Friday, June 7, 2013

'टाप'ला गेलेला बाप माणूस


मुंबई सकाळ 7 जुन 2013 Good Morning:  डॉ. नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आमचा बाप आन आम्ही या आत्मचरित्राच्या आजपर्यंत  १६१  आवृत्या म्हणजे १, ६०,०००  प्रती  विकल्या गेल्या आहेत.  मराठी साहित्यात एकजात सारे विक्रम मोडून काढणाऱ्या  या पुस्तकाचा  आजवर देशी आणि परदेशी अशा वीस  भाषांमधे अनुवाद झाला असून, त्याच्या सुमारे सहा लाखांहून अधिक प्रती  जगभर विकल्या गेल्या आहेत.... परवा २ जूनला  त्यांच्या षष्ट्याब्दीपूर्तिच्या निमित्ताने प्रस्तुत  पुस्तकाची १६१ वी आवृती प्रकाशित झाली आणि त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं याचा मला अतिशय आनंद झाला. जगभर नावाजलेला एक मराठी लेखक म्हणून डॉ. नरेंद्र जाधव यांच्या विषयी आदर आणि अभिमानही वाटला. जगातील नाना भाषिक वाचकांना परस्परांशी ‘कनेक्ट’ करणारा असा लेखक विरळा!  
मुंबई विद्यापीठातून १९७६ साली संख्याशात्र या विषयात बी.एस्सी (फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन); पुढे अर्थशास्त्रात एम. ए; आधी स्टेट बॅंकेत (तीन वर्ष) आणि पुढे रिझर्व्ह बॅंकेत तब्बल तीन दशके नोकरी (तरूण रिसर्च ऑफिसर म्हणुन विक्रम);  त्यातच नॅशनल स्कॉलरशिप घेउन अमेरिकेच्या ‘इंडियाना विद्यापीठात अर्थशास्त्रातील डॉक्टरेट (तिथं सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून विशेष बहुमान प्राप्त ) – मोहमायी अमेरिकेत उत्कर्षाच्या अनेक संधी हात जोडून समोर उभ्या असताना मातृभूमी आणि कौटुंबिक ऋणानुबंध यांना पर्याय नसतो म्हणून डॉ. जाधव  मायदेशी परत आले.  पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक वित्तसंस्थेमध्ये  साडेचार वर्ष आर्थिक सल्लागार म्हणून भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी अतिशय प्रभावीपणे केले.  इथोओपिया व अफगाणिस्तान यासारख्या मागासलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी तेथे  महत्वपूर्ण कामगिरी बजावली. अर्थशास्त्र आणि सामाजिक विषयांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये एकुण बारा ग्रंथ आणि  वेगवेगळ्या विषयांवर शंभरपेक्षा जास्त शोधनिबंध ही त्यांची मोठीच कामगिरी मानावी लागेल. आणि महत्वाचे म्हणजे कवितेवर निस्सीम प्रेम असलेल्या जाधवांनी ‘रवींद्रनाथ  टागोर-समग्र जीवनदर्शन’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे’ ही महत्वपूर्ण  ग्रंथसंपदा मनस्वीपणे निर्माण करून एक मोठे योगदान दिले आहे.  सध्या केंद्रीय नियोजन आयोग (अध्यक्ष: डॉ. मनमोहन सिंग) तसेच राष्ट्रीय सल्लागार परिषद (अध्यक्षा: श्रीमती सोनिया गांधी) या दोन शिखर संस्थांचे ते सन्माननीय सदस्य आहेत. या दोन नेमणूकींतून डॉ. जाधवांचे देशातील स्थान पुरेसे स्पष्ट होते.


काल बारावी आणि उद्या दहावीचे निकाल आहेत, अशा वेळी डॉ. नरेंद्र जाधवाना पुढे हिमालयाइतक्या उतुंग कर्तृत्वाची प्रेरणा काय असेल? काय होती? त्यांच्याच शब्दात सांगायचं तर.. ( अर्थात ‘आमचा बाप आन आम्ही’ चा आधार घेऊन)........

“…मी शाळेत असताना पहिला नंबर पटकावू लागलो.  त्यावेळी घरी येणाऱ्या – जाणाऱ्यांचा  एका प्रश्न ठरलेला असायचा – “तू मोठेपनी कोन व्हनार?”  त्या वयातील मुले या प्रश्नाला सर्वसाधारणपणे जसे गुळमुळीत उत्तर देतात तसेच मीही देत असे.  एकदा मोठ्या भावाने (जे. डी. जाधव) विचारले, तेव्हा मात्र  प्रामाणिकपणे, मला लेखक व्हायचंय” म्हणून मी सांगितले.  ते ऐकून त्याचा केहरा कडू झाला.  अरेरे, याला भीक मागावी लागणार” असेच काहीतरी तो म्हणाला.
त्यानंतर काही दिवसांनी दादांनी (डॉ. नरेंद्र जाधवांच्या वडिलांनी) मला जवळ बोलावले आणि म्हणाले, “ह्ये बघ, तुला लोका सांगतील; तू डॉक्टर व्हय, इंजनेर व्हय,  बालिस्टर व्हय.  पन तू कुनाचं काय आयकू नको.  तू तुझ्या बुद्दीला योग्य वाटंल तेच होन्याचा प्रयत्न कर.  मीबी तुला सांगनार नही, आमुकच व्हय का धमुकच व्हय. माझं म्हननं एवढंच हाये  का तू जे करशील तेच्यात टापला जायला पायजे.  तुला चोर व्हायचं? कोई बात नही!  पण मग असा चोर व्ह, का दुनियानं सलाम केला पायजे.  तुला जुगार खेळायची? हरकत नाही,पण मग असा आट्टल जुगारी हो का सगळे लोक बोलले पाहिजे, इसको बोलता है जुगारी!”  थोडक्यात समाधान मानून गप्प बसायचं नही. काय?” 

“दादांचे  हे रांगडे तत्वज्ञान हळुहळु कळत गेले.  मनात झिरपत गेले.  आता तर ते मनात घर करुन बसले आहे.” असं डॉ. नरेंद्र जाधव म्हणतात. मला वाटतं,  शेवटी, सर्च फॉर एक्सलन्स  म्हणजे तरी काय वेगळं असतं? हेच ना? लेखक होईन म्हटल्यानंतर याला भिकेचे डोहाळे लागलेत”  म्हणणारा उच्चविद्याविभूषित भाऊ आणि “काय वाट्टेल ते कर, पण टापला जायचा प्रयत्न कर”  म्हणणारे अशिक्षित वडील,  यांच्यात खर्र्याअर्थाने व्यापक दृष्टिकोन कोणाचा?
मित्रांनो, डॉ. नरेंद्र जाधव यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर ते खऱ्या  अर्थाने ठरले आहेत एक ‘राजहंस’!

टीप: २०१०  साली माझ्या ‘प्रगतीच्या एक्सप्रेस वे’ पुस्तकाच्या प्रकाशनला डॉ. नरेंद्र जाधव हे  माझी तशी कुठलीही ओळख नसताना अगत्याने आले होते.  सर, त्या समारंभात तुमच्याशी जास्त बोलता आलं नव्हतं; पण गेल्या रविवारी मुंबई ते दिल्ली विमान प्रवासात तुमच्या शेजारी बसून तुम्हाला मनसोक्त ऐकता आलं आणि  ‘टापला जायची’ प्रेरणा मिळाली... हा आपल्या भेटीचा ठेवा मला फार अनमोल वाटतो!       
nitinpotdar@yahoo.com

No comments: