Friday, May 24, 2013

Cricket is not the game for silent spectators..


मुंबई सकाळ 24 मे 2013 Good Morning: क्रिकेट हा कधीतरी सभ्य लोकांचा खेळ होता आणि कधीतरी देशोदेशीचे खेळाडू जीवाचे रान करून या खेळाला अधिकाधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी झटत होते ही आज केवळ एक ऐतिहासिक अफवा ठरली आहे... साहेबांच्या खेळाची इतकी वाईट अवस्था आज खरचं बघवत नाहीय.  माझ्या पिढीने अजित वाडेकरांचे यश्स्वी नेतृत्व पाहिले, नंतर सुनिल गावस्करची स्ट्रेट ड्राईव्ह पाहिली, चंद्रा बेदी आणि प्रसन्नाच्या फिरकीची जादु पाहिली... आणि फॉर्वर्ड शॉर्ट-लेगला जिवाची पर्वा नकरणारा एकनाथ सोलकर बघितला!  कॉमेंट्री बॉक्स मधे आपल्या करारी शब्दांची सिक्सर मारणारे विजय मर्चंट... खरोखरं सोन्याचे दिवस!  मला वाटतं 1984 साली कपिल देव ने वर्ल्ड-कप जिंकल्यानंतर आपले क्रिकेट्पटु हळू हळू क्रिकेट सोडुन सर्व काही करायला लागले आणि तिथंच घात झाला त्याला एकमेव अपवाद फक्त होता तो म्हणजे सचिन तेंडूलकर!   
आयपीएलच्या नावाखाली या सभ्य खेळाचे जेव्हा पद्धतशीर व्यापारीकरण सुरु झाले तेव्हांच त्याच्या सुसंस्कृततेची आणि बाळबोध सभ्यतेची मृत्यूघंटा वाजायला सुरुवात झाली. गेल्या दशकात ही मृत्यूघंटा इतक्या उच्च स्वरात वाजायला लागली की ‘क्रिकेट म्हणजे सर्व अनाचारांचं आगर, महाआगार’ ही नवी व्याख्या म्हणा वा नवी ओळख रुजायला सुरुवात झाली. यंदाची आयपीएल आयोजित सहावी क्रिकेट स्पर्धा म्हणजे या खेळाच्या सर्वंकष अधोगतीची अगदी पक्की अदा आहे..  
‘राजस्थान रॉयल’चे पकडण्यात आलेले तीन खेळाडू हे हिमनगाचे टोक आहे असेही म्हणवत नाही, याचे कारण हा हिमनग एवढा महाकाय आहे की त्याचे दिसणारे-असणारे टोक इतके क्षुल्लक असूच शकत नाही.  क्रिकेटमधला अतिरिक्त पैसा आणि त्याच्या पटीत वाढणारे अनाचार, त्याविषयी रकाने भरभरून येणारा चित्तथरारक मजकूर, ज्यांना अटक झाली त्यांनी उपयोगात आणलेली सिग्नल यंत्रणा आणि केलेली बेताल खरेदी पाहिली की भाबडा क्रिकेट रसिक पार चक्रावून जाण्यापेक्षा पण हताशही होतो आहे. अर्थात त्याची ही हताशतासुद्धा खोटी, पोकळ आणि दांभिक ठरते आहे.
तो खराच हताश आणि झालेल्या फसवणूकीमुळे व्यथित असता तर तो प्रत्यक्षात वेगळा वागला असता.  पण आज जे चित्र दिसते आहे ते विपरीत आहे.   क्रिकेटचा चाहता वर्ग म्हणा की ग्राहकवर्ग म्हणा तो इतका बदलला आहे की त्याचे लक्ष खेळापेक्षा त्या खेळाशी निगडीत जी बाजारपेठ उदयाला आली आहे तिचा एक अपरिहार्य घटक होण्यात गुंतले आहे. शुद्ध स्वरूपातल्या खेळाची त्याची अपेक्षा आज इतकी विकृत झाली आहे की आपण बघतो आहोत ते क्रिकेटचे मोठे सोंग आहे याची जाणीवच त्याला उरलेली नाही...पाच दिवसांच्या मॅच वरुन  आपण घसरलो ते थेट चार तासांच्या टुकार सिनेमां पेक्षाही वाईट अस्वथेत.  
आज जगभरातले आणि भारतातले क्रिकेट हा सगळी सभ्यता बासनात गुंडाळून ठेवणारा आणि काही लाख कोटींची उलाढाल करणारा एक जुगाराचा खेळ झाला आहे.  क्रिकेट हे क्रिकेट न राहता ते  काळ्या पैशाचे व्यवस्थापन करणारे आणि अक्षरशः मूठभरांची समृद्धी गगनाला नेणारे माध्यम झाले आहे.  ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’, बीसीसीआय, क्रिकेटच्या सर्व शाखा, सर्व क्लब्जनां त्यांच्या पदधिकार्र्यांना  याची काहीच कल्पना नव्हती असं जर कुणी म्हणत असेल तर ते या देशाच मोठं दुर्दैव! 
खरे तर खेळ खेळाच्या परंपरेत आणि चौकटीतच राहायला हवा.  क्रिकेट लोकप्रिय आहे म्हणून त्याच्या मूळ चौकटीला धक्का लावणे, त्याचे नियम हवे तसे वाकवणे, त्यात मनमानी बदल करणे, कसोटीला लोक कंटाळले आहेत अशी हाकाटी करून चार तासांच्या टी-20 सारख्या थिल्लर प्रकारांचा सिलसिला रुजवणे हाच मूळात नैतिक अपराध आहे.   हे आपल्याकडे झाले कारण तशी बाजाराची आणि सट्टेबाजांची मागणी होती आणि आहेही.  आपण त्या खेळाच्या परंपरेचा आणि तिच्याशी निगडीत सभ्यतेचा, नैतिकतेचा राजरोस  खून करून उजळपणे वावरतो आहोत. त्याला आपले जुने विश्वविख्यात आणि चारित्र्यवान खेळाडूही विरोध करत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे...  आज विजय मर्चंट असते तर ते नक्कीच कडाडले असते की....Cricket is not the game for silent spectators.  I will not allow it to get killed in the hands of unscrupulous people.  Let’s get together and fight this out.


No comments: