Friday, August 30, 2013

माझं Tweet...अमेरिका अमेरिकंस आणि आपण

30 ऑगस्त 2013:  मित्रांनो तीन आठवड्यांचा माझा अमेरिका दौरा आटपुन मी आलो, तेंव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या दु:खाच सावट मुंबईत आणि सर्व महाराष्ट्रात पसरलेलं होतं आणि अजुनही आहे..

एक विलक्षणं योगायोग म्हणा हवं तर पण मी तिथं असताना अमेरिकेच्या सुब्ततेची, तिथल्या माणसांची आणि एकुणच तिथल्या वातावरणाची आणि आपण भारतात जस राहतो त्याची नकळत का होईना पण मनातल्या मनात तुलना करीत होतो.  सगळ्यात पहिले मला अगदी प्रकर्षाने जाणवणारी गोष्टी होती, ती म्हणजे मला कुठल्याही फुटपाथवर, नाक्यावर, किंवा कुठल्याही मोठ्या इमारतीत त्यांच्या देवी दैवतांची, त्यांच्या संतांची किंवा कुठल्याही बाबा-बुआंचे देऊळं दिसलं नाही... लोक उपवास करताना, सकाळी ऑफिसला जाताना कुणाची पुजा करताना, त्यांची एखादी Prayer (आरती किंवा स्त्रोत्र) म्हणताना, मंत्र जपताना, एखादी Candle (तुपाचा किंवा तेलाचा दिवा) एखादी गरबत्ती लावताना दिसले नाहीत.   तिथं सत्यनारायणाची पुजा, ग्रह शांत, जप-मंत्र, मोठ-मोठे यज्ञ असं तिथं काहीच नसतं.  टिव्हीच्या चॅनेल्सवरुन सकाळी किंवा दिवसभारात कधीही कुठला बापु, बाबा, दादा, किंवा मॉं चे प्रवचन, भविषवाणी, संदेश, उपदेश किंवा लिंबु, नारळ, धागा दोरा यावर कुठलीही चर्चा बघायला मिळाली नाही. मग मला प्रश्न पडला कि अमेरिकन लोक नास्तिक आहेत का? काही लोकांना मी विचारायचा प्रयत्न केला तर ती म्हणली की आमचा देवावर विश्वास आहे आणि आम्ही दर रविवारी सकाळी चर्च मधे जातो बस इतकचं.  म्हणजे त्यांचा देखिल त्यांच्या देवावर विश्वास आहे पण ते त्याचा बाजार किंवा आपल्या सारख अवडंबर माजवित नाहीत इतकचं. मित्रांनो मला इथ देवावर विश्वास असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्न  मुळीच उपस्थित करायचा नाहीय.  तो एक संपुर्णपणे वेगळा विषय आहे.  माझा साधा प्रश्न आहे की आपण धर्माच्या, श्रद्ध्येच्या आणि पुजेच्या नावाखाली, नकळतपणे का होईना पण अंधश्रध्दा तर जोपासत नाही ना? आपण आपल्या देव-देवतांचा आणि आपल्या संतांचा, आपण अस्तिकअसण्याचा इतका बाजार का मांडतो? आठवड्यातुन प्रत्येक मंग़ळवारी गणपतीचा कडक उपवास करुन आणि दर मंगळवारी ऑफिसला दांडी मारुन प्रभादेवीच्या सिद्दिविनायकाला जाण्याने आपण केलेली चुकीची कामं (मी पाप म्हणतं नाही) आपल्याला माफ होणार आहेत का? देवळात मोठ-मोठ्याने आरती केल्याने, नियमित एखादी पोथी वाचल्याने, मंत्राचा उच्चार केल्याने, मी इतरांची केलेली निंदा, नालस्ती किंवा खोट बोलणं कुठला देव मला माफ करणार आहे? कामात रोज चोरी किंवा भ्रष्टाचार करुन क्मावलेल्या पैशातुन देवाला सोन्याचा मुकुट दिला किंवा हजारो रुपयांचे दान दिल्याने माझी चोरी किंवा भ्रष्टाचार कसा माफ होवु शकतो? असं कुठल्या पोथीत किंवा पुराणात कुठल्याही देवाने किंवा संतांनी असं म्हटल्याच मला तरी ठाऊक नाही?  प्रश्न असा आहे आपण साधी माणुसकी सोडुन सगळं काही करतो!   

अमेरिकेची झालेली प्रगती ठळकपणे दोन गोष्टीमुळे झालेली दिसते, एक म्हणजे अमेरिकन माणसं वेळेचे शिस्त काटेकोरपणे पाळतात, आणि दुसरं म्हणजे कुठलही काम ती लोक मनापासुन आणि आनंदाने करतात.  आपल्या कडे Indian Standard Time म्हणजे कुठलही ठिकाणी उशीराने येणे किंवा जाणे!  आणखी अगदी महत्वाच म्हणजे आपण इतरांचा आणि त्यांच्या विचारांचा आदर करतो का?  अगदी साधं उदाहरणच द्याच झाल तर - कुणालाही भेटल्यावर ओळखं असो वा नसो अमेरिकन माणसं छनसं स्मित हास्य करुन आपल स्वागत करतात.. आपल्या कडे आपण ओळखीच्या माणसाच्या तोंडावर आपल तोंड फिरवुन निघुन जातो आणि ते गर्वाने घरी सांगतो की आपल्याला अमुक अमुक भेटल्यावर आपण कस तोंड फिरवुन जिघुन गेलो. याला काही अपवाद नक्कीच आहेत. पण एकुणच आपण थोड आत्मकेंद्रित आहोत, नव्हे हल्ली जास्त होत चाललो आहोत.  हा एक प्रकारचा उगीच अभिमान (arrogance) आपल्यात आलेला दिसतो.  तस अमेरिकन माणसांना सुद्दा जगात इतर Arrogant म्हणतात! खरं तर ते त्यांच्या  विचारांबद्द्ल नेहमीच आग्रही (Aggressive) असतात असं मला वाटतं.

सर्वसाधारणंपणे आपला असा समज आहे की अमेरिकन माणसंही आपल्या कुटूंबाला  धरुन रहात नाहीत.  तिथं घटस्फोट जास्त होतात.  आई-वडिलांना मुलं सोडुन जातात.  माझ्या मते ह्या गोष्टींचा आपल्या कडे आपण संपुर्णपणे विपर्यास केले गेला आहे, याच मुख्य कारण म्हणजे आपण अमेरिका फक्त त्यांच्या टिव्ही सिरिअल्स आणि  सिनेमात मध्ये बघण्याचा प्रयत्न करतो.   तसच अमेरिकन माणस हे फारच Materialistic असतात हे ही पुर्णपणे सत्य नव्हे.   आपल्या कडिल पेज-3 (साऊथ मुंबई), आणि सास-बहुच्या टिव्ही सिरिअल्स म्हणजे मुंबई किंवा पुणे नाही,  तस न्युयॉर्कचा काही भाग म्हणजे संपुर्ण अमेरिका नव्हे...

मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की अमेरिकेची आर्थिक प्रगती आणि सुबत्ता ही काही आकाशातुन पडलेली नाही की त्यांना कुणी बक्षिस म्हणुन  दिलेली  नाही.   तिथल्या लोकांनी आणि इतर देशातुन गेलेल्या लोकांनी त्यात मोठ्या संख्येने भारतीय आणि आपली मराठी माणसं सुद्दा आहेत... या लोकांनी ही प्रगती फक्त आणि फक्त आपल्या मेहनतीने शिस्तिने आणि आनंदीवृतीने मिळवलेली आहे... आणि आपण त्याचा नक्कीच अभ्यास केला पाहिजे; या बद्दल मी जस जसा वेळ मिळेल तसं लिहीन. 

आज आपल्या अंधश्रध्दे बद्द्ल थोडं लिहावस वाटलं कारण डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा दुर्दैवी अंत....आपण कुठे चालोलो आहोत याची चिंता वाटते.   दैनिक प्रहार मध्ये त्यांचे संपादक महेश म्हात्रेंनी एक सुंदर अभ्यासपुर्ण लेख गेल्या रविवारी लिहिला.   त्यातील प्रमुख मुद्दे खाली देत आहे.... कृपाकरुन जरुर वाचावा ही विनंती.  

महत्वाची टीप: मित्रांनो मला इथ आपण वाईट आहोत किंवा कुठेतरी कमी आहोत असं सुचवायच नाहीय; पण निदान एक आत्मपरिक्षणं होणं गरजेच आहे अस मला नक्कीच वाटतं.

*********

विवेकाच्या वाटेवर असहिष्णूतेचे काटे..

महेश म्हात्रे.. (संपादक दैनिक प्रहार, मुंबई दि. 25 ऑगस्ट 2013)

वैज्ञानिक, बौद्धिक आणि नैतिकदृष्टया पुढारलेले आजचे युरोप-अमेरिकेसारखे देश ज्या काळात रानटी अवस्थेत होते, त्या काळात भारतीय समाज नीती, विवेक आणि दर्शन शास्त्रांवर विचारमंथन करीत होता, पण आज अडीच हजार वर्षानंतर ज्ञान-विज्ञानाची कास धरून युरोप-अमेरिकेने मानवी जीवनमूल्यांना उंचावलेले आहे आणि एकेकाळी चिकित्सेला प्रमाण मानणारा भारतीय समाज अज्ञानांधकारात खोल बुडत आहे.. आयुष्यभर विज्ञाननिष्ठ आणि विवेकशील समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणारे व त्यासाठी काम करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या, हे आमच्या सामाजिक अवनतीचे लज्जास्पद लक्षण आहे. जेथे विचाराचा प्रतिवाद विचाराने होण्याची प्रक्रिया थांबते, तेथे विकार आणि त्यापाठोपाठ विनाशाचे विदारक पर्व सुरू होणे अटळ असते. आज आमचा समाजही याच विनाशाच्या वाटेने चाललेला दिसतोय.

सुमारे तेराशे वर्षापूर्वी, सातव्या शतकात भारतात आलेले चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग यांनी आपल्या प्रवासवर्णनात भारताचा उल्लेख इंदूम्हणजे चंद्रअसा केला आहे. (आजही चीन वा कोरियात भारताला इंडो किंवा इंदो म्हणूनच ओळखले जाते.) त्याचे विश्लेषण करताना ते म्हणतात, ‘इंदू हा असा प्रदेश आहे की जेथे आत्म आणि अध्यात्मज्ञानाचा प्रकाश नेहमी पसरलेला दिसतो.’’ म्हणजेच कोणे एकेकाळी आपली भारतभूमी वैचारिकदृष्टया इतकी संपन्न होती की, आपल्या विचारवंतांनी मिळविलेले ज्ञान शिकण्यासाठी देश-विदेशातून विद्यार्थी भारतात येत होते. त्याउलट आहे त्या सद्य:स्थितीत आज डॉलर-युरो आणि पाउंडचे भाव गगनाला भिडत असूनही भारतातील लक्षावधी विद्यार्थी संगणक आणि विज्ञानाचे आधुनिक ज्ञान मिळविण्यासाठी इंग्लंड-अमेरिकेची वाट धरताना दिसतात. या आपल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पैशावर तिकडची विद्यापीठे चालत आहेत. दरवर्षी भारतीय विद्यार्थी फी रूपाने सुमारे २० हजार कोटी रुपये या विदेशी विद्यापीठांना देतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच प्रगत देशांमध्ये राहतात. नाही म्हणायला स्वत:चे लग्न, मुलांचे बारसे वा मुंज, गणपती आणि तत्सम कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली संस्कृती वगैरे आठवतात. ज्या पाश्चिमात्य संस्कृतीत ते रमलेले असतात तेथील विज्ञाननिष्ठ, विवेकशील, बुद्धिप्रामाण्यवादी आणि व्यक्तिनिष्ठ समाजरचनेचे सारे फायदे उठवत आमचे भारतीय लोक जगतात; परंतु त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यात मात्र ही पाश्चिमात्य विचारसरणी शिरलेली असतेच असे नाही. या पाश्चिमात्य देशात राहून धर्मश्रद्धांचा, बुवा-बाबांचा आणि रूढी-रिवाजांचा पुरस्कार करणा-या श्रीमंत-सुशिक्षितांमुळे भारतीय तरुणाईसुद्धा त्याच रूढी-श्रद्धांचा अंगीकार करते, ही वस्तुस्थिती आहे.

१९९१ नंतर देशातील अर्थकारणाने खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या बळावर वेगवान मुसंडी मारली. त्या अर्थवेगामुळे मूठभर श्रीमंतांचा वर्ग अधिक श्रीमान बनला. त्याच जोडीला मर्यादित महत्त्वाकांक्षा असणा-या मध्यमवर्गाला आर्थिक सुबत्तेने लौकिक सुखासोबत पारलौकिक सुखाचीही ओढ लावली. परिणामी भारतीय समाजकारण आणि राजकारणात धर्म आणि धार्मिक व्यक्तिमत्त्वांना महत्त्व आले. स्वातंत्र्यपूर्वकाळातील लोकलढय़ाचे प्रतीक असणारी खादी आणि गांधी टोपी यांच्याऐवजी भगवे टिळे-दाढया आणि रंगीत उपरणे यांचे दिवस आले. अगदी याच काळात धार्मिक आस्थावाढवण्यासाठी दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून विविध बुवा, बाबा आणि माताजींच्या प्रवचनांचे साग्रसंगीत कार्यक्रम सुरू झाले होते. या सा-या धर्मभावना माणसाला माणूस बनविणा-या असत्या, तर कुणाला काहीच वाटले नसते; परंतु आमच्या धर्मवादी राजकारण्यांनी, मग ते हिंदू असो वा मुस्लीम, त्यांनी दुस-यांच्या भावना न जपणा-या, न जाणणा-या धर्मतत्त्वांचाच उदो-उदो केला. त्याचे अवडंबर माजवले आणि त्यामुळेच एकेकाळी विविध धर्मविचार मानणा-या आणि जगापुढे मांडणा-या भारतात धर्माच्या नावावर भांडणा-यांची शक्ती वाढत गेली. आज त्याच विधायक मुखवटा धारण केलेल्या विघातक शक्तीने डॉ. दाभोलकर यांचा बळी घेतलेला दिसतो.

अडीच हजार वर्षापूर्वी जेव्हा महावीर आणि तथागत गौतम या दोघा तरुणांनी वेगळा धर्मविचार मांडला, त्या वेळी त्यांना विरोध झालाच होता. या दोघांच्याही आधी चार्वाकाने मानवी मूल्यांना प्रतिष्ठा देत स्वर्ग-नरकाच्या कल्पना नाकारल्या होत्या. त्यालाही सर्वतोपरी संपविण्याचे प्रयत्न झालेच होते.  भारतीय प्राच्यविद्येला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे मालवणचे सुपुत्र डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी एका ठिकाणी या विचार वैविध्याविषयी फार महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘‘स्वतंत्र बुद्धीने जगाचे वास्तव पारखणा-या एकूण ६२ विचारधारा प्राचीनकाळी भारतात अस्तित्वात होत्या. या विचारधारांमधील बहुतेक विचार इतके प्रगल्भ होते की, आधुनिक जगातील विचारवंतांनाही त्या संचितातून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.’’ थोडक्यात सांगायचे तर प्राचीन भारताला स्वतंत्र प्रज्ञेने विचार करणा-या महान विचारवंतांची परंपरा आहे. मुख्य म्हणजे स्वत:चा नवा विचार मांडताना दुस-याच्या मनाचा आणि मताचा आदर करण्याचा सभ्यसंस्कार आमच्या पूर्वजांनी जपला होता. तो हल्लीच्या स्वयंघोषित संतांकडेसुद्धा दिसत नाही, मग धर्मवादी राजकारण करणा-या नेत्या-कार्यकर्त्यांमधून आपण समजूतदारपणाची अपेक्षा कशी करणार?

अंधश्रद्धा, जातिप्रथा आणि एकूण समाजविरोधी परंपरांचा निषेध करण्याची महाराष्ट्रात एक मोठी परंपरा आहे, त्यामुळे आपल्याकडे बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार मोठया प्रमाणात झाला होता.  जैन र्तीथकर महावीर यांनीही प्रस्थापित यज्ञ-हिंसा आणि रूढीवादी परंपरांचा त्याग करून नवी त्याग-संन्यासावर आधारलेली धर्मप्रणाली पुढे आणली होती.  तपश्चर्या आणि भ्रमण करून मिळवलेल्या ज्ञानातून महावीरांनी मानवकेंद्रीत आणि मानव कल्याणकारी विचार मांडले होते. मुख्य म्हणजे महावीर हे बुद्धिप्रामाण्यवादी आणि निरीश्वरवादी होते.  आजच्या जैन मंडळींचे धर्माचरण आणि वर्तन पाहिले तर ते पटणे कठीण वाटते. अगदी तीच गत आहे, बुद्धाच्या अनुयायांची. हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून तपसिद्ध झालेल्या तथागत बुद्धाला मध्यममार्ग गवसला होता आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पहिल्याच प्रवचनात धम्म मार्गाला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीच कर्तव्य नाही, धम्माचा मरणोत्तर जीवनाशी आणि त्याच्या कर्मकांडाशीही संबंध नाहीअसे ठासून सांगितले होते. त्यांचे हे विचार म्हणजे हिंदू धर्माच्या आमूलाग्र परिवर्तनाची सुरुवात होती. विशेष म्हणजे, महावीर आणि बुद्ध यांनी यज्ञ-कर्मकांडप्रणीत हिंदू धर्मापेक्षा वेगळे विचार मांडण्यासाठी प्राकृत लोकभाषांचा आधार घेतला होता.  पुढे हीच परंपरा नाथ, दत्त, महानुभाव आणि वारकरी संप्रदायाने अंगीकारलेली दिसते. चक्रधर-ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेल्या या वैचारिक घुसळणीला जोरदार वेग दिला देहूच्या तुकाराम महाराजांनी. धर्माला व्यवहाराची बैठक देऊन तुकोबांनी प्रस्थापित ब्राह्मण-पंडितांच्या जातिबद्ध अधिकाराला आव्हान दिले. नेणती वेद श्रृति कोणी। आम्हा भाविकां वांचुनी।ही त्यांची ठाम श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेतूनच त्यांच्या कवित्वाला बहर आला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रखरता लाभली.   तुकारामांनी फक्त अंधश्रद्धांवरच हल्ला चढवला नाही, तर त्या अंधश्रद्धांचे जाळे विणणा-या आणि त्या जाळ्यात सर्वसामान्य माणसाला अडकवून त्याचे लचके तोडणा-या अवघ्या व्यवस्थेविरुद्ध रणशिंग फुंकले होते.

तुकोबांची ही शब्दनिष्ठा अपार होती, कदाचित म्हणूनच कर्मठ धर्ममरतडांनी त्यांच्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या, पण लोकगंगेने त्या अभंगांचे जतन केले. लोकांनी घरा-दारात, शेतात, मंदिरात गाता गाता तुकोबांची गाथातयार झाली. ज्या सनातनी लोकांनी तुकोबांवर हल्ले केले, त्यांचे वाङ्मय नष्ट केले, त्यांना कायमचे संपविण्याचा प्रयत्न केला, ते संपले. पण आजही दहा कोटी मराठी लोकांच्या कंठात, हृदयात आणि मनात तुकाराम अमर आहेत. सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्ञान आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे कळकळीने सांगणा-या महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचीही लढाई अशीच अटीतटीची होती; परंतु त्या थोर दाम्पत्याने सनातनी कर्मठांचे दगड-गोटे खाऊन आपले काम पुढे नेले, म्हणून महाराष्ट्राचे चारित्र्य घडले.  महात्मा फुले यांनी लोकशिक्षणाबरोबर समाजजागृतीचा कृतिशील कार्यक्रम आखला. त्यासाठी अफाट लिखाण केले, भाषणे केली. जसे तुकोबांच्या जीवावर सनातनी उठले, तसाच जोतीबांनाही संपवण्याचा प्रयत्न झाला; परंतु बहुजनांच्या उन्नतीसाठी पेटून उठलेले जोतीबा त्या हल्ल्यांमुळे डगमगले नाहीत, त्यांच्या लोकविलक्षण कामातून अनेकांना प्रेरणा मिळत गेली. छत्रपती शाहू महाराज, ‘लोकहितवादीदेशमुख, ‘सुधारककार आगरकर, ‘प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी एकाहून एक सरस नररत्ने महाराष्ट्र भूमीत जन्माला आली. त्यांनी आपल्या त्यागमय, संघर्षमय आणि विवेकशील लढय़ाने मराठी समाजाचे भले केले. बंगाल वगळता अन्य कोणत्याही प्रांतामध्ये महाराष्ट्राएवढे समाज सुधारणेचे काम झालेले नाही. कारण आपल्याला समाजाच्या सर्वच क्षेत्रांत काम करणारी माणसे लाभली. त्या माणसांनी आपले अवघे आयुष्य समाजसेवेला वाहून टाकले म्हणून महाराष्ट्र सर्व अंगाने घडत गेला. आमच्या ताराबाई मोडक-अनुताई वाघ यांनी बालवाडी-अंगणवाडीच्या शैक्षणिक प्रयोगांना सुरुवात केली आणि बालशिक्षणाकडे पाहण्याचा देशाचा दृष्टिकोन बदलला. आज फक्त महाराष्ट्रातच पाऊण लाख अंगणवाडया आहेत. आणि सर्व देशाचे पाहायला गेलो तर ती संख्या काही कोटींमध्ये जाईल. लैंगिक शिक्षणाचा पुरस्कार करणा-या र. धों. कर्वे यांच्याबद्दल बोलावे तेवढे थोडे. काळाच्या पुढे पाहणा-या र. धों.नी भारताच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी लैंगिक शिक्षण देण्याचे, जगजागृती निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले. स्वत:ची पदरमोड करून, सनातनी धर्ममरतडांच्या विरोधाला न जुमानता त्यांचे काम अथकपणे सुरूच होते. आजही अशी अनेक नावे, काही बिनचेह-याचे लोक आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोप-यात काम करीत आहेत. यापुढेही करत राहतील, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या मारणारे हात आणि डोके मात्र काळाच्या ओघात विस्मृतीत जाईल.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या सहका-यांनी गेल्या दोन दशकांत केलेले काम महाराष्ट्राला खूप उपकारक ठरले आहे. त्यांनी फक्त बुवाबाजी वा भानामतीला विरोध केला नाही, तर त्यांनी माणसाच्या दुर्बल मनांना विवेकाचे बळ देण्याचाही प्रयत्न केला. प्रश्न मनाचेया डॉ. हमीद आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या पिता-पुत्रांनी लिहिलेल्या पुस्तकात मानसिक रोगांचा सांगोपांग विचार केलेला आहे. मनोविकारांवर काबू मिळविल्याशिवाय अंधश्रद्धा कमी होणार नाही. कारण दुर्बल मनाच्या लोकांवर अंधश्रद्धेचा पगडा लवकर बसतो. तेच लोक मन:सामर्थ्यदेणा-या, ‘भिऊ नकोसांगणा-या, ‘श्रद्धा ठेवअसे बजावणा-या साधुसंतांच्या मागे लागतात, मग सत्यसाईबाबा असो वा आसारामबापू, त्यांच्यासारखे वादग्रस्त लोक मोठे होतात. इतके मोठे की, त्यांची सारी पापे पुण्य ठरू लागतात. सत्ताधारी, प्रसारमाध्यमे आणि समाजातील सगळ्याच मोठया लोकांनी लोटांगणवादीधोरण स्वीकारल्यामुळे ही बुवाबाजी वाढते. डॉ. दाभोलकर यांनी अंधश्रद्धांविरोधी कायदेशीर तरतूद करण्याचा आग्रह धरल्याने हेच बुवा-बाबा संतप्त झाले होते. डॉक्टर फक्त तिथेच थांबले नव्हते, त्यांनी भटक्या-विमुक्तांमधील जात पंचायतीचा काळा चेहराही समाजासमोर आणला होता, त्यामुळे पंचायतीच्या पकडीतील लाखो लोक सुखावले होते, पण ज्यांनी पिढयान्पिढया पंचगिरी करून आपली घरे भरली होती, सामाजिक प्रतिष्ठा उपभोगली होती, त्या लोकांना दाभोलकर नकोसे होते. दाभोलकरांना मात्र कुणाच्या विरोधाची पर्वा नव्हती. ते म्हणायचे, ‘‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे एका वाक्यात सांगायचे, तर मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद आहे. कृती करण्यासाठी तत्त्वज्ञान तर लागतेच. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे एकप्रकारे समाजघटकांना परिवर्तनाच्या प्रक्रियेत खेचण्याचे प्रवेशद्वार आहे.’’ होय, लोकांची मानसिकता बदलली तर सर्वागीण परिवर्तनाचे काम अधिक वेगाने होत जाईल आणि हे काम वर्षानुवर्षे, पिढयान्पिढया चालणारे असते. साडेतीन हजार वर्षापूर्वी चार्वाकाने अभ्यास करून देहाशिवाय स्वतंत्र आत्मा नसतोअसे सांगितले. चार्वाक तिथेच थांबला नाही, त्याने पुनर्जन्म आणि पर्यायाने स्वर्ग-नरक नाकारला. तुकाराम महाराजांनी तर,

डोई वाढवुनि केश। भुते आणिती अंगास।।
तरी ते नव्हे ती संतजन। तेथे नाही आत्मखूण।।

असे परखडपणे स्पष्ट केले.

आगरकरांनी आपल्या एका लेखात तर भूत कल्पनेसोबत मृत्यूनंतरच्या सगळ्याच कल्पनांची खिल्ली उडवली होती. ते म्हणतात, ‘पिशाच्च किंवा अशरीरी आत्मा अस्तित्वातच नाही, तर मग त्या कल्पना मनात येतातच कशा? याचे उत्तर एवढेच मानावे लागते की, कैलास, स्वर्ग, वैकुंठ, पाताळ, यम, यमपुरी, यमयातना या काल्पनिक वस्तू ज्या अर्थाने अस्तित्वात आहेत, त्याच अर्थाने पिशाच्चाचे वा आत्म्याचे अस्तित्व मानले आहे. निर्गुण, निराकार परमेश्वर, अशरीरी मृतात्मा यांच्या स्वरूपात काहीच फरक नाही.

आमच्या गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांनी तर लोकांच्या भाषेत, रोखठोक शब्दांत अध्यात्म सांगितले.
‘‘गडयांनो देवळात जाऊ नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, काम-धाम करा, शिक्षण घ्या, पोरा-बाळांना शिकवा, मंत्र-तंत्र, बुवाबाबांचे चमत्कार यांच्यामागे लागू नका.’‘ लोक त्यांच्या विचारांनी, भजनांनी भारावून जात, पण त्याहीपेक्षा प्रभावी होते त्यांचे स्वच्छतेचे कार्य. त्यांनी फक्त गावातील रस्ते आणि गटारे स्वच्छ केली असे नाही, तर तब्बल पन्नास वर्षे त्यांनी महाराष्ट्राचे गढूळलेले मनही साफ करण्याचा अथकपणे प्रयत्न केला. डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येमुळे मराठी समाजमनातील असहिष्णूतेचा कचरा पुन्हा वर आलेला दिसतोय. तो साफ करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. संघर्षासाठी, एखाद्या आंदोलनासाठी लोकांना तयार करणे तुलनेने सोपे असते; परंतु स्वत:च्या दररोजच्या आचरणात बदल घडविणे, अंधश्रद्धेवर आधारलेल्या परंपरा तपासून नाकारणे आणि बुद्धिप्रामाण्यावर आधारित जीवनमूल्यांचा स्वीकार करणे ही फार मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी वेळ देणे आणि प्रसंगी आपल्या वैयक्तिक आनंदाचा बळी देणे अपरिहार्य ठरते. प्रतिगामी शक्ती भित्र्या आणि स्वार्थाध असतात, म्हणून आपल्या पायाखालची वाळू सरकायला लागली, असे त्यांना वाटताच त्या शक्ती आक्रमक होतात. आपली हिंस्र् नखे आणि तीक्ष्ण दात परजून वाटेत उभ्या राहतात. त्यांच्या या हिंसक कारवायांनी डॉ. दाभोलकरांच्या डोक्यात गोळी मारणे शक्य असते; परंतु दाभोलकरांच्या डोक्यातून आलेले विचार संपविणे सर्वथैव अशक्य आणि म्हणूनच आम्ही सनातन्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यापेक्षा सनातनी विचारांमागील विकृती लोकांना दाखवून दिली पाहिजे, तरच अंधश्रद्धाविरोधी कायदा लोकांच्या फायद्याचा ठरेल.

सौजन्य महेश म्हात्रे.. (संपादक दैनिक प्रहार).

No comments: