Saturday, July 5, 2014

‘साणंद’ महाराष्ट्राला का जमू शकत नाही? - नितीन पोतदार

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीबाबत नितीन पोतदार यांचा सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

फोर्ड मोटर्सचे सीईओ मार्क फील्ड्स यांना दिलेल्या दहा मिनिटांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फोर्ड'पुढे गुजरातच्या साणंदचे रेड कार्पेट अंथरले आणि साणंदला ग्लोबल नकाशावर आणावे, अशी इच्छा व्यक्त केली...जे साणंद आणि गुजरातला जमते, ते महाराष्ट्राला का जमू नये, आपण आपला शक्तिशाली ब्रॅन्ड महाराष्ट्र इतका फिका का ठरविला, असा परखड सवाल कॉर्पोरेट लॉयर व मॅक्सेल फाऊंडेशनचे ट्रस्टी नितीन पोतदार यांनी उपस्थित केला आहे.

अग्रेसर महाराष्ट्र राजकीय उदासीनतेमुळे आपली ग्लोबल ओळख निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरला, अशी टीका पोतदार यांनी केली. महाराष्ट्र सहकार क्षेत्रासाठी प्रसिद्ध, तरी सर्वात चांगला ब्रँड अमूल गुजरातमध्ये तयार झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, हैदराबाद काही माहिती-तंत्रज्ञानाची खाण नव्हते. परंतु चंद्राबाबू नायडू यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांना आमंत्रण दिले व त्याआधी इन्फोसिस, एचपी, इन्टेल, अशा विविध कंपन्यांना पाचारण करून हैदराबादचे आयटी हब बनविले. चेन्नईत तामीळनाडू सरकारने रेनॉ, निस्सान, ह्युंदाई आदी कंपन्यांना आमंत्रण दिले व चेन्नईला ऑटो उद्योगावर स्वार केले. आयटीच्या युगात अमेरिकेतील सॅन्ता क्लॅरा सिलिकॉन व्हॅली बनली, तसे महाराष्ट्राचे ग्लोबल ब्रँड का होऊ शकले नाही, याचा विचार कधीच झाला नाही. 

अलीकडेच मॅक्सेल पुरस्कार सोहळ्यात पोतदार यांनी मीडिया व मनोरंजन, मॅनेजमेन्ट व संशोधनासाठी उच्च शिक्षण क्षेत्र आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडित अवजड उद्योग उत्पादने या तीन क्षेत्रात महाराष्ट्राला स्वतःची ओळख निर्माण करण्यास वाव आहे, असे म्हटले होते. याविषयी पोतदार म्हणाले की, मीडिया-मनोरंजन उद्योगात अॅनिमेशन व गेमिंग या वाढत्या उद्योगाचा समावेश होऊ शकतो. वॉर्नर ब्रदर्स, ट्वेन्टिएथ सेन्चुरी, युनिव्हर्सल अशा ग्लोबल जायन्ट्सना आपण महाराष्ट्राने बोलवावे. महाराष्ट्र ही उच्च शिक्षणाची पंढरी मानली जाते, त्यामुळे हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा अग्रगण्य संस्थांशी सहकार्य करून येथे ग्लोबल मॅनेजर्स किंवा रिसर्च इनोव्हेटर्स घडविण्याच्या संस्था उभारता येतील. येत्या पाच वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात १ लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. बुलेट ट्रेन, मेट्रो, मोनो असे प्रकल्प येताहेत. या सर्वांसाठी जेसीबी, अर्थमूव्हर्ससारखी यंत्रणा लागते. विदर्भ आदी भागांमध्ये त्यांची निर्मिती महाराष्ट्राने करावी व इन्फ्रा उद्योगाचा कणा बनावे. या निवडक क्षेत्रात जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास जागतिक पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण होऊ शकते, असे पोतदार म्हणाले. 
मॅक्सेल पुरस्कार सोहळ्यात दाखवलेली 'मॅक्स महाराष्ट्र' या ग्लोबल महाराष्ट्राची  वर उपल्बद आहे.

सौजन्य महाराष्ट्र टाईम्स.

No comments: