Saturday, January 24, 2015

भाजून पक्कं झालेलं गाडगं - डॉ. कुमार सप्तर्षी


डॉ. कुमार सप्तर्षीनी लोकसत्ताच्या चतुरंगसाठी दिलेली मुलाखत माझ्या वाचक-मित्रांसाठी देत आहे....माझ्या तरुण मित्रांना आग्रहाची विनंती की त्यांनी हे विचार अगदी मना पासून वाचावे... जास्त काय लिहु !  
   
'मानवी जीवन समाजाशिवाय सिद्ध होत नाही. केवळ व्यक्तिजीवन अशक्य आहे. समाज आवडो वा न आवडो त्याच्या चौकटीतच जगावे लागते. माणसाचे जीवन तसे निर्थक, क्षणभंगूर असले, तरी त्याला सार्थक बनवता येते. माणसाने आपल्या जीवनाचा अर्थ शोधला आणि तीच आपल्या जीवनाला व्यापून टाकणारी शक्ती बनविली, तर आनंदमय जगणे शक्य असते. अन्यथा एकटे जगता येत नाही आणि दुसऱ्याशी पटत नाही ही माणसाची गोची आहे. भरभरून आणि आनंद घेत प्रसन्न जगायचे असेल तर कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल अशा परिस्थितीची कल्पना करावी लागते. मिळमिळीत आणि भिऊन जगण्यापेक्षा सक्रिय व चतन्यमय जगावे असा विचार तरुणपणी मनात येत असे.

वाचनातून, मित्रांबरोबर चर्चा करून 'जात' नावाची कल्पना भंपक आहे हे कळायला लागले. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना एक प्रेत दीड वर्ष रोज डिसेक्शन करावे लागते. एका शरीराची संपूर्ण माहिती घेऊन डॉक्टर दावा करतो की, 'कुठल्याही माणूसप्राण्याचे शरीर मी अंतर्बाह्य़ जाणतो.' याचा अर्थ विश्वात मानवी शरीराची रचना सर्वत्र एकच आहे. जातवार शरीररचना नाही. माझ्यापुढे प्रश्न पडला की, ज्या सत्याचे दर्शन प्रत्यक्षात झाले, तोच आपल्या वैचारिक बठकीचा आधार मानायचा की नाही?


ऊर्मिलाशी दोस्ती झाली. बारीकसारीक गोष्टींचा चारपाच वष्रे विचार झाला. लग्नाचा निर्णय अगदी समजूनउमजून घेतलेला. तरी घरी तो मान्य झाला नाही. कारण आमचा विवाह आंतरजातीय होता. त्यात मी थोरला. थोरला मुलगा चाकोरी सोडून वागला तर धाकटी भावंडे चौखूर उधळतील, असा आरोप झाला. त्यावेळी झालेल्या वादावादीचा मानसिक त्रास झाला. पण पुढे तर्कशुद्ध वादविवाद हाच जीवनाचा पाया बनला.
परंपरागत जुन्या भूमिका आणि तर्कशुद्ध विचारपद्धती यांचा टकराव होताना मला आतून आनंदाच्या उकळ्या फुटत. मार्च १९७३ मध्ये पुरीच्या शंकराचार्याशी जाहीर वादविवाद झाला. तो दोन दिवस चालला. अखंड वादविवादाची सनातन भारतीय परंपरा आहे. 'विषमता हा ईश्वराचा व निसर्गाचा स्वभाव आहे, म्हणून विषमता हा माणसाचा धर्म असला पाहिजे. काही लोक समतेचा अनाठायी आग्रह धरतात. त्यामुळे निसर्गावर आघात होतो. म्हणून १९७२ चा दुष्काळ पडला. मराठवाडय़ातील या भयंकर दुष्काळाला अस्पृश्यता निर्मूलनाचा, समानतावादाचा आग्रह धरणारे लोक कारणीभूत आहेत. त्यांनी निसर्गाला चिडविले म्हणून पाऊस गायब झाला', असे त्यांचे विधान होते. निसर्गाचा धर्म नेमका कोणता..? समानता की विषमता? यावर झालेला वादविवाद चांगलाच रंगला. दुसऱ्या दिवशी मात्र शंकराचार्याचे समर्थक   योजनापूर्वक आले. त्या दिवशी शंकराचार्याचे एकटय़ाचेच दीड तास प्रवचन झाले. ते एखादे उदाहरण देत, त्यावर विवेचन करीत आणि आपण जिंकलो असे म्हणत घोषणा देऊ लागत. 'िहदू धर्म की जय हो! अधर्म का नाश हो!' ही त्यांची घोषणा असे. 'अधर्म का नाश हो' असे म्हणताना ते माझ्याकडे बोट दाखवीत. शेवटी ते म्हणाले, 'हिंदू उदारमतवादी असतात. कुमार सप्तर्षीला मोक्ष मिळावा म्हणून त्याच्यावतीने मीच माझी माफी मागतो.' दुसऱ्या दिवशी मी शंकराचार्याची माफी मागितल्याशिवाय सभागृहातली गर्दी मला बोलू द्यायला तयार नव्हती. सभागृहात गोंधळ चालू झाला. शेवटी 'मला माईक दिल्यास मी माफी मागायला तयार आहे' असे मी तारस्वरात ओरडलो. माफीच्या आशेने त्यांनी माझ्या हातात माईक दिला. त्याचे कर्णे बाहेर लावलेले. मी म्हणालो, ''मी माफी मागण्यासारखा कोणताही गुन्हा केलेला नाही. शंकराचार्याजींनी मला मोक्ष मिळावा म्हणून माझ्या वतीने स्वतच स्वतची जाहीर माफी मागितली. माफीच्या या अजब न्यायाने मी अखिल ब्राह्मण जातीतर्फे महात्मा गांधींच्या हत्येबद्दल माफी मागतो. त्यामुळे ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर हा वाद संपुष्टात येऊन महाराष्ट्रातील सार्वजनिक वातावरण निर्मळ होईल.'' िहदू धर्माबद्दल मी एकही वाईट शब्द बोललो नव्हतो तरी िहसक वातावरण तयार झाले.

मी जातिमुक्त अस्सल भारतीय नागरिक बनल्याशिवाय ज्या जातीत अपघाताने जन्माला आलो त्याचे गुणदोष निरपेक्ष बुद्धीने पाहू शकलो नसतो. सत्याची भूमिका ठामपणे घेतली की आपोआप संघर्ष निर्माण होतो. सनातन भाषेत कर्तव्याला 'धर्म' हा शब्द आहे. उदा. पुत्रधर्म, कन्याधर्म, पितृधर्म, राजधर्म.  तसेच सच्चा भारतीय म्हणून खरे बोलणे, सर्व भारतीयांना बंधू मानणे, भारतीय नागरिकांच्या हिताचे बोलणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणजेच हा माझा 'नागरिक' धर्म आहे. मला माझ्या धर्माचे पालन केलेच पाहिजे हा निर्णय पक्का झाला. धर्मामुळे आयुष्याला अर्थ प्राप्त होतो.

१९६७ साली बिहारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. जयप्रकाशजींच्या निमंत्रणावरून आम्ही काही तरुण नवादा जिल्ह्य़ातील रजौली गावी दुष्काळग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी गेलो होतो. एक हजार लहान मुले व अडीचशे महिला यांना आम्ही दिवसातून एक वेळचे भोजन द्यायचो. दुपारी दवाखाना चालवायचो. अ‍ॅनिमियामुळे मुलींच्या मासिक पाळ्या बंद झाल्या होत्या. बाळंत झालेल्या स्त्रियांना कुपोषणामुळे दूध येत नव्हते. आम्ही दिलेल्या गोळ्यांमुळे व अन्नामुळे बंद झालेल्या दोन्ही नसíगक गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे महिला वर्ग आम्हाला 'भगवान' मानू लागला. लोकांचे वेदनाशमन करणे हाच ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा किंवा स्वतच ईश्वर बनण्याचा एकमेव मार्ग आहे, याचा साक्षात्कार झाला. कधी विधायक कामामुळे तर कधी संघर्षांमुळे जीवनाला वळण मिळते. डॉक्टर म्हणून पदवी घेण्यापूर्वी बिहारच्या दुष्काळात लोकांमध्ये काम केले नसते तर मी अगदी सामान्य डॉक्टर झालो असतो. अधिकाधिक श्रीमंतीचे राहणीमान हे ध्येय ठरले असते. 

थोरोच्या लेखनाचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. त्याला जोडून खलील जिब्रान यांच्या काव्याचाही परिणाम झाला. क्रांतिकारकांची चरित्रे व आत्मचरित्रे वाचली. ज्या समाजात ते राहत होते तिथे माणसामाणसांमध्ये खूप अंतर पडले होते, विषमता वाढली होती. समाजाची घडी नव्याने बसविण्यासाठी लोकांमधील अंतर कमी केले पाहिजे अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. क्रांती म्हणजे िहसा असा रूढ अर्थ होता. पण लोकांमधील अंतर कमी करणे याला क्रांती म्हणत असतील, तर आपण भारतीय क्रांती हाच आपल्या जीवनाचा अर्थ मानला पाहिजे असे मला वाटू लागले. क्रांतीसाठी जगावे आणि त्यासाठीच मरावे अशी ठाम धारणा तयार झाली. जीवनाला आणखी एक वळण लाभले. कॉ. लेनिन म्हणत असे, 'एकदा आपल्या जीवनाचा अर्थ समाजात क्रांती घडवून आणणे असा आहे हे उमगल्यानंतर अन्य गोष्टींत वेळ व्यर्थ घालविणे म्हणजे जीवनाला फालतू मानण्यासारखे आहे. क्रांतीचा ध्यास लागला पाहिजे. सर्व नाती बदलली पाहिजेत. क्रांतिकारक फक्त एकाच नात्याने बांधलेला असतो. क्रांतिकारकाला फक्त कॉम्रेड म्हणजे एका ध्येयाकडे एकाच वाटेने जाणारे साथी एवढेच नाते असते.'

मानवी जीवनातील सर्वोच्च नाते कॉम्रेड -म्हणजे - साथी आहे. याचा साक्षात्कार झाल्यानंतर आपला जीवनसाथी कॉम्रेड पाहिजे, कॉम्रेडबरोबरच विवाह केला पाहिजे; तरच जीवनात आनंद निर्माण होईल असे वाटू लागले. या धारणेमुळे मेडिकल कॉलेजमधील एका मत्रिणीशी असलेले स्नेहाचे नाते तुटले. आम्ही कॉलेजमध्ये घनिष्ठ मित्रांसारखे वावरत होतो. माझ्या मनात क्रांतीचा विचार पक्का झाल्यामुळे सहजीवनात संघर्षांला उभयतांना तोंड द्यावे लागेल हे नक्की होते. दीड-दोन वष्रे अशीच गेली. आत्मपरीक्षणाची सवय लागली. आमचे नाते नेमक्या कोणत्या कारणांमुळे संपत आहे या विचारावर चर्चा करायला ती मत्रीण तयार नव्हती.  अकल्पित व अनपेक्षित दुराव्यामुळे माझ्या मानसिकतेत बदल झाले. मी अध्यात्माकडे वळलो. सर्वाचे मंगल व्हावे अशी प्रार्थना रोज करू लागलो. अध्यात्माचे एक बरे असते. आपण मनातल्या मनात दुसऱ्या व्यक्तीला क्षमा करू शकतो, दुसऱ्या व्यक्तीचे मंगल व्हावे, अशी शुभकामना करून स्वतकडे नतिक मोठेपणा घेऊ शकतो. काही काळ लोटल्यानंतर जीवनात ऊर्मिला सराफ आली. १९६५ साली आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. ती प्रेयसी होती. त्याचबरोबर कॉम्रेडही होती. युवक क्रांती दलाच्या संस्थापकांतील एक होती. ऊर्मिलाबरोबरच्या विवाहाच्या निर्णयामुळे आयुष्याला अगदी नवे वळण मिळाले. ती गुजराती. आमच्या आंतरजातीय विवाहाला आईवडिलांचा विरोध होता. बहिणीच्या लग्नाला अडथळे येऊ नयेत म्हणून तिच्या लग्नानंतर आम्ही विवाहबद्ध झालो. १९६९ साली आमचा 'स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट' या कायद्यान्वये विवाह झाला. या कायद्याची आम्ही भारतीय नागरिक आहोत एवढी भूमिका पुरेशी असते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत जायचे होते. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि पुण्याचे खासदार एसेम जोशी यांच्या दिल्लीच्या बंगल्यात राहावयाचे असे ठरले होते. दिल्लीच्या सरकारी दवाखान्यात मला मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली होती. ऊर्मिला डबल बी.एस्सी. व एलएल.बी. झालेली. ती दिल्लीत वनस्पतीशास्त्रात एम.एस्सी. व पीएच.डी. करणार होती. ही योजना लग्नानंतर काही क्षणांत बारगळली. सरकारची तार आली होती. 'तुम्हाला दिलेली नेमणूक रद्द करण्यात येत आहे.इंटरव्ह्यू झाल्यानंतर पोलीस चौकशी होते. १९६८ साली केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप झाला होता. त्या संपाला पािठबा म्हणून समाजवादी मंडळींबरोबर मी कामगारांना घेऊन जाणारी लोकल ट्रेन अडविण्याचा सत्याग्रह केला होता. त्यात दोन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. शिक्षेच्या रेकॉर्डमुळे हातातली नोकरी गेली. मग पुण्यातच राहिलो. घर नव्हते. पुण्याच्या मध्यवस्तीतल्या मंडई परिसरात जागा मिळाली. घरची गरिबी नव्हती. पण आंतरजातीय विवाहाच्या निर्णयामुळे कृत्रिम गरिबीची दरड कोसळली होती. कर्ज काढून दवाखाना उभा केला. मेडिकल प्रॅक्टिस जोरात चालली. पाच वर्षांनी स्वतचे घर झाले. ते ऊर्मिलाच्या नावावर करून मी व्यवसायातून मुक्त झालो.

१९७४ साली राशीन या माझ्या मूळ गावी 'राशीन कम्युनची' स्थापना केली. ग्रामीण परिवर्तनासाठी गावागावांत परिवर्तनाची समांतर सत्ताकेंद्रे उभी केली पाहिजेत, असा आमच्या संघटनेचा सिद्धान्त होता. हा सिद्धान्त प्रत्यक्ष रणांगणात तपासून पाहायचा होता. म्हणून राशीनच्या दलित वस्तीमध्ये आम्ही 'राशीन कम्युन' सुरू केले. युक्रांदचे दहा-बारा पूर्णवेळ कार्यकत्रे माझ्यासोबत होते. कम्युनमध्ये निवास व एकत्र भोजन होत असे. काहीजण कम्युनमध्ये थांबत. बाकीचे तालुक्यात विविध ठिकाणी पदयात्रा करण्यासाठी बाहेर पडत. कम्युनचा काळ म्हणजे नित्य संघर्षांचा काळ. त्या काळात नुकतीच रोजगार हमी योजना सुरू झाली होती. रोजगार हमीच्या कामांवर जाऊन आम्ही महिलांना भेटायचो. त्यांची सुखदुखे जाणून घ्यायचो. युक्रांद संघटना सामान्य जनतेत खूपच लोकप्रिय झाली. ग्रामीण समाजव्यवस्था सरंजामदार वर्गाच्या हातात असते. तो वर्ग आमच्या आक्रमक धोरणामुळे हैराण झाला. २३ मार्च १९७५ रोजी भर दुपारी खून करण्याच्या इराद्याने मालक वर्गाच्या गुंडांनी भर चौकात मला घेरले. तो धुळवडीचा दिवस होता. ऐनवेळी त्या जागी महिलांचे घोळके आले. त्यात विशेषत दलित महिला होत्या. त्यांनी गुंडांची धोतरे ओढायला सुरुवात केली. त्यांना खाली पाडले. महिला त्यांच्या छातीवर बसल्या. हा अनुभव विलक्षण होता. काही सेकंदांपूर्वी मी मनातल्या मनात मरण्याची तयारी केली होती. हतबलतेने मन ग्रस्त झाले होते. २००-३०० गावकऱ्यांचा जमाव या प्रसंगात बघ्याची भूमिका घेत भोवती उभा होता. कुणीही हस्तक्षेप करत नव्हते. माझा खून व्हावा असे कुणाला वाटत नसले तरी ते मालक वर्गाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालेले नव्हते. महिला वर्गात दहशतीचा प्रभाव असला तरी त्यांची द्विधा मनस्थिती नव्हती. त्या आक्रोश करीत जमावाने धावत आल्या. त्यांनी गुंडांवर सामूहिक हल्ला चढविला. त्यांच्या कृतीत विलक्षण वेग होता. आक्रमकता होती. तो प्रसंग मी विसरू शकत नाही.
संघर्षांचे प्रसंग माझ्या जीवनात अनंत वेळा आले. प्रत्येक संघर्ष माणसाला अधिक मजबूत बनवितो. कच्चे गाडगे भाजल्यानंतरच पक्के होते. संघर्षांच्या प्रक्रियेत जुनाट विचार गळून पडतात हा सर्वात मोठा फायदा. प्रत्येक संघर्ष म्हणजे पुनर्जन्माची संधी असते. विशेषत संघर्ष अिहसक असला तर त्याचे परिणाम खूप हितकारक असतात. सर्वात क्लेशदायक असे दोन प्रसंग आहेत. तेवढे नमूद करतो.

२ ऑक्टोबर १९७५ ची मध्यरात्र. ५० पोलिसांची राहत्या घरावर धाड पडली. घरात ऊर्मिला एकटीच होती. पोलिसांनी सगळ्या डब्यात हात घातले. जॉर्ज फर्नाडिस यांच्याबरोबर झालेला माझा पत्रव्यवहार त्यांना शोधायचा होता. पंच म्हणून पोलिसांनी त्यांचे नेहमीचे दोन दारूडे मित्र सोबत आणले होते. भूमिगत असताना घरावर धाड पडल्याची बातमी कळली. मी त्वरित घरी पोहोचलो. तेव्हा फौजदार माझा आणि ऊर्मिलाचा लग्नापूर्वीचा पत्रव्यवहार वाचत होता. ती आमची प्रेमपत्रे होती. पोलीस ऊर्मिलाला अटक करण्याच्या तयारीत होते. मी फौजदारला म्हणालो, ''मला अटक करण्यासाठीच तुम्ही आला आहात हे उघड आहे. मग दारूडय़ांच्या साक्षीने खोटे पंचनामे करून ऊर्मिलाकडे आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली हा आरोप कशासाठी रंगवताय? मला अटक करा. त्याबद्दल माझी तक्रार नाही. आता आमची प्रेमपत्रे वाचणे ताबडतोब बंद करा.'' तेव्हा तो फौजदार म्हणाला, ''ठीक आहे. तुम्हाला अटक करतो, मॅडमना सोडून देतो. पण घाई काय आहे? तुमची प्रेमपत्रे वाचताना खूप मजा वाटत्येय. ही पत्रे वाचून झाल्यावर निघू.'' मी त्याला म्हणालो, ''मला तुझ्या तोंडावर थुंकावे असे वाटते. दुसऱ्याची प्रेमपत्रे वाचणे हे पोलिसांचे काम नव्हे.'' माझ्या प्रश्नावर त्याने गडगडाटी हास्य केले. त्या क्षणाला माझ्यावर कुणीतरी बलात्कार करतंय असा भास झाला.

२६ फेब्रुवारी २००३ या दिवशी भल्या सकाळी पावणेसात वाजता घरावर हल्ला झाला. तो दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचा. काही महिन्यांपूर्वी मी म्हणालो होतो की सावरकर व बॅ. जिना हे दोघे द्विराष्ट्रवादी होते. हिंदू व मुसलमान ही अलग राष्ट्रे आहेत असे त्यांचे मत होते. म. गांधींचा राष्ट्रवाद मात्र हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारलेला होता. त्यानंतर सलग चार-पाच महिने रात्रीबेरात्री धमक्यांचे फोन येत. घरावर प्रत्यक्ष हल्ला झाला तेव्हा मी डेक्कन क्वीनने पुण्याहून मुंबईला निघालो होतो. मी घरातून बाहेर पडल्यानंतर पाच बुरखेधारी तरुण बेल वाजवून घरात घुसले. दार उघडल्याबरोबर त्यांनी ऊर्मिलाला धक्का मारून बाजूला ढकलले. फोन तोडला. घरातला सानेगुरुजींचा फोटो पायदळी तुडविला. घरात ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती होती. तिचा अपवाद करून त्यांनी घरातील सर्व वस्तूंची मोडतोड केली. माझा मुलगा डॉ. कबीर याच्या पाठीला चाकू लावून त्याचे हात त्यांनी धरून ठेवले होते. मुंबईला पोचलो तेव्हा छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अनाउन्समेंट चालू होती. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ताबडतोब घरी फोन करावा. मी लगेच पुण्याला परतलो. हा माझ्या जीवनातील अत्यंत कटू प्रसंग होता. घरातल्या सर्व गोष्टी तोडून फोडून टाकल्या होत्या. काचांच्या तुकडय़ांचा घरात खच होता.

पुणे शहरात चर्चा, परिसंवाद, वैचारिक मतभेद या गोष्टी नित्याच्या आहेत. पुण्याचे ते वैभव मानले जाते. पण असा  प्रकार कधीच घडत नाही. म्हणूनच पुणे ही देशाची सांस्कृतिक व बौद्धिक राजधानी आहे. सभेला सभेने आणि प्रतिपक्षाच्या विचाराला आपल्या विचाराने उत्तर द्यावे हा पुण्याचा रिवाज आहे.  हा रिवाज तोडला गेला. त्यामुळे मनात एका कटू स्मृतीची सल कायम राहिली आहे.

जातिमुक्त मानसिकता अभ्यासाने प्राप्त करणे, संघर्षांत प्रतिपक्षाचा सन्मान राखणे आणि सत्याला घट्ट चिकटून राहणे या त्रिसूत्रीने जीवनाचे सोने होते हा अनुभव  आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी -mgsnidhi@gmail.com

सौजन्य लोकसत्ता चतुरांग दिनांक २३ जनेवारी २०१५

No comments: