Sunday, March 30, 2014

माझं Tweet...समाजासाठी नेमकं काय करायचं?


 31 मार्च 2014:  उद्या गुढीपाडवा... साडे-तीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त.  काहीतरी चांगल काम करायचा हा शुभ दिवस... मला कित्येक लोक भेटतात आणि नेहमी एक हमखास सांगतात की आम्हाला समाजासाठी काहीतरी करायची खुप इच्छा आहे, पण नेमकं काय करावं हेच सामजत नाही.   कुणाला पैसे द्याव म्हटंल तर चांगल्या संस्था नाहीत सगळीकडे भ्रष्टाचार?  आणि आपण काही करावयाच म्हटंल तर रोजच्या कामातुन सवडचं मिळत नाही.  काही सुचतच नाही.   मित्रांनो मला ईथं टीकेचा सुर लावयचा नाहीय.  आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली खरचं खुप दमछाक होते, आणि रोजच्या रामरगाड्यात निवांत मिळतच नाही.  बरं आपल्या समाजात काही करायचं म्हटंल की त्याच कौतुक सोडा, साधी चर्चा सुद्दा कुणी सहसा करायला तयार नसतो. आगदी घरातले सुद्दा? असो.

समाजासाठी काहीतरी करावसं वाटतं अशा लोकांनी या आठवड्याचा लोकप्रभेचा अंक जरुर वाचावा.  जाऊदे तुमचा त्रास कमी करतो आणि, जास्त काही लिहिण्यापेक्षा लोकप्रभेची मुख्यस्टोरीच खाली देतो.  लोकप्रभेने मोठं काम केल आहे.  त्यांचे  खास धन्यवाद.   निदान गुढीपाडव्याच्या या शुभदिवशी आपण लोकांनी काय केलय त्याच तोंडभरुन कौतुक करुया... आणि हो जमलं तर त्यांना मदत करुया, आणि त्यांच्या सारखं काही तरी आपणही करुया ...

देण्यातला आनंद...
सौजन्य लोकप्रभा.

Social worker
"समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. लौकिक अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित, पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. अशा सेवाव्रतींना 'लोकप्रभा'चा मानाचा मुजरा...

वाचन संस्कृतीचा प्रसार
वाचन संस्कृतीचा प्रसार करायचा असेल तर त्याचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या वाचनालयांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे, या विचाराने प्रेरित होऊन बदलापूरच्या श्याम जोशी यांनी सर्वस्व पणाला लावून त्यांच्या स्वप्नातील ग्रंथालय उभारले. कल्याणच्या ज्ञानमंदिर शाळेत चित्रकला शिक्षक असणाऱ्या श्याम जोशींना वाङ्मयाची गोडी त्यांच्या वडिलांनी लावली. त्यांच्या वडिलांचा दहा हजार पुस्तकांचा संग्रह होता. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर वाचनालयाच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारावे या हेतूने श्याम जोशींनी बदलापूर स्थानकाजवळ दहा वर्षांपूर्वी जागा विकत घेऊन 'ग्रंथसखा' वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी त्यांनी त्यांचा दोन हजार चौरस फुटांचा बंगला नऊ लाख रुपयांना विकला. घरातील सर्व पुस्तके ग्रंथालयात ठेवली. आणखी १५ हजार पुस्तके त्यांनी विकत घेतली. त्यानंतर ते स्वत: भाडय़ाच्या घरात राहू लागले. फर्निचर तसेच इतर खर्चासाठी आणखी पैसे हवे होते. त्यामुळे २००६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून पीएफ आणि ग्रॅच्युइटीपोटी मिळालेले साडेसहा लाख रुपयेसुद्धा त्यांनी ग्रंथसखासाठी खर्च केले.

उद्याच्या गुढी पाडव्यापासून 'ग्रंथसखा' एक स्वायत्त विद्यापीठ म्हणून ओळखले जाणार आहे. आधुनिक काळातील नव्या संकल्पनांना सुयोग्य मराठी प्रतिशब्द सुचविणे, ते मराठी जनमानसात रुजविणे, मराठी भाषेतील घुसखोरी बंद करणे, मराठी भाषेच्या श्रीमंतीचे दर्शन घडविणारी दुर्मीळ पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देणे, नियमित प्रशिक्षण कार्यशाळा, पुस्तक पर्यटन आदी उपक्रम या विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

आता 'ग्रंथसखा'चे वातानुकूलित अभ्यास दालन असून तिथे वाचकांना संदर्भासाठी पुस्तके दिली जातात. तसेच सहा संशोधकांच्या निवासाची सोयही येथे आहे. अभ्यासकांना येथे जास्तीत जास्त तीन दिवस राहता येते. त्यांच्यासाठी इंटरनेट तसेच झेरॉक्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. बहुतेक वाचकांना आवडणारी ललित, कथा, कादंबरी आदी वाङ्मयसंपदा ग्रंथसखामध्ये विपुल प्रमाणात आहेच, शिवाय तब्बल एक लाखांहून अधिक विविध विषयांची माहितीपर पुस्तकेही आहेत. त्याच जोडीने श्याम जोशी यांनी विश्वसखा प्रकाशन संस्था सुरू केली आहे. मराठी भाषेतील महत्त्वाच्या सर्व लेखकांची समग्र लेखन सूची तयार करण्याचे कामही 'ग्रंथसखा' करीत आहे. विशेष म्हणजे शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा मदत न घेता केवळ लोकवर्गणीच्या आधारे श्याम जोशी यांनी बदलापूरमध्ये आशिया खंडातील पहिले भाषा संग्रहालय उभारले आहे. ज्ञान आणि रंजन यांची योग्य सांगड घालून वाचन संस्कृतीचा अतिशय चांगल्या रीतीने प्रसार करता येतो, हे श्याम जोशी यांनी 'ग्रंथसखा'द्वारे दाखवून दिले आहे.

कागदी पिशव्यांचं प्रशिक्षण

पुण्यातली कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन प्लॅस्टिक पिशव्यांवर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कागदी पिशव्यांचं महत्त्व खूपच वाढलं आहे. मुळात, कागदी पिशव्या हा कॅरिबॅगला उत्तम आणि भक्कम पर्याय आहे हे किती तरी मंडळी पूर्वीपासून सांगत होती. सुरेंद्र श्रॉफ हेही त्यापैकीच एक. एक प्रथितयश उद्योजक ही त्यांची ओळख असली, तरी कागदी पिशव्यांच्या प्रचारासाठी गेली दहा-पंधरा र्वष तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या मदतीने सुरू केलेल्या कागदी पिशव्यांचा प्रचार, प्रसार एवढय़ावरच श्रॉफ थांबलेले नाहीत, तर कागदी पिशव्या कशा तयार करायच्या याचं शास्त्र आणि प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रमही त्यांनी विकसित केला आहे.

पर्यावरणाचं रक्षण, प्लॅस्टिकवर नियंत्रण, कागदाचा पुनर्वापर, पर्यावरणाला हातभार आणि गरजूंना रोजगार असे अनेक फायदे श्रॉफ यांच्या या प्रयोगात आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो वर्गामधून हजारो महिलांना, युवकांना आणि गरजूंना कागदी पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. मुख्य म्हणजे त्यासाठी ते कोणतंही शुल्क आकारत नाहीत. उलट, प्रशिक्षणार्थीना आवश्यक असलेलं कात्री, पट्टी, डिंक वगैरे साहित्य तेच स्वखर्चाने देतात. अवघ्या अडीच-तीन तासांचं हे प्रशिक्षण असतं. कागदी कॅरिबॅगचा वापर वाढवायचा आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळवून द्यायचा या ध्यासातून श्रॉफ यांचे हे काम सुरू आहे. रद्दी कागदांना साध्या घडय़ा घालून तयार केल्या जाणाऱ्या या पिशव्या पंधरा किलोपर्यंतचं वजन सहज पेलू शकतात आणि त्यांचा दरही अगदी माफक असतो. घरबसल्या रोज शे-दोनशे रुपये मिळवून देणारा रोजगार या शिक्षणातून पुण्यातील शेकडो महिलांना मिळाला आहे. बचत गटातील महिलांसाठीदेखील श्रॉफ यांनी आतापर्यंत अनेक प्रशिक्षण शिबिरं आणि अनेक गावांमध्ये कार्यशाळा घेतल्या आहेत. श्रॉफ यांच्याकडून शिक्षण घेऊन बचत गटातील महिला कागदी पिशव्या तयार करून त्या दुकानदारांना विकतात. एका माणसानं पिशव्यांच्या प्रशिक्षणाचं दान शेकडो जणांना दिलं आणि त्यातून जे एक मोठं काम उभं राहिलं ते पाहिलं, की आपणही चकित होऊन जातो.

रद्दीतून समाजसेवेचा वटवृक्ष!

गिरगावातील झावबावाडीत राहणारे दीपक नेवासकर हे एका खासगी कंपनीतील नोकरदाऱ वय वर्षे पस्तीस़ दैवाने दिलेले अंशत: अंधत्वाचे व्यंग सोबत घेऊन जगणाऱे मात्र इतरांच्या डोळ्यांना दिसणार नाही ते समाजसेवेचे स्वप्न त्यांनी पाहिल़े घरात जमा होणारी रद्दी अगदी टाकून द्यायला नको म्हणून लोक ती रद्दीवाल्याकडे देतात आणि दोन- पाच रुपये घेतात़ या रद्दीचाच सत्कार्यासाठी उपयोग करून घ्यावा, असे त्यांना वाटू लागल़े त्यानुसार सुरुवातीला त्यांनी चाळीतील शेजारपाजारच्या घरांत फिरून काही रद्दी जमा केली आणि त्यातून येणाऱ्या पैशांतून परिसरातीलच शाळांमध्ये कधी शुद्ध पाण्याचे यंत्र देणे, कधी बसायला बैठक देणे, असे उपक्रम सुरू केल़े

या जिद्दी जिवाची धडपड चाळीतल्या तरण्याबांड मुलांच्या लक्षात आली़ त्यातून विशाल आपटे, आदित्य गोखले, गीता गुरव, गौरी निमकर आदी काही तरुणांच्या पुढाकाराने २००६ साली 'युवा मोरया' ही संघटना जन्माला आली़ सुरुवातीला त्यांनी झावबावाडीतील घरांमध्ये फिरून रद्दी जमा केली़ त्यातून तब्बल चार हजार रुपयांची रक्कम जमा झाली़ हे पैसे जव्हार या आदिवासीबहुल भागातील दुर्गम गावांमध्ये शैक्षणिक सुविधा देण्यासाठी खर्च करण्याचे ठरल़े त्यानुसार जव्हारमधील काही गावे निश्चित करून कार्यकर्ते वर्षांतून काही वेळा तिथे जाऊ लागल़े तिथल्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करू लागल़े

आजही 'युवा मोरया' ही नोंदणीकृत संघटना वगैरे नाही़ हा तरुणांचा एक गट आह़े 'रद्दीदान' हा या संघटनेचा पाया आह़े त्या पायावर संघटनेने समाजकार्याचा मनोरा उभा केला आह़े दर महिन्याच्या पहिल्या रविवारी हे तरुण कार्यकर्ते घरोघर फिरतात आणि रद्दी जमा करून त्या पैशातून जव्हारमध्ये शैक्षणिक कार्य करतात़ सुरुवातीला १२-१५ असणारी कार्यकर्त्यांची संख्या समीर लेले, विशाल कुलकर्णी, तन्वी पराडकर अशा अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आता ५० वर पोहोचली आह़े त्यामुळे गिरगावातील ३५०, दादरमधील २०-२५ आणि बोरिवलीतील १०० घरांतून या कार्यकर्त्यांना रद्दीदान जमा करता येत़े 'दर महिन्यांच्या पहिल्या रविवारी रद्दीदान,' या कार्यक्रमात सुरुवातीपासून आजपर्यंत एकदाही खंड पडलेला नाही़ लोकांनाही आता त्यांची सवय झाली आह़े त्यांच्यासाठी घरातील रद्दी, पठ्ठय़ाचे खोके अशा गोष्टी वेगळ्या बांधून ठेवल्या जाऊ लागल्या आहेत़ विशेष म्हणजे या चळवळ्या तरुणांच्या कार्याची माहिती रद्दी विकत घेणाऱ्यालाही झाली आह़े त्यामुळे तोही आता त्यांच्याकडून बाजारभावापेक्षा एक-दोन रुपये अधिक देऊन रद्दी विकत घेऊ लागला आह़े परिणामत: महिन्याकाठी संघटनेकडे १२ ते १५ हजार रुपये जमा होऊ लागले आहेत़

जव्हारमधील मोख्याचा पाडा, कौलाळे, कोगदे आणि जंगलपाडा या गावांमध्ये 'युवा मोरया'चे कार्य सुरू आह़े गावातील शाळांमधील तब्बल ७०० ते ८०० विद्यार्थ्यांना वर्षांच्या सुरुवातीला बॅग, वही, अंकलिपीसहित सर्व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येत़े वर्षांतून ६ ते ८ वेळा कार्यकर्ते गावात जातात़ आणि प्रत्येक वेळी काही तरी वेगळा उपक्रम घेऊन जातात़ दिवाळीनिमित्त रांगोळी स्पर्धा, कधी पुस्तक हंडी, कधी मुलांना शिकविण्यासाठी विविध वस्तू, अशा एक ना अनेक गोष्टी युवा मोरया गावांमध्ये करत़े संघटनेने दोन स्थानिक महिलांना हाताशी धरून एक अंगणवाडीही मोख्याचा पाडा या गावात सुरू केली आह़े या अंगणवाडीत विविध प्रकारची खेळणी आणि इतर शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ शैक्षणिक कार्यासोबतच या गावांत होणाऱ्या विविध आरोग्य शिबिरांना मनुष्यबळ पुरविण्याचे कामही कार्यकर्ते करतात़ तसेच शबरी सेवा समिती या संस्थेकडून या भागामध्ये दरवर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यातही मोरयाचे कार्यकर्ते सहभाग घेतात़ सामूहिक विवाहातील गरीब जोडप्यांच्या नव्या संसारासाठी भांडीकुंडी आणि इतर काही वस्तू प्रायोजकांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देतात़ घरातली अडगळ समजल्या जाणाऱ्या रद्दीच्या पैशांतून आज एका समाजकार्याचा वटवृक्ष बहरू लागला आह़े

सेवाव्रती घडवण्याचा वसा


निवृत्ती हा आयुष्याची संध्याकाळ खुणावणारा कालखंड. निवृत्ती घेतल्यानंतर आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी अनुभवण्याची हुक्की बहुतेकांना येते. परंतु समाजाप्रती काही तरी करण्याचा ध्यास ध्येयवेडी मंडळी घेतात आणि त्यातूनच रुजते दातृत्वाची चळवळ. चॅरिटी, दान अशा गोंडस शब्दांचे गोडवे न गाता समाजातल्या उपेक्षित मंडळींसाठी काम करण्याचा निर्धार अविनाश कुलकर्णी यांनी केला आणि आज या विचारातून निर्माण झालेली संस्था असंख्य भरकटणाऱ्या पावलांना मार्गदर्शनाचे काम करत आहे. ठाणे जिल्ह्यत शिक्षक म्हणून कार्यरत अविनाश कुलकर्णी माध्यमिक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून २००४मध्ये निवृत्त झाले. मागे वळून बघताना शिक्षण आणि जगणं या दोन परस्परपूरक गोष्टींतला समन्वय हरवल्याची जाणीव त्यांना झाली. लहानपणी कोल्हापूरजवळच्या गारगोटी गावात एपी नाईक या वंचितांना शिक्षण उपलब्ध करणाऱ्या ध्येयव्रतींचे संस्कार आपल्यावर झाल्याचे कुलकर्णी सांगतात. दहावीचा निकाल ८० % लागतो, परंतु नापासाचा शिक्का बसणाऱ्या उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे याची जाणीव त्यांना झाली. यामध्ये मुलींची संख्या जास्त होती. प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेच्या नापास टॅगमुळे व्यवहार्य जीवनात रोजगाराच्या संधी मिळताना मोठय़ा प्रमाणावर मर्यादा येतात. या मुलांना रोजगाराभिमुख शिक्षण-प्रशिक्षण देता येईल का, असा विचार कुलकर्णी यांच्या मनात आला. आणि नर्सिग इन्स्टिटय़ूटसाठी मानद तत्त्वावर काम करताना कुलकर्णी यांच्या विचारांना ठोस दिशा मिळाली. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची देखभाल अर्थात नर्सिग (पेशंट्स असिस्टंट) क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. निवृत्तीच्या वेळी मिळालेल्या निधीतूनच त्यांनी नर्सिग इन्स्टिय़ूटची स्थापना केली. कल्याण ते बदलापूर परिसरातील शाळांतून दहावी नापास मुलांना या उपक्रमाची माहिती दिली. प्रशिक्षणाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची संलग्नता मिळवली. प्रशिक्षणाचे शुल्क आर्थिकदृष्टय़ा मागासांना परवडेल असे ठेवले. पहिल्या वर्षी फक्त पाच जण होते. या मुलांना पाच दिवस प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ऑनजॉब ट्रेनिंग आणि उर्वरित दोन दिवस थिअरी अभ्यास असे स्वरूप होते. स्टायपेंडची व्यवस्था असल्याने या मुलांना कमावण्याची संधी मिळाली. डॉ. परितेकर, डॉ. माहेश्वरी तसेच देवडकर कुटुंबीय अशा समविचारी स्नेह्यंची त्यांना साथ मिळाली. विद्यार्थ्यांची जेमतेम संख्या, निधी उभारणीत येणाऱ्या अडचणी यातूनही त्यांनी हा विचारयज्ञ सुरूच ठेवला. आज दहा वर्षांनंतर संस्थेतून शिकलेले १३८ सेवाव्रती कार्यरत आहेत.

दोनशे जणांना नवी दृष्टी


१९८० साली रीडर्स डायजेस्टमध्ये श्रीलंकेतील नेत्रदान चळवळीवर एक लेख आला होता. लेखातील एका उल्लेखाने श्रीपाद आगाशे यांना मात्र अस्वस्थ केले. श्रीलंका हा देश जगातील तब्बल ३६ देशांना नेत्र पुरवितो. त्या ३६ देशांत भारताचादेखील समावेश होतो. हे वाचल्यानंतर आगाशेंना लाजीरवाणे वाटले. श्रीलंकेसारखा एक छोटासा देश जगाला दृष्टी देऊ शकतो आणि प्रचंड लोकसंख्या असलेला आपला खंडप्राय देश आपल्याच देशातील लोकांची डोळ्याची गरज भागवू शकत नाही ही लाजिरवाणी परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा आगाशेंनी विचार केला. तेव्हा ते कल्पकम येथे अणू प्रकल्पात काम करत असत. एक दिवसाची रजा टाकून त्यांनी चेन्नई गाठलं. तेथील नेत्रपेढीला भेट दिली. नेत्रदानाची सारी प्रक्रिया समजून घेतली. दुसऱ्या दिवशी कार्यालयाच्या सूचना फलकावर त्यांनी एक सूचना लावली. ऊल्लं३ी ४१ ए८ी२ कार्यालयातील सहकाऱ्यांचा प्रतिसाद वाढत गेला.

१९८१ ला झेरॉक्सची सोय फारशी सोयीस्कर नव्हती. मग मूळ फॉर्म सायक्लोस्टाइल करून वाटायला सुरुवात केली. तेथील दहा वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी सुमारे १२०० लोकांचे नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले. सुरुवात तर चांगलीच झाली होती. ठाण्यात आल्यावर त्यांच्या कामाला आणखीनच वेग आला. नेत्रदानावरील आणखीन माहिती जमा केली, तज्ज्ञांची व्याख्याने ऐकली, ठिकठिकाणच्या नेत्रपेढय़ांची माहिती जमा केली. विविध वृत्तपत्र, मासिकं, आकाशवाणी, व्याख्याने असे ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी नेत्रदानाविषयी लोकांमध्ये जागृती करायला सुरुवात केली. लोकांना नेत्रदानाचे अर्ज आणून देणे, भरलेले अर्ज नेत्रपेढीपर्यंत पोहोचवणे, त्यानंतर नेत्रपेढीकडून मिळणारे डोनर कार्ड नेत्रदात्यांपर्यत पोहोचवणे असा कामाचा धडाकाच लावला. सुरुवातीला त्यांनी नेत्रदानाचा अर्ज भरलेल्या सर्वाच्या नोंदी ठेवल्या होत्या. मात्र आता वाढत्या व्यापामुळे त्यांना हे शक्य होत नाही.

आगाशे सांगतात की, ''आपल्याकडे नेत्रदानाविषयी उदासीनता तर आहेच, पण लोकांना जागरुक करण्याची गरज आहे. केवळ अर्ज भरून काम संपत नाही, तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या जवळच्या नातेवाइकांनी नेत्रपेढीशी संपर्क साधून योग्य वेळेत नेत्र काढले जातील हेदेखील पाहणे गरजेचे असते. अर्ज भरलेला असला तरी जवळच्या नातेवाइकांची परवानगीची कायदेशीर गरज असते.'' तसेच एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा अर्ज भरला नसेल आणि अशी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्याच्या नातेवाइकांची परवानगी असेल तरीदेखील नेत्रदान करता येऊ शकते हे पटविण्यासाठी त्यांनी अनेक वेळा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांची भेट घेतली आहे. प्रसंगी मानहानीकारक प्रसंगदेखील सोसले आहेत. तर कधी कधी अशा प्रयत्नांना यश येऊन नेत्रदान झाले आहे.

आज ३३ वर्षे आगाशे नेत्रदानाबद्दल समाजात प्रचार प्रसाराचे काम करत आहेत. जवळपास दोनशेहून अधिक व्याख्याने, सव्वालाख माहिती पत्रकांचे वाटप त्यांनी केले आहे. ही इंग्लिश, मराठी, हिंदी या तीन भाषांत माहितीपत्रकं करून घेतली. त्यांच्या या उद्योगाचे यश आकडय़ात सांगायचे तर आजवर तब्बल ८ हजार लोकांनी नेत्रदानाचे अर्ज भरले आहेत आणि त्यापैकी सुमारे १०० लोकांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान केले आहेत. अर्थात आगाशेंच्या प्रयत्नामुळे आज २०० लोकांना नवी दृष्टी लाभली आहे.

आपल्या देशात किमान तीस लाख लोकांना नेत्ररोपणाची गरज आहे. आपण फक्त १५ हजार लोकांची गरज भागवू शकतो अशी परिस्थिती आहे. श्रीलंकेतून आजही आपल्याकडे दहा हजार नेत्र पुरवले जातात. या आकडेवारीवरूनच या क्षेत्रातल्या आव्हानाची कल्पना येईल.

नाटकाच्या माध्यमातून रुग्णसेवा


कोल्हापुरात राहणारे प्रशांत जोशी हे नाटय़कर्मी गेली २०-२५ वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत. सुरुवातीला त्यांनी व्यावसायिक नाटकं केली, पण त्यात जीव रमेना. एक दिवस त्यांच्या स्वत:च्या हॉटेलाच्या गल्ल्यावर बसलेले असताना हातात एक चिठ्ठी घेऊन एक बाई आली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की या बाईचा नवरा आजारी आहे आणि तिला पैशांची गरज आहे. प्रशांत जोशींनीही तिला थोडेसे पैसे दिले, पण ती निघून गेल्यावर त्यांना असं वाटलं की या बाईची गरज खरी होती कशावरून आणि खरी असेल तर तिला असे सगळ्यांकडून एकदोन रुपये मिळून काय फरक पडणार आहे? मग त्यांनी त्या चिठ्ठीत उल्लेख होता त्या डॉक्टरांना फोन केला. त्या डॉक्टरांकडून समजलं की त्या बाईची गरज खरीच होती. डॉक्टर म्हणाले की मला शक्य तेवढं मी करतो, पण मला मर्यादा आहेत. हे ऐकल्यावर प्रशांत जोशी यांना असं वाटलं की आपण अशा लोकांसाठी नाटकाच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे.

मग त्यांनी २००० साली एका किडनी पेशंटसाठी एका नाटकाचा प्रयोग जाहीर केला. ३७ हजार रुपये जमले. ते त्या रुग्णाच्या उपचारांसाठी वापरले गेले. मग असं करून गरजू रुग्णांना मदत करायची असं त्यांनी ठरवलं. पण दरवेळी लोकांना असं गरजू रुग्णांसाठी दोनेकशे रुपयांचं तिकीट घ्या असं आवाहन करणं त्यांना प्रशस्त वाटेना. मग नाटय़गृहाची क्षमतेऐवढे पास वाटायचे आणि उपस्थितांना गरजू रुग्णांसाठी तिथे ठेवलेल्या बॉक्समध्ये ऐच्छिक मदत करा असं आवाहन करायचं असा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यांचा असा अनुभव आहे की ७०० पास वाटले की साधारण २०० माणसं येतात. पण हजार बाराशेच्या वर रुपये जमत नाहीत. मग ते त्यांच्या इतर कामांमधून मिळालेल्या पैशातून भर घालून पाच हजार रुपये उभे करतात आणि मग ते पैसे गरजू रुग्णांना दिले जातात. मिशन मम्मी डॅडी या एक तासाच्या नाटकाचे या पद्धतीने १४७ प्रयोग झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अशी ३०-३५ नाटकं केली आहेत. दर महिन्याला ते तीन रुग्णांना तरी प्रत्येकी पाचेक हजारांची मदत मिळवून देतात. हे काम करणं आव्हानाचं आहे. कारण मुळात नाटक मोफत करायचं असल्यामुळे त्यात काम करायला कलाकार मिळणं सुरुवातीला खूप जिकिरीचं होतं. नाटक मोफत द्यायला लेखक तयार नसतात. सुरुवातीला उत्साहाने आलेले कलाकार नंतर कंटाळून निघून जातात. त्यांच्या या कामासाठी वेगवेगळे सहकारी आले आणि गेले; पण गोपी वर्णे हे एकच सहकारी आजवर त्यांच्याबरोबर कायम आहेत. याबरोबरच 'एकच प्याला' नाटकाचे प्रयोग करून नवऱ्याच्या दारूचे दुष्परिणाम भोगणाऱ्या महिलांना मदत करायची या पातळीवरही सध्या त्यांचं काम सुरू आहे.

वृद्धांसाठी आनंदघर


कोल्हापूरचे शिवाजी पाटोळे पाच महिन्यांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यांना आणि त्यांच्या आधीच्या आठ भावंडांना त्यांच्या आईने काबाडकष्ट करून वाढवलं. परिस्थितीने फटकारलेल्या अशा लोकांना आपण काही ना काही मदत करायची ही खूणगाठ शिवाजी पाटोळे यांनी मनाशी बांधली. त्यांनी एका गुजराती शाळेत शिपाई म्हणून काम केलं खरं, पण आयुष्यात स्थैर्य आल्यावर त्यांनी आणि त्यांच्या आईने मिळून मातोश्री नावाचा एक वृद्धाश्रम काढला. याच नावाने सरकारचे राज्यभर वृद्धाश्रम आहेत. पण पाटोळे यांच्या मातोश्री वृद्धाश्रमाचा त्या सरकारी वृद्धाश्रमांशी काहीही संबंध नाही. कोणतीही सरकारी मदत न घेता ते आपला वृद्धाश्रम चालवतात. त्यांच्या वृद्धाश्रमात आज जवळजवळ १०० वृद्ध राहतात. त्यात अनाथ, अपंग असे वृद्धही आहेत.

शंभरपैकी पन्नासेकजण आपल्या राहण्या-जेवण्या-खाण्याचा काहाही खर्च देऊ शकत नाहीत. जे देतात तेही साताठशे रुपये देऊ शकतात. पण पाटोळेंना त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. त्यांनी स्वत:च्या दोन एकर जमिनीवर हा वृद्धाश्रम उभारला आहे. त्यांची दरमहा १३ हजारांची पेन्शनही ते याच कामात खर्च करतात. त्यांच्या मालकीच्या घरातून येणारं भाडंरूपी उत्पन्नही याच कामात घालतात. समाजासाठी काहीतरी करू इच्छिणारी काही मंडळी त्यांना आर्थिक मदत करतात, बाकी सगळं त्यांच्या वैयक्तिक बळावरच चालतं. वृद्धाश्रमातल्या वृद्धांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी ५० खाटांचं एक हॉस्पिटलही उभं केलं आहे. त्यांची मुलं, सुना आपापली कामं सांभाळून या कामात मदत करतात.

वृद्धांसाठी हक्काचा निवारा

वृद्धापकाळ म्हणजे मानलं तर जिवंतपणीचे मरण अन् मानलं तर सुखाचा काळ. कुटुंबातील सदस्यांची साथ त्यांना किती मिळते, यावर सारं काही अवलंबून असतं. असमर्थ आबालवृद्धांना आधार देणारा हा डोलारा ७ फेब्रुवारी १९९७ ला डॉ. शशिकांत रामटेके आणि त्यांच्या पत्नी निशिगंधा रामटेके यांनी स्वबळावर नागपुरात उभारला. वृद्धाश्रमापलीकडच्या या संकल्पनेनं आतापर्यंत अनेकांना आधार दिला आहे.
बदलत्या काळात आई, वडील आणि मुलं एवढीच कुटुंबाची व्याख्या, मग अशा वेळी घरातल्या वृद्धांचे काय, असा प्रश्न सहजच पडतो. कित्येकदा या घरातल्या वृद्धांचं आजारपण सांभाळायला त्यांना वेळ नसतो, तर कधी वेळ असला तरीही ती सांभाळण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. अशा सर्व असमर्थ वृद्धांना या विजया परिवार केअर सेंटरमध्ये सामावून घेतलं जातं. बाबा आमटेंच्या आश्रमात गेल्यानंतर डॉ. शशिकांत रामटेके यांनी बाबांपुढे ही संकल्पना मांडली तेव्हा त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, नागपुरात परतलेल्या डॉ. रामटेके यांनी ही बाब मनावर घेतली आणि स्वबळावर विजया परिवार केअर सेंटर उभारलं.

या परिवारात सहभागी होणारा सदस्य कधी पाच मिनिटांचा असतो, तर कधी तो अर्धा तास जगणारा असतो. मात्र, या पाच मिनिटांतही त्यांना या सेंटरमधून मिळालेली आपुलकीची वागणूक मृत्यूची वाट सुखद करून देते. एचआयव्ही, टीबी, अल्झायमर, स्किझोफ्रेनिया अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण येथे आणून सोडले जातात. कुणाला रुग्णालयात येणारा खर्च झेपत नाही, तर कुणाला नोकरीमुळे वेळ मिळत नाही, अशी त्यांची कारणे असतात. अशा वेळी त्यांच्या परिवारातील वृद्धांना या ठिकाणी सामावून घेऊन, त्या सर्वाची काळजी इथं घेतली जाते. त्यांना खाऊ घालण्यापासून तर सर्व नैसर्गिक विधी, त्यांची स्वच्छता, त्यांची देखभाल, तपासणी, वेळेवर औषधं देणं ही सर्व काळजी या परिवाराकडून घेतली जाते. डॉ. शशिकांत रामटेके आणि त्यांच्या पत्नी निशिगंधा या दाम्पत्यांनी स्वत:ला त्यासाठी वाहून घेतलं आहे. आजपर्यंत या दाम्पत्यानं सुमारे २०० हून अधिक वयोवृद्धांची सेवा केली आहे. त्या सर्वासाठी त्यांनी हुडकेश्वर मार्गावर एक छोटेसं घरकुल उभारलं आहे. त्यासाठी त्यांना सरकार वा कुणाकडूनही पैशाची मोठी अपेक्षा नाही, तर स्वबळावर आणि या रुग्णांच्या नातेवाईकांकडून जे मिळेल त्या बळावर या परिवाराचा डोलारा उभा आहे. नागपुरात आज तरी वृद्धांसाठी आणि आजारी व्यक्तींसाठी विजया परिवार केअर सेंटर हक्काचं घर झालं आहे.

दान.. वेळेचं..

'दान' या शब्दाला अनेक शब्द जोडले जाऊ शकतात. विद्यादान, धनदान, गोदान.. अशी अनेक दानं आपल्याला माहिती आहेत. यातल्या प्रत्येक दानाला महत्त्व आहे. मुळात दानाचंच महत्त्व अनन्यसाधारण आहे. वेळेचं दान हेही असंच. त्याचंही मोल फार मोठं आहे आणि कुमुदिनी आठल्ये यांचं काम आपण बघितलं, की वेळेच्या दानाचं महत्त्व मनावर अधिकच ठसतं.

भारतीय हवाई दलातील वरिष्ठ पदावरून निवृत्त झाल्यानंतर एक दिवस त्या पुण्यातल्या निवारा वृद्धाश्रमात गेल्या आणि निवाराच्या सर्वेसर्वा असलेल्या निर्मलाताई सोहनी यांना भेटून म्हणाल्या की, मला इथे येऊन काही तरी काम करायचंय. कुठलंही काम चालेल. अगदी जेवण वाढायचंही काम करायला मी तयार आहे. सोहोनी आजी म्हणाल्या, हरकत नाही, मग पंगत वाढायला मदत करा.  या वाक्यातून वैयक्तिक स्वरूपातील एक सेवाकार्य दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झालं. वेळेचं दान अशा स्वरूपाचं काम आठल्ये आजी गेली चौदा र्वष अखंडपणे, अगदी एकही दिवस न चुकता अखंडपणे करत आहेत. त्यांचं वय आज त्र्याहत्तर आहे; पण निवारामध्ये जायची वेळ कधीही चुकत नाही. आजी आल्या की, तिथल्या सर्व वृद्धांना अगदी 'आपलं' कोणी तरी आलंय असं वाटतं, कारण आजी फक्त पंगतच वाढत नाहीत, तर पंगतीला बसलेल्या प्रत्येकाशी त्या आपुलकीनं संवाद साधतात, प्रत्येकाचं हवं नको पाहतात. वाढता वाढता गप्पाही मारतात. आग्रहानं पदार्थ खायला लावतात. किती मस्त वास येतोय, घेऊन तर बघा.. असं म्हणत म्हणत भाजी वाढतात. आनंदी वातावरणात मग पंगत रंगते. पंगत झाली, सगळे जण उठले, की आजी परत सर्व आवरून त्यांच्या घरी परततात. आठल्ये आजींचं हे झालं एक काम. याशिवाय वृद्धाश्रमात त्या भजन वर्ग घेतात. सिप्ला केंद्रात जाऊन तिथल्या रुग्णांना हस्तकलेच्या वस्तू तयार करायला शिकवतात. त्यांच्याकडून आकाशकंदील तयार करून घेतात, चित्रं काढून घेतात. आजी म्हणतात, मी फार करत्ये असं नाही, पण आपल्या जाण्यामुळे तिथल्या काही मंडळींना आनंद मिळतोय, ही गोष्ट आपल्यालाच खूप आनंद देते. म्हणून स्वीकारलेल्या या कामात खंड पडू द्यायचा नाही एवढंच मी ठरवलं आहे आणि काम करत राहिले आहे.

आठल्ये आजींचं हे वेळेचं दान एका तपाहून अधिक काळ अगदी निष्ठेनं सुरू आहे आणि म्हणूनच त्याचं मोलही फार मोठं आहे

ज्येष्ठांसाठी आनंदसोहळा


१९७३ मध्ये पदवी घेतल्यावर कायद्याचादेखील शिक्षण घेतलेल्या पुरुषोत्तम चिंधु पवार (पाटील) यांना स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा होती. हाती भांडवल नसतानासुद्धा साधा कांदे बटाटय़ाचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर एक-एक करत वसई मध्ये अन्य अनेक व्यवसायात आपले हातपाय पसरले. पण उद्योगाबरोबर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी म्हणून त्यांनी १९९३ मध्ये ज्येष्ठ नागरीकांसाठी संघटना काढली. ज्येष्ठ नागरीकांच्या अडचणी समजून घेणे व त्यावर उपाय काढणे, त्यांना एकत्र आणून त्यांच्या सुख-दु:खात समावून जाणे, त्यांनी एकाकी वाटू न देणे यासाठी त्यांनी दर गुरुवारी आपल्या मालकीच्या एक हॉल त्यासाठी विनामुल्य उपलब्ध करून दिला. वर्षांतून तीन चार वेळा ज्येष्ठ नागरीकांना स्वखर्चाने गणेशपुरी येथील आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जाऊ जातात. तेथे गेल्यावर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणे, त्यांच्या सोईचे खेळ खेळणे. त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ रहाणे हे ते सातत्याने करीत आले. एकाकी पडलेल्या ज्येष्ठ नागरीकांसाठी त्यांनी 'वधु-वर' मेळावापण आयोजित केला होता व वैशिष्ठय़ म्हणजे त्याला चांगला प्रतिसाद पण लाभला.

आपल्या व्यवसायाचा वाढलेला व्याप सांभाळून जेवढा वेळ समाजकल्याणासाठी खर्च करता येईल तेवढा करणे हे त्यांचे नित्यांचे होऊन बसले. त्यांची मुलं मोठी झाल्यावर व्यवसाय त्यांच्यावर सोडून ते आपला वेळ ज्येष्ठ नागरीकांसाठी देऊ लागले आहे. त्यासाठी होणारा खर्च ते स्वत: करू लागले.
'देह मुक्ती मिशन' अभियान सुरु करुन त्यामार्फत देहदान व अवयव दानाचा ते प्रचार करतात. आतापर्यंत जवळ-जवळ २०० जणांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ह्य पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. दवाखान्यातील ऑपरेशन किंवा उपचारानंतरही काही काळापुरता काही साधने लागतात व ती विकत आणणे भाग पडते. या वस्तूंचा नंतर काही उपयोग नसतो. हाच भार हलका करण्यासाठी 'होम हॉस्पिटॅलिटी सव्र्हिस'मधून रुग्णासाठी घरी लागणारे साहित्य अनामत रकमेवर स्वखर्चाने विनामूल्य वापरासाठी देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.
पुरुषोत्तम पवार यांच्या आजवरच्या या उद्योगाबद्दल विचारले असता ते म्हणतात 'ज्येष्ठांच्या सुख-दु:खात जेवढं जमेल तेवढं समावून जावे आणि त्यांना एकाकी वाटू नये असा प्रयत्न करणे हे माझे उदिष्ट आहे'.

अनोखी दिवाळीदिवाळी पहाट म्हणजे गेल्या काही वर्षांत डोंबिवलीकरांसाठी फडके रोडवरचा जल्लोष असेच समीकरण झाले आहे. मात्र त्याच डोंबिवलीतील काही सुजाण लोक मात्र या फडके रोडवरच्या या गोंधळात रममाण न होता शहराच्या वेशीवरच्या अमेय पालक संघटनेच्या घरकुलात त्यांची दिवाळी पहाट वेगळ्याच अनुभवाने रंगवतात. अमेय पालक संघटनेच्या घरकुलातील गतिमंद मुलांबरोबर सबंध दिवस ते तेथेच व्यतीत करतात. गेली सात र्वष स्वप्निल हळदणकर आणि त्यांचे मित्र एकत्र येऊन ही अनोखी दिवाळी साजरी करत आहेत. तेथील गतिमंद मुलांशी खेळण्यातून मिळणारा आनंद हीच त्यांची दिवाळी असते. सुमारे ५० समविचारी लोकांचा हा ग्रुप दिवाळीनिमित्ताने फराळाचे नेतोच, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे असते तब्बल ४००-५०० किलो धान्य, जे तेथील मुलांच्या एक दीड महिन्याची गरज भागवणारे असते. शिवाय चादरी, कपडे अशा अनेक भेटवस्तूंनी या मुलांची दिवाळी साजरी होते.

गेली सात वर्षे नित्यनेमाने अशी दिवाळी साजरी करणारे स्वप्निल हळदणकर सांगतात की, ''आम्हा काही मित्रांना सामाजिक कार्याला मदत करायची इच्छा होती. म्हणून आमच्या सोसायटीतील चार-पाच कुटुंबांनी एकत्र येऊ न धान्य, काही गरजेच्या वस्तू जमा केल्या. त्या गरजूंपर्यंत पोहचाव्यात त्यासाठी आम्ही बदलापूर, जव्हार, मोखाडा परिसरात बरीच शोधाशोध केली. मोखाडय़ात कपडे वाटपदेखील केलं. मात्र त्यातून आम्हाला समाधान मिळत नव्हतं. अमेय पालक संघटनेबद्दल माहिती कळली. आणि गेल्या सात वर्षांपासून आमची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होऊ लागली.''

सुरुवात जरी पाच जणांपासून झाली असली, तरी आज एकमेकांच्या ओळखीने या दात्यांचा ५० जणांचा ग्रुप तयार झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे ते थेट पैशांच्या स्वरूपात मदत नाही करत. तशी आर्थिक मदत अनेकांना मिळत असते. म्हणूनच आम्ही धान्य आणि वस्तुरूपात मदत करू लागलो. असे स्वप्निल सांगतात. मागील वर्षी कोणी चादरी दिल्या, कोणी सर्व मुलांना कपडे शिवून दिले. यामध्ये केवळ धान्य आणि वस्तूंचे वाटप इतकाच हेतू नसल्यामुळे आमचा संपूर्ण दिवस त्या मुलांबरोबर घरकुलातच जातो. त्यामुळे त्या मुलांना एक वेगळाच आनंद मिळताना दिसतो. किंबहुना हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहणे, हाच आमचा त्या दिवाळीचा खरा आनंद असतो.

त्याचबरोबर स्वप्निल आणखी एक उपक्रम करतात तो म्हणजे थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन. दिवाळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे त्यांचे जे मित्रमंडळ तयार झालं आहे, ते या कामी त्यांना मदत करते.

सौजन्य लोकप्रभा:

No comments: