Friday, July 19, 2013

बॉस ऑफ द साउंड..

मुंबई सकाळ  19 जुलै 2013 Good Morning:  ‘बोस कॉर्पोरेशन स्टिरिओ फोनिक साउंडच्या जगातील एक मोठं नाव!  Better sound through research हे त्यांच ब्रीद वाक्य.  बोस कॉर्पोरेशनचे बॉस अमर बोस हे खर्र्या अर्थाने साउंडाच्या जगाचे बॉस होते;  आणि त्यांच ब्रीद वाक्य ते आयुष्यभर शब्दश: जगले...

कर्तृत्ववान माणसांची जगात एक वेगळीच जातकुळी असते, एक वेगळी श्रेणी असते.  अशी माणसे कधी अत्यंत मनस्वी असतात, तर कधी ती अतिशय एकलकोंडे जीवन जगत असतात.  जगातील अनेक प्रज्ञावंत तत्ववेत्ते, शास्त्रज्ञ, महान कलावंत हे कधी एककल्ली दिसतात तर कधी विशाल समुदायात वावरत असूनही ते स्वतःच्या एका तंद्रीत जगत असतात. अशी माणसे विविध कारणांनी लक्षवेधक ठरत असतात. लोक त्यांच्याविषयी चर्चा करत राहिले तरी ही एका अर्थाने देवदत्त माणसे आपले अंगीकृत कार्य सर्व चर्चांकडे दुर्लक्ष करून एका अपार निष्ठेने कायम करत राहातात.  अशा प्रज्ञावंत आणि कर्तृत्ववंत जातकुळीत ज्यांची गणना होत होती ते ‘ बॉस ऑफ द साउंड’ म्हणून गौरवले गेलेले अमर बोस परवाच या नादाने भरलेल्या जगाचा निरोप घेऊन एका विशुद्ध महानादाचा अनुभव घेण्यासाठी प्रवासाला निघाले.  वयाच्या ८३ व्या वर्षी आपले महत्तम काम जगाच्या उपयोगी पडते आहे हे पाहात—एका कृतकृत्य भावनेने, तृप्ती आणि समाधानाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला असावा असं मानायला काही हरकत नाही.

अमर बोस हे स्वातंत्र्यसैनिक नोनी गोपाळ बोस यांचे चिरंजीव. वडील जसे भौतिक शास्त्रज्ञ तसे अमर बोस हे सुद्धा भौतिक शास्त्रज्ञच होते. अमेरिकेत जन्माला आलेल्या अमर बोस यांचे सारे शिक्षण अमेरिकेत झाले आणि पुढे आयुष्याची तब्बल चाळीस वर्ष ते जगद्विख्यात एमआयटी विद्यापीठात अध्यापन करत होते. ‘साउंड इंजीनियरिंग’ या विषयातले ते केवळ प्राध्यापक नव्हते तर एक विचक्षण असे संशोधक होते. आवाजाच्या विशुद्धतेचा ध्यास घेतलेल्या बोस यांनी त्यासाठी अथक संशोधन केले, त्यासाठी अपार चिकाटीने निरंतर कष्ट केले आणि रेडीओसह इतर ध्वनीसंबंधीत उपकरणे अधिकाधिक शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी ‘बोस कॉर्पोरेशन’ची स्थापना केली आणि आपल्या संशोधनाच्या जोरावर आपल्या विषयात अभिनव तंत्रज्ञान आणण्याचा आणि यशस्वीपणे रुजविण्याचा सर्वोत्तम यत्न केला. त्यांनी विकसित केलेल्या साउंड टेक्नोलॉजीचा अंतर्भाव असलेल्या ध्वनी-उपकरणांचा वापर आज अक्षरशः विश्वाच्या सर्व देश आणि खंडात होतो आहे. रस्त्यावर धावणाऱ्या मोटारीमधील ध्वनी- उपकरण हे जसे ‘बोस कॉर्पोरेशन’चे असते तसेच जगभरातील संगीतगृहे, सभागृहे , रेडीओ येथील ध्वनीयंत्रणाही बोसचीच असते. ध्वनीच्या शुद्धीकरणासाठी आणि त्याच्या स्वर्गीय आविष्कारासाठी अमर बोस यांनी जे संशोधन केले ते अतीव मोलाचे तर आहेच पण ते ध्वनी बद्दलचा विचार विस्तारणारे आहे. एमआयटी ही अमर बोस यांची विद्याभूमी, कर्मभूमी, संशोधनभूमी तर होतीच पण ही संस्था म्हणजे त्यांची प्रेरणा – शक्ती आणि जणू मुक्तीही होती.
महान माणसे आपल्या कार्याने महत्तेला पोहोचलेली असतात हेच खरे! अमर बोस हे थोर तर होतेच पण ते खरे संशोधनप्रेमी, विज्ञानप्रेमी आणि शिक्षणप्रेमी होते... म्हणूनच त्यांनी आपल्या कंपनीचे मोठे समभाग त्यांच्या मुलाला न देता एमआयटी या शिक्षणनिष्ठ आणि संशोधननिष्ठ संस्थेच्या नावे करून ठेवले.  या गडगंज निधीतून या संस्थेत विविध प्रकारचे संशोधन आणि शिक्षण प्रकल्प हाती घेतले जावेत आणि मानवपयोगी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी नवी शिखरे गाठावीत अशी कल्पना आहे. एक विद्यार्थी, तळमळीचा संशोधक, जगाच्या उन्नततेची आणि विशुद्धतेची आकांक्षा बाळगणारा नागरिक-शिक्षक यापेक्षा अधिक काय बरं करू शकेल?.  

आपल्या देशातले उद्योगपती, अति धनवान सरकारी अधिकारी, नामवंत राजकारणी , अल्पावधीत अब्जोपती होणारे महान खेळाडू संशोधनासाठी, शिक्षणासाठी अशी दानशूरता कधी दाखवतील का?  आपण पुढच्यापिढीचं काहीतरी देणं लागतो हे त्यांना कधी तरी समजेल का?  निदान अमर बोस यांच्या कार्याचा आतला आवाज  त्यांच्या पर्यंत पोहोचेल, हीच अपेक्षा!

nitinpotdar@yahoo.com

No comments: