Friday, July 12, 2013

वर्तन-परिवर्तन..आणि बिघडलेली स्थिती?

मुंबई सकाळ  12 जुलै 2013 Good Morning:  शिक्षणातून वर्तन परिवर्तन

साध्य होणे अपेक्षित असताना आज समाजात अत्यंत बिघडलेली स्थिती पहायला मिळते, अशी खंत सुप्रीम कोर्टाने मागच्या आठवड्यात व्यक्त केली.  पुर्वीच्या काळात साक्षरतेचं प्रमाण फारसे नसतानाही मानवी मूल्यांना किंमत होती.  1947 साली साक्षरतेचे प्रमाणं 12 टक्के होते आणि कालांतराने देशात सामाजिक आणि आर्थिक बदल झाले आणि 2011च्या जनग़णनेत साक्षरतेचा दर 74.04 टक्के इतका झाला.  74.04 टक्के लोकं साक्षर असताना देखील अशा व्यक्तिंकडून अपेक्षित असलेल्या वर्तनाच्या पहिला टप्पातही अजुन आपण पोहोचलेलो नाही अशी खंत कोर्टाने व्यक्त केली.  शिक्षणं व्यवस्था आपली अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करण्यात अपयशी ठरली म्हणून शिक्षणसंस्था, शिक्षक, पालक, विद्दार्थी आणि समाजाने पुढाकार घेऊन संपूर्ण व्यवस्था बदलण्याची गरज आहे असं कोर्टाला वाटते. 

बिघडलेली स्थिती म्हणतो म्हणजे नेमकं काय? तर समाजात सर्व स्तरात आणि सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पसरलेला भ्रष्टाचार;  महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, कुपोषणं, दहशतवादी हल्ले, गगनाला भिडलेली महागाई त्यात मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप, आणि मोटारगाड्यांचे रोज बदलणारे मॉडेल्स आणि स्टेटससाठी वाढवलेल्या आपल्या गरजा!  चुकीच्या शिक्षणं पद्दतीमुळे तयार झालेल्या बेरोजगारांच्या फौजा,  टिव्ही चॅनेल्स वरुन सतत दाखविल्या जाणार्‍या भडक बातम्या...  घर आणि लग्न या संस्थेलाच सुरुंग लावणार्‍या सासु-सुनांच्या टिव्ही सिरियल्स!   इंटरनेटच्या माध्यमातून वाहणारी माहिती आणि सोशल-वेबसाईट्स वरुन तरूणांमधे तयार होणारे तकलादू नाते संबध, त्यांचे विचार आणि जनमत.  म्हणजे भ्रष्टाचार, महगाई, तरूणांना आलेलं अपयश आणि माणसांच अनैतिक वागणं म्हणजे मानवी मुल्यांची घसरणं!  या अर्थाने एकुणचं स्थिती बिघडलेली आहे असं आपण समजतो.  खरचं स्थिती इतकी भयावहं आहे का? याला आपण स्वत: किती जबादबार आहोत?  आणि हे सगळं फक्त शिक्षणं पद्दती बदलून होणार आहे का?  

आता आपण जेंव्हा पुर्वीचा काळ अस म्हणतो तेंव्हा आपण 1947 आधीचा काळ म्हणतो का?  तस असेल तर तेंव्हा तर फारच भयानक चालीरिती होत्या उदा: अस्पृश्यता, बाल विवाह, विधवा स्त्रियांवर असणारी बंधने ते पाहता उलट आजचा काळ चांगला आहे असच म्हणायला पाहिजे.  तेंव्हा तर अस्पृश्यतेचा कळस होता! आता पुर्वीचा काळ म्हणजे जर आपण 1947 नंतर आणि 1991च्या आधीचा असं म्हणत असु तर तेंव्हा सुद्दा आपली सामाजिक स्थिती जेमतेम सुधारत होती;  1991साली आपण आर्थिक उदारीकरणाला परवानगी दिली, पुढे जागतिकीकरणं आणि माहिती आणि तंज्ञानाच युग आलं आणि आपल्या देशातच नव्हे तर संपुर्ण जगात एक नविन अर्थव्यवस्था अस्तितवात आली.  त्यात सर्विस सेकटरने आपल्या देशात लाखो नविन रोजगार उपलब्ध करुन दिले.  जर 1991साली आर्थिक उदारिकरणाला परवानगी दिली नसती तर माहिती आणि तंत्रज्ञानामुळे आपण साधलेली आजची प्रगती आपण साध्यच करु शकलो नसतो.  आर्थिक उदारिकरणाला दोष देणारे या देशात भरपुर आहेत.  त्यांना मी इतकचं सांगेन की देशाची आर्थिक प्रगती म्हणजे चंगळवाद नव्हे!  कुठलीही आर्थिक प्रगती मानवी मुल्यांशी तडजोड करायला शिकवत नसते. ती आपण आपल्या बेजबाबदार वागणुकीने करीत असतो.  आपला मुलगा दर सहा महिन्याला नविन मोबाईल फोन घेतो हे अभिमानाने सांगणारे पालकच त्यांच्या मुलांचे सगळ्यात मोठे शत्रु आहेत.
आर्थिकस्थिती ही बदलतच राहणार आणि त्या बरोबर भोवतालची सामाजिक स्थिती देखील बदलणार;  आज खरा प्रश्न असा आहे की आपल्यावर कुणाचा जास्त प्रभाव आहे.  शिक्षण म्हणजे माहितीचे संकलन हा अर्थ महात्मा गांधीजींना अभिप्रेत नव्हता तर चारित्र्य-उभारणी हा होता, आणि सुप्रीम कोर्टाने आपल्याला त्याची आठवण करुन दिली इतकचं.  लोकशाहीचा चौथा स्थंभ असलेल्या वृतपत्राची जागा आज टिव्ही चॅनेल्स आणि सोशल वेबसाईट्सने घेतलेली आहे आणि त्यांचा प्रभाव आपल्यावर वाढत आहे.  मानवी मुल्यांची जपणुक आणि वर्तन-परिवर्तन हे नुसतं शिक्षणं पद्दती बदलून  साध्य होणार नाही, तर त्यासाठी कम्युनिकेशनच्या प्रत्येक माध्यमातून आणि खास करुन टिव्ही चॅनेल्स आणि सोशल वेबसाईट्सवरुन जाणिवपुर्वक प्रयत्न करावे लागतील... माहितीच्या पुरात मानवी मुल्ये वाहुन जाता कामा नयेत! 
nitinpotdar@yahoo.com

No comments: