Friday, May 31, 2013

राष्ट्रीय चारित्र्य ?

मुंबई सकाळ 31 मे 2013 Good Morning: शनिवार आणि रविवारी अहमदाबादला काही कामा निमित्ताने गेलो होतो.  संपुर्ण दिवस आयपीएलच्या बातम्यांनी डोक बधिर केले होतं, म्हणुन म्हटंल संध्याकाळी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमास जाऊन येऊ.   सायंकाळचे सात वाजले होते अंधार होता तरी तेथिल सुरक्षा रक्षकाने मला जाऊ दिलं... वीज निर्मितीत आज गुजरात राज्य सरप्लस असताना गांधीजींच्या घरात अंधार कसा, मी त्या सुरक्षा रक्षकाला थोडा नाराजीच्या स्वरात प्रश्न विचारला, तो चेहर्र्यावर कसलाही ताण ना आणता म्हणाला इधर ऐसाही है....

त्या आयपीएलच्या अंधाराचा मी आणखी वेध घेण्याचा प्रयत्न केला.   माझ्या पिढीचं बोलायचं झालं तर मी भ्रष्टाचाराची सुरुवात हर्षद मेहता आणि केतन पारिख यांनी केलेला स्टॉक एक्सचेंज मधील घोटाळा पाहिली पुढे  टु-जी,  कॉमन वेल्थ, तेलगी, सत्यम, बोफोर्स, चारा (फॉडर), संसदेतला कॅश-फॉर-वोट, आदर्श गृह संकुल, हवाला आणि कालचा आयपीएल... सत्ते मधे असलेल्या काही मुठ भर लोकांनी अती श्रीमंतांच्या जोडीने केलेला हजारो लाखो कोटींचा घोटाळा आज न्युज चॅनेल्स आणि वृतपत्रातुन बघितला की संपुर्ण देशच हा आकंठ भ्रष्टाचारात बुडाला आहे का?  असा प्रश्न कुणलाही पडेल.   त्यांच्या बरोबरीने रॅशन ऑफिस, महानगर पालिका ते मंत्रालय आणि शेवटी सिग्नलवर उभा असलेल्या ट्रॅफिक हवालदारा पर्यंत इथंला प्रत्येक माणुस हा पैसे खाणारच अशी आपली समजुत झालेली आहे?  खरचं आपला संपुर्ण देशच भ्रष्ट आहे का?  आणि या पुढे आपण एक भ्रष्टाचारी देश म्हणुन ओळखले जाउ का?   आपलं राष्ट्रीय चारित्र्य खरचं इतक वाईट होत चाललं आहे का? 

‘राष्ट्रीय चारित्र्य’ या मुलभूत संकल्पनेत एका विशिष्ट देशातील जनतेच्या सामूहिक चारित्र्याचा संबंध येतो.  प्रत्येक व्यक्तीचे जीवनातील अग्रक्रम वेगळे असतात.   गांधीजी म्हणत की मन हे चंचल पक्षाप्रमाणे आहे.  त्याला जितके जास्त मिळते, त्याहीपेक्षा जास्त त्याला सतत हवं असते.  त्यामुळे मला वाटते.  की, समाधानी वृत्ती ही सुखाचा मूळ स्रोत आहे.    गांधीजी पुढे जाउन अस म्हणाले की समाज आणि व्यक्ती यांच्यात कोणतीही समस्या आणि विसंगती नाही.  समाजने प्रत्येक व्यक्तिच्या विकासाचा व उन्नातीचा मार्ग सोपा करण्यासाठी मदत केली पाहिजे.  परंतु त्याच वेळी व्यक्तिगत विकास हा समाजाच्या कल्याणाशी मेळ घेतलेला असला पाहिजे.”   जीवनात काय मोलाचे मानायचे, कशाला किती महत्व द्यायचे, कशाकडे दुर्लक्ष करायचे, कोणत्या बाबतीत तडजोड करायची किंवा करायची नाही याचे व्यक्तीगणिक उत्तर भिन्न असणार.  मात्र जेंंव्हा सामूहिक स्तरावरचे धोरण ठरवायचे असते, राष्ट्राच्या जीवनाशी संबंधीत निर्णय घ्यायचे असतात, आगामी पिढ्यांचा विचार करायचा असतो, आणि देशाच्या उन्नतीचा मार्ग ठरवायचा असतो तेव्हा  व्यक्तीगत मूल्ये- आवडीनिवडी- विचाराग्रह पूर्णतः दूर ठेवले गेले पाहिजे.  तसे केले नाही तर सामाजिक हिताच्या आड व्यक्तीगत हिताचा विचार येऊन देशाचं अपरिमित अहित होऊ शकते... अशा विचारालाच राष्ट्रीय विचार म्हणता येईल.
राष्ट्रीय स्तरावरचे निर्णय केवळ सरकार घेते वा तसे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त सरकारला असतो असे मानणे चूकीचे आहे.  त्याचा अर्थ आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो असा होईल.  देशाचा विचार हा माझ्या संदर्भातीलच विचार आहे आणि त्याचा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जगण्याशी संबंध आहे अशी जाणीव मनात जागती राहाण्यातच राष्ट्रीय हिताचा विचार सामावलेला आहे. असतो.
या प्रकारचा ‘नॅशनल सेन्स’ किंवा इतर अनेक प्रगत देशांत दिसते तशी ‘सोशो-नॅशनल कमिटमेन्ट’ आपल्याकडे दिसते का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील राष्ट्रीयतेची भावना ही टप्या-टप्याने लोप पावत गेलेली दिसते?  आपण राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्याच्या स्तरावरच्या महत्वाच्या घडामोडींवर मूग गिळून का बसतो? आपली राष्ट्रीयत्वाची भावना केवळ दिखाऊ आणि उत्सवी होते आहे का? ... आपण प्रसंगापुरतेच राष्ट्रीय असतो का?  देशाबद्दल आपण फारच उदासीन झालो आहोत का?  आपण फारच स्वार्थी झालो आहोत का?  एकुणचं राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव हा आपला आपल्या महान देशाएवढाच महान दोष होऊ पाहत आहे का?   अजुन तरी पुर्ण अंधार झालेला नसावा!
nitinpotdar@yahoo.com

सौजन्य मुंबई सकाळ

No comments: