Tuesday, June 24, 2014

'मॅक्सेल' समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा पुरस्कार - शरद पवार

मुंबई दिनांक:  20 जुन 2014 :  महाराष्ट्रातील माणसं नको तेवढी चिकित्सक आहेत, काही नवीन करण्याचा प्रयत्न झाला तर शंका घेतल्या जातात. वर्तमात्रपत्रांतून रकानेच्या रकाने लिखाण केले जाते, ही नकारात्मकता घालवण्याची गरज आहे, मॅक्सेल पुरस्कार हा समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले

वरळी येथील नेहरू सेंटर येथे झालेल्या मॅक्सेल फाऊंडेशनच्या मॅक्सेल महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अॅवॉर्ड शुक्रवारी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोल्हापूरचे उद्योजक बापूसाहेब जाधव, केपीआयटीचे रवी पंड‌ित आण‌ि क‌िशोर पाटील, सीमा वैद्य मोदीव्हॅल्यूएबल ग्रुपचे संजय गायकवाड, ग्रामीण शिक्षणासाठी काम करणारे प्रदीप लोखंडे, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या निर्मला कांदळगावकर,  एमसीईडी महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, औरंगाबाद  आण‌ि अमे‌रिकेतल्या केरा माटकचे अध्यक्ष अशोक जोशी यांचा मॅक्सेल पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

कोणताही नवीन प्रकल्प हाती घेतला की टीका सहन करावी लागते. महाराष्ट्राच्या राजकारणातवावरताना मलाही ती सहन करावी लागलीच, आणि मी ती सहन केली असे पवार म्हणाले.   यावेळी दाभोळ मधील एन्रॉन प्रकल्पाचे उदाहरण देताना पवार म्हणाले की, महाराष्ट्राला विजेची गरज होती. या वीजनिर्म‌ितीसाठी सरकारी तिजोरीतून पैसा जाऊ नये म्हणून एन्रॉन कंपनीशी बोलून दाभोळमध्ये वीज प्रकल्प उभा केला. परंतु, या बाबत दाभोळ प्रकल्पाच्या माध्यमातून अमेरिकेचे नौदल भारत पादाक्रांत करण्यासाठी येईल, इथपर्यंत शंकाकुशंका घेण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्प चार वर्ष बंद पडून पुन्हा सुरू झाला. नवे काही स्वीकारले जात नाही याचा अनुभव लवासाच्या माध्यमातून पुन्हा आला. हा प्रकल्प साकारणाऱ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रचंड विरोध झाला. परंतु, आज या प्रकल्पाला हजारो कुटुंबं भेट देतात. महाराष्ट्रात अशी ३० ठिकाणे आहेत, जिथे असे प्रकल्प साकारता येतील. पण त्यासाठी नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने विकसित करण्यात आलेल्या जीएम बियाणांना विरोध होतो, परंतु, याच बीजांपासून तयार केलेल्या डाळी आण‌ि तेल हजारो कोटी रुपये मोजून आयात केले जातात, असे सांगून त्यांनी या विरोधातला फोलपणा स्पष्ट केला. हवामान, माती, आण‌ि मानवी आरोग्यावर परिणाम करणार नाही, अशा संशोधनाला विरोध होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.