अमेरिकेतील उद्योगपती सुनील देशमुख , ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर ,  L&T Finance Holdingsचे चेअरमन वाय एम देवस्थळी  यांच्या सल्लागार मंडळाने ती उचलून धरली .

यंदाच्या ' मॅक्सेल अॅवार्ड्स ' चे मानकरी असेः ' मॅक्सेल लाइफटाइम अचिव्हमेन्ट अॅवार्ड ' हा जीवनगौरव पुरस्कार प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यांना जाहीर झाला आहे . श्री . चौधरी यांची गणना नवनव्या कल्पनांना जन्म देणारे ' मास्टरमाइंड ' म्हणून केली जाते . गेली ३५ वर्षे ते व्यवसाय आणि उद्योजकतेची नवनवी शिखरे पादाक्रांत करीत आहेत . जगप्रसिद्ध ' फोर्ब्स ' नियतकालिकानेही ' प्राज ' ला ' बेस्ट इन एशिया ' या सन्मानाने गौरविले आहे .
' मॅक्सेल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन बिझनेस लीडरशिप ' या पुरस्कारासाठी ' मर्सिडिज बेन्झ इंडिया ' चे कॉर्पोरेट व्यवहार व मनुष्यबळ विकास विभागाचे संचालक सुहास कडलासकर व अलाहाबाद बँकेच्या विद्यमान अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका शुभलक्ष्मी पानसे यांची निवड करण्यात आली आहे . कडलासकर यांना ' वर्ल्ड एचआरडी काँग्रेस ' मध्ये त्यांना ' फ्लेम ' हा गौरवशाली पुरस्कार मिळालेला आहे . श्रीमती पानसे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून सेवेला प्रारंभ केला होता .

' मॅक्सेल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन आन्त्रप्रेन्युअरशिप ' या पुरस्कारांसाठी उद्योजक दीपक गद्रे व सुहास काकडे यांची निवड करण्यात आली आहे . श्री . गद्रे यांना आतापर्यंत सात वेळा राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची सागरी निर्यातीबद्दलची ' मरिन एक्स्पोर्ट्स ' पारितोषिके मिळाली आहेत . ' कॉर्पोरेट मॅनेजमेन्ट ' च्या विस्ताराला सखोलतेला अनेक पैलू प्राप्त करून देणारे काकडे ' युएस एअरोटीम ', ओहायो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत .
' मॅक्सेल अॅवार्ड फॉर एक्सलन्स इन इनोव्हेशन ' पुरस्कारासाठी विवेक सावंत व श्रीमती अश्विनी दानीगोंड यांची निवड करण्यात आली आहे . श्री . सावंत यांच्या नेतृत्वाखाली ' महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ' ने मोठी झेप घेतली असून महाराष्ट्रात ' आयटी ' शिक्षण व ' ई लर्निंग ' चे जाळे विणण्यात यश मिळविले आहे . ' मनोरमा इन्फोसोल्युशन्स ' च्या अध्यक्षा अश्विनी दानीगोंड यांना ' बेस्ट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रोव्हायडर ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त मिळालेला आहे .

पुरस्कार सोहळा

' मॅक्सेल फाउंडेशन ' चे हे पुरस्कार येत्या रविवारी नरीमन पॉइन्ट येथील ' एनसीपीए ' संकुलातील जमशेद भाभा थिएटरमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या समारंभात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून पद्मभूषण डॉ . रघुनाथ माशेलकर यांचे यावेळी बीजभाषण होईल . हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच आहे .

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स दि.3 मे 2013.