Friday, June 14, 2013

अमर्त्य सेन आणि आपला देश..

मुंबई सकाळ 14 जुन 2013 Good Morning:   नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी  जर्मनी येथे आयोजित ‘ आंतरराष्ट्रीय वाहतूक परिषदे’चे उदघाटन करत असतांना फार मोलाचे विधान केले.  ते असं म्हणाले की, “कोणत्याही राष्ट्राच्या धोरणांची आंखणी आणि अंमलबजावणी करतांना केवळ तिथल्या सरकारला काय  हवे आहे  याचा विचार करून चालणार नाही;  तर त्या देशातील जनतेला काय हवे आहे त्याला प्राधान्य दिलेच पाहिजे!”  हे विधान करतांना त्यांच्या नजरेपुढे त्यांची मातृभूमी- अर्थात भारत- तर आहेच, पण अन्य विकासशील आणि विकसित देशही असणार.  

लोकांना काय हवं आहे ते लोकांनी सरकारला सांगावे आणि त्यानुसार विकासाची धोरणे आणि गती सरकारने ठरवावी, लोकांना हव्या असलेल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम सरकारने जाणावा अशी अमर्त्य सेन यांची सूचना आहे. “जनतेला प्राधान्याने अधिक शाळा, अधिक महाविद्यालये, आरोग्यकेंद्रे, उत्तम दर्जाचा सकस आहार या गोष्टी हव्या असतील तर सरकारने त्यानुसार धोरणे आखली पाहिजेत” असे सेन यांना वाटते. प्रश्न असा आहे की लोकांनी सरकारला सागांवे म्हणजे नेमकं कुणी सांगायचे? 


आपल्या देशात आरोग्य, शिक्षण, वाहतूकीच्या सोयी आणि सर्वांना अन्न यांची अवस्था आजही चिंताजनक असताना आपल्या सरकारचे धोरण लोकाभिमुख आणि विकासाचे आहे अस म्हणता यईल का? या देशातील किमान अर्धी जनता आजही दिवसातून एकदाच जेवतात किंवा पाणी (शुद्ध नव्हे) पिऊन झोपतात.  देशाचा विकासदर 5 टक्क्या वरुन 9 टक्के झाला काय आणि तिथुन तो परत 5 टक्के खाली गेला काय, व सोन्याचा भाव वीस हजार झाला काय की तीस हजार, त्यांच्या रोजच्या जगण्यात कणमात्रही फरक पडत नाही.  हे असे का व्हावे? आपण नेमकं केंव्हा आणि कुठं चुकलो?  आणि मुख्य म्हणजे हे सारं बदलणार कधी आणि कसं ...
हा लेख लिहित असताना संदीप वासलेकरांनी लिहिलेल्या एका दिशेचा शोध ह्या पुस्तकांत दिलेली एक गोष्ट आठवली ती खाली देत आहे...

“एका तळ्याकाठी जवळपास शंभर माकडे रताळी खात बसली होती.  रताळ्याला लागलेल्या मातीसह माकडे ती रताळी खात होती.  चुकुन एका माकडिणीच्या हातून एक रताळे तळ्यात पडले.  पाण्यातुन रताळं काढताना पुन्हा ते पाण्यात पडले आणि तेंव्हा पाण्याने आपोआपच ते स्वच्छ झाले.  माकडिणीला स्वच्छ रताळ्याची चवं आवडली.  तिने दुसरे रताळे स्वत:च पाण्यात टाकले.  स्वच्छ झाल्यावर चवीने खाल्ले.  तिचा अविर्भाव पाहून दुसर्र्या माकडिणीने  रताळे पाण्यात टाकले.  तिलाही त्याची चव आवडली.  मग तिने सुद्दा रताळी धुवुन खायला सुरुवात केली.
हळु हळु तिसरे, चौथे व पाचवे माकड पहिल्या दोन माकडिणींना बघुन पाण्यात रताळी टाकुन स्वच्छ्  करुन खाऊ लागली. ज्या माकडांनी पहिल्या शंभर माकडांना रताळे धुताना पाहिले नव्हते, त्यांनाही सवय लागली.  काही आठवड्यांनी  इतर बेटांवरील माकडेही रताळे धुऊन खाऊ लागली.  काही महिन्यांत ही नवीन सवय संपुर्ण प्रदेशभर पसरली व माकडांची रताळे खाण्याची पध्दत कायमची बदलली.”  वासलेकर म्हणतात अस्वच्छ राजकारण, घोटाळ्यांचे अर्थकारणं आणि घाणेरडी रताळी यांत फरक काहीच नाही.  आपल्याला त्यांची जणू सवय झाली आहे.  काहीजणांनी जरी ती नकारली, तरी हळूहळू ही सवय सर्वत्र  पसरेल. 

आपण रोज वृतपत्र वाचतो आणि भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचुन निराश होतो, त्रागा करतो, पण त्यावर साधं एक पत्र किंवा दोन ओळींचा ईमेल कुणाला पाठवित नाही.  वाईट गोष्टींच जाऊद्या पण कुठली ही चांगली बातमी वाचली तरी आपण कुणाचं अभिनंदन करायला साधा एक फोन करीत नाहे.  समाजात एक चांगल नागरिक म्हणुन आपण आपलं कर्तव्य मुळीच पार पाडत नाही, कदाचित हीच खंत डॉ. अमर्त्य सेन यांनी बोलुन दाखविली असेल. 
आज गल्लीतला नेता मंत्रालयाकडे आणि विधानसभेतला आमदार दिल्लीकडे बघत चालण्यात मग्न आहे;  मी आणि फक्त माझेच असा एक कलमी कार्यक्रम सगळ्या सस्तरावर सुरु असताना अमर्त्यबाबूंच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे....कसली योजना आणि कुणाचा विकास?  ..सामान्य माणसांनी निदान 2014 सालीतरी रताळी धुऊन घ्यावी. 

No comments: