Sunday, August 31, 2014

अच्चुत गोडबोले.. simply genius!

31st ऑगस्त 2014:  तुम्ही अच्युत गोडबोले नावाच्या रसायना विषयी खुप एकलेले
असेल वाचलेल देखिल असेल; मला ही त्यांच्या विषयी खुप कुतुहुल होतं आणि ते नेहमीच रहाणार आहे... एखादी व्यक्ती इतकी मोठी कशी होवु शकते, झपाटल्या सारखं काम कशी करु शकते.. ग्रेट माणसं म्हणजे नेमकी कोणती? त्यांची विचारसरणी कशी असते, त्यांच्यावर प्रभाव कुणाचा असतो, त्यांची ध्येयं कोणती असतात,  ही माणसं कशी घडतात!  या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला अच्चुत गोडबोलेंचा - महाराष्ट्र टाईम्स मध्ये आज आलेला 'या वळणावर" हा लेखत मिळतील .. जरुर वाचा.... (तुमच्या सोयी साठी खाली देत आहे).सौजन्य महाराष्ट्र टाईम्स दि. 31.08.2014.

माझ्या आयुष्यात बरेचसे टर्निंग पॉइंट्स आले, पण त्यातले दोन अतिशय महत्त्वाचे होते. एक म्हणजे आयआयटीत शिकत असतानाचा आणि दुसरं म्हणजे आयटी क्षेत्रात काम करत असताना माझ्या मुलाला ऑटिझम आहे हे कळल्यावरचा! पहिल्यामुळे ‌माझा समाजाकडे ‌बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तर दुसऱ्यामुळे मी व्यसनाच्या गर्तेतून आणि प्रचंड न्यूनगंडातून बाहेर येऊन आयटी क्षेत्रात थोडीफार प्रगती करू शकलो. जरी माझ्या ३४ वर्षांच्या आयटी क्षेत्रामधल्या कारकिर्दीतली २३ वर्षं मी सीईओ/एमडी किंवा तत्सम सर्वोच्च पदी काढली असली, तरी आज मला एक लेखक म्हणवून घ्यायला आवडतं. आजच्या माझ्या वाचनाचा, विचारसरणीचा आणि लेखनाचा पाया माझ्या आयआयटीच्या दिवसांत घातला गेला असल्यामुळे तो टर्निंग पॉइंट मला खूपच महत्त्वाचा वाटतो. 

सोलापूरच्या शालेय जीवनात संगीत, साहित्य आणि चित्रकला या गणित, विज्ञान किंवा तंत्रज्ञान यांच्याइतक्याच किंवा त्यांच्यापेक्षाही मानवी आयुष्यात श्रेष्ठ आहेत, हे संस्कार झालेलेच होते. फक्त परीक्षेकरता अभ्यास न करता त्या विषयावर प्रेम करून त्यातलं सौंदर्य शोधण्यासाठी तो शिकला पाहिजे, हेही संस्कार माझ्यावर याच काळात झाले होते. आयआयटीत गेल्यावर ते विचार तर दृढ झालेच, पण त्यांनी आणखी वेगळंच वळण घेतलं. आयआयटीत येईपर्यंत बोर्डात सोळावा, विद्यापीठात पहिला, गणितात अनेक पारितोषिकं वगैरेंमुळे आपण उगीचच हुशार असल्यासारखं वाटायला लागलं होतं. तेच आयआयटीत गेल्यानंतर पूर्णपणे गळून पडलं आणि मी धाडकन जमिनीवर आलो. याचं कारण म्हणजे आमचा आयआयटी, टीआयएफआर आणि बीएआरसी यांच्यातल्या खूप हुशार मुलांचा एक ग्रूप जमला आणि आमची मैत्री वाढतच गेली. प्रथम दोन महिन्यांतून एकदा, नंतर महिन्यातून एकदा, दोनदा आणि नंतर दर आठवड्यात दोन-तीनदा आमच्या गाठीभेटी होत गेल्या. ही सर्व मंड‍ळी खूप हुशार होती. अनेकांची आयआयटीतली रँक माझ्यापेक्षा खूपच वरची होती, तर कित्येक जण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गणितज्ञ, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ होते. हुशारी म्हणजे काय ते मी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहत होतो. आपण त्यांच्यापुढे ‌'किस झाडकी पत्ती आहोत' हे कळून येत होतं. पुढच्याही आयुष्यात काही वर्षं माझं अमेरिकेतलं मुख्य ऑफिस केंब्रिजमध्ये एमआयटीच्या शेजारीच होतं. त्यामुळे लंच टाइममध्ये मी एमआयटीत जात असे. तिथे जेवणाच्या टेबलवर किंवा वाचनालयात अनेक नोबेल लॉरेट्स दिसायचे आणि भेटायचे. मॅनेजमेंटच्या क्षेत्रातही पीटर ड्रकर, सी. के. प्रल्हाद, ऑल्विन टॉफ्लर अशा अनेकांना भेटता-बोलता आलं. मायकेल पोर्टर आणि टॉम पीटर्स यांचे सेमिनार्स अटेंड करता आले. आयआयटीत असताना अनेक प्रसिद्ध लेखकांबरोबर चर्चा करता आल्या, तर रविशंकर, अली अकबर खाँ, विलायत खाँ, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, पंडित जसराज यांच्या असंख्य मैफिली ऐकण्याबरोबरच त्यांच्यापैकी अनेकांबरोबर बोलता आलं आणि त्यांच्याबरोबर प्रवास करता आला. या सगळ्यांमुळे माझं विश्व खूपच विस्तारलं आणि अनेक क्षेत्रातली 'ग्रेट' व्यक्तिमत्वं जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाल्यामुळे माझी ध्येयंही मोठी आणि ग्लोबल बनली. जमलं किती हा भाग वेगळा, पण जे करायचं त्यामागे एक्सलन्सचा ध्यास लागला. ‌‌'थिंकिंग बिग' म्हणजे काय ते कळलं आणि त्याच वेळी आपल्यातल्या मर्यादांचीही जाणीव झाली. 

पण माझी ध्येयं फक्त श्रीमंती आणि प्रसिद्धी यापेक्षा ज्ञान आणि माणुसकी या बाबतीत रुंदावली. याचं कारण आमच्या ग्रूपमधली मंडळी त्यांच्या त्यांच्या विषयांतली तज्ज्ञ तर होतीच, पण त्यांना इतरही अनेक विषयांत फक्त रसच नव्हता, तर सखोल ज्ञानही होतं. मग ते भारतीय तत्त्वज्ञान असो किंवा पाश्चिमात्य तत्त्वज्ञान. समाजशास्त्र असो की इंग्रजी साहित्य. विज्ञान असो की तंत्रज्ञान. या सगळ्या विषयांवर आमच्या दिवसरात्र प्रचंड चर्चा चालत. कधी संगीतातल्या रागदारीवर तर कधी हेमिंग्वे, सार्त्र किंवा सॅलिंजरवर. कधी चार्वाक आणि लोकायतवर, तर कधी कँट किंवा बर्ट्रांड रसेलवर. मी त्यांच्या या ज्ञानानं थक्क झालो आणि या चर्चांतून उजळून निघालो. इंजिनीअरिंग काय कोणीही करेल, पण फक्त मार्क मिळवणं, पैसा मिळवणं आणि भौतिक प्रगती करणं यापेक्षा या विश्वाविषयी आणि मनुष्यानं निर्माण केलेल्या ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं. हे कुतूहल आणि माणुसकी टिकवणं म्हणजेच माणूस असणं याची खात्री पटली. नाहीतर माणूस आणि जनावर यांच्यात फरक काय असा प्रश्न मला पडायला लागला. हे सगळं ज्ञान शिकणं आपल्याला शक्य नसलं तरी त्याची मूलतत्त्वं तरी समजावून घेतली पाहिजेत, या कल्पनेनं मी पछाडलो गेलो होतो. इन्स्टिट्यूटच्या परीक्षेपेक्षा आयुष्याची परीक्षा जास्त महत्त्वाची वाटायला लागली होती. थोडक्यात, हे सगळे विषय म्हणजे फक्त टाइमपास करण्यासाठीचे छंद राहिले नव्हते, तर ते आयुष्याचा अर्थ शोधण्याच्या शोधयात्रेतल्या कमिटमेंटचा भाग बनले होते. त्या काळी फ्लोरा फाऊंटनवरच्या फुटपाथवरच्या आणि पुस्तकांच्या दुकानातल्या शेकडो पुस्तकांनी माझ्या खोलीतलं कपाट सजलेलं असे. रात्रंदिवस संगीत, वाचन, अनेक विषयांवरच्या वाद-चर्चा आणि उरलेल्या वेळात जमल्यास इंजिनीअरिंग अशीच आमची आयआयटीतली शेवटची तीन वर्षं धुंदीत गेली. 

असं करता करता भारतात गरिबी आणि बेकारी का आहे यावर आमच्या वाद-चर्चा सुरू झाल्या. मग अॅडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन वगैरेंच्या थिअरीजचा अभ्यास सुरू झाला आणि आम्ही सगळे डाव्या चळवळीकडे आकर्षित झालो. आमच्यापैकी कुणालाही जीआरई देऊन सहजपणे अमेरिकेत स्थायिक होता आलं असतं, पण भारतातच राहून समाजपरिवर्तनासाठी काहीतरी करायचं या विचारानं मी त्या वाटेकडे फिरकलोही नाही. कुठलाच पक्ष किंवा देश आदर्श न मानता आम्ही चळवळीत उडी घेतली. आयआयटीतून बाहेर पडल्यावर मी शहाद्याच्या आदिवासी चळवळीत भाग घेतला आणि तिथलं रोमांचकारी आयुष्य अनुभवलं. एका सत्याग्रहात तुरुंगवासही भोगला आणि एकूणच आयुष्यात अनुभव वेचत गेलो. पण स्वतःतल्या मर्यादा लक्षात आल्यामुळे मी शहाद्यातून परत आलो. काही काळ बेकार अवस्थेत भणंगासारखा राहिलो. वस्त्यावस्त्यातून फिरलो. मुंबईत १२-१३ घरं बदलली आणि शेवटी आयटीत प्रवेश केला आणि माझा नवीन संघर्ष सुरू झाला.
आयटीमध्ये अनेक वर्षं काढल्यावर मला माझं वाचन आणि लेखन मला पुन्हा खुणावत होतं. त्यामुळे गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून मी 'फुल टाइम' लेखक झालो आणि मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी आपण त्यात निदान अर्धा-एक टक्का तरी भर टाकावी या जिद्दीनं लिहीत गेलो. मी अनेक विषयांवर लिहितो याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. पण त्याचं श्रेय मी माझ्या ग्रूपलाच देईन. ज्या विषयांवर मी लिहितो, त्यातल्या प्रत्येक विषयावर माझं प्रेम आहे. त्यातल्या सौंदर्यानं मी भारावून जातो. मग ती थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असो किंवा अर्थशास्त्रातल्या मार्क्स किंवा केन्स यांच्या थिअरीज असोत, गणितातली ग्राफ थिअरी असो किंवा संगीतातला मालकंस राग असो, साहित्यातली '‌थिएटर ऑफ दी अॅब्सर्ड'ची चळवळ असो किंवा कम्प्युटर आर्किटेक्चर आणि ऑपरेटिंग सीस्टीम असो. कुठलंही पुस्तक केवळ ते जास्त खपेल या उद्देशानं मी कधीच लिहीत नाही. त्या विषयानं पुरेपूर भारावलेल्या किंवा झपाटलेल्या अवस्थेतच मी लिहायला घेतो. मग ते व्यवस्थापनावरचं 'बोर्डरूम' असो, संगीतावरचं 'नादवेध' असो, विज्ञान-तंत्रज्ञानावरची 'किमयागार' आणि ‌'नॅनोदय' असोत, अर्थशास्त्रावरचं 'अर्थात' असो, मानसशास्त्रावरचं 'मनात' असो, गणितावरचं 'गणिती' असो किंवा यंदा दिवाळीत येणारी इंग्रजी साहित्यावरची 'झपुर्झा' ही पुस्तकद्वयी असो. जगभरच्या प्रवासात जमवलेली माझ्याकडची ४ हजार पुस्तकं त्यासाठी कामी आली. फक्त माहिती न देता प्रत्येक विषयातल्या वेगवेगळ्या थिअरीज आणि त्यातली माणसं यांच्याविषयीचं आणि त्यांच्या इतिहासाचं ज्ञान रंजक भाषेत लोकांपर्यंत पोहोचवावं, त्या विषयाची वाचकांना सोप्या भाषेत तोंडओळख करून द्यावी आणि त्यांना त्या विषयातलं पुढचं वाचायला उद्युक्त करावं हाच माझ्या लिखाणाचा उद्देश असतो. मी कुणीतरी त्या विषयातला तज्ज्ञ असल्याचा खोटा आवही आणत नाही. याचं कारण म्हणजे जरी बऱ्यापैकी वाचन करून जाडजूड अशी पुस्तकं मी लिहिली असली, तरी त्या विषयाचा माझा अभ्यास अजून चालूच असतो आणि मी माझ्या पुस्तकात फक्त त्या विषयाच्या आवरणाला स्पर्श केलाय याची मला पुरेपूर जाणीव असते. वाचकांनी मात्र मला भरभरून प्रचंड प्रेम दिल्यामुळेच मी लिहीत गेलो. आज मी जरी कुठलाही ठोस इझम मानत नसलो, तरी धर्म, वर्ण, लिंग, जात आणि वर्ग यातले भेदाभेद, आत्ताची प्रचंड चंगळवाद आणि विषमता यावर आधारलेली समाजव्यवस्था मला मान्य नाहीत. समता, बंधुत्व, मानवतावाद, विवेकवाद आणि विज्ञानवाद ही मी आधारमूल्यं मानतो. पण माझी ही विचारसरणी ‌आणि लेखनाची स्फूर्ती आणि लेखनाचे विषय मला माझ्या पूर्वीच्या ग्रूपमुळे आणि त्या वेळच्या वाचनामुळे, वाद-चर्चांमुळे आणि झपाटलेपणामुळे मिळाले आणि म्हणूनच मी तो माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट मानतो.

No comments: