Thursday, November 6, 2014

उद्योगविकासासाठी निर्धार हवा

महाराष्ट्र टाईम्स दी. ६ नव्हेंबर २०१४ 


उद्योगविकासासाठी निर्धार हवा   .. नितीन पोतदार 


देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही घोषणा खरी करत महाराष्ट्रात 'विकास' या एका शब्दाचे आश्वासन देत भाजपाने सरकार स्थापन केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या अपेक्षा नव्या मुख्यमंत्रांकडून जरा जास्तच वाढलेल्या आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक राज्य आहे असे म्हटले गेले, तरी महाराष्ट्रावर जवळपास सव्वातीन लाख कोटींचे कर्ज आणि कुठल्याही मोठ्या विकासकामासाठी पैसा नाही ही वस्तुस्थिती आहे. 

परदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीत महाराष्ट्र जरी पुढे दिसत असला, तरी अजूनही आपली कुठल्याही उद्योगक्षेत्रात जागतिक ओळख तयार झालेली नाही. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त एसइझेडला परवानग्या मिळाल्या, पण दुर्दैवाने एकही एसइझेड अजून सुरू झालेले नाही. तसेच एमआयडीसीच्या माध्यमातूनही आपण छोट्या छोट्या उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करू शकलो नाही. 'सहकार क्षेत्र' ही महाराष्ट्राची पहिली ओळख, पण त्याची आज काय अवस्था आहे? आत्महत्या करणारे शेतकरी, कर्जबाजारी सहकारी कारखाने आणि श्रीमंतीत लोळणारे त्यांचे संचालक! मुंबईच्या बॉलिवुडचा बोलबाला आहे, पण जगातला सगळ्यात मोठा रामोजी स्टुडिओ हैदराबादमध्ये साकार झाला आणि आपण आपला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचवू शकलो नाही. बघता बघता साऊथची फिल्मसिटी मुंबईच्या हिंदी सिनेमापुढे निघून गेली, तर आपल्या मराठी सिनेमाला अजूनही नीट श्वास (ऑस्कर वारीला पाठवूनदेखील) घेता आलेला नाही. 

आपण मराठी अस्मिता आणि इतर भावनात्मक विषयात अडकलो आहोत, पण जर उद्योग उभा राहिला, तरच राज्याच्या इतर विकासकामांना गती येईल. त्यासाठी काही निवडक क्षेत्रांत आपली मक्तेदारी उभारावीच लागेल. आज महाराष्ट्रात मिडिया अॅमण्ड एन्टरटेन्मेंट (मुंबई), पर्यटन (कोकण) आणि शिक्षणक्षेत्र (पुणे-नाशिक) यात चांगले काम होऊ शकते. रस्ते, बंदरे व वीज अशा पायाभूत सुविधांसाठी देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला लागणारी अवजड मशिनरींची निर्मिती (नागपूर-चंद्रपूर) विदर्भात होऊ शकते. या क्षेत्रांत होणारी प्रत्येक मोठी गुंतवणूक (देशी किंवा परदेशी) ही महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे असा आपला निर्धार असायला हवा.