Monday, July 27, 2015

जिकडे पैसा जास्त, तिकडे आयआयटियन्स ..

जिकडे पैसा जास्त, तिकडे आयआयटियन्स .. प्रभाकर मोरणकर

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्सि्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील विद्यार्थ्यांनी गेल्या ५० वर्षांत जीपीएस, मायक्रोचिपचा शोध लावला. मोटार, विजेचे बल्ब, रेडिओ, टेलीव्हिजन, कम्प्युटर, इंटरनेट, वायफाय, एमआरआय, लेजर, रोबोटसारखे शोध पाश्चिमात्य विद्यापीठांतील संशोधनाचेच यश आहे. अशा वेळी भारतीय शिक्षणसंस्थांनी, विशेषत: आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांचं योगदान काय?” असा प्रश्न नारायण मूर्ती यांनी उपस्थित केला आहे.

मागच्या आठवड्यात बेंगळुरूमधील आयआयएसच्या पदवीदान समारंभात इन्फोसिसचे एक संस्थापक नारायण मूर्ती यांनी सर्वोत्तम शिक्षणाचा दावा करणाऱ्या आयआयटी व आयआयएम या शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी काय संशोधन करतात, यावर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. एकप्रकारे त्यांनी उच्चशिक्षणाचं ऑडिटच केलं आहे. नारायण मूर्ती यांचं म्हणणं बरोबर आहे. त्याची कारणं माझ्या दृष्टिकोनातून अशी आहेत की, आयआयटीमधून बाहेर पडलेले बहुसंख्य विद्यार्थी परदेशात गेले. तिथे त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या नोकऱ्या स्वीकारल्या, त्या सगळ्या रुटीन स्वरूपाच्या होत्या. त्यात स्वतंत्र संशोधनाला फारसा वाव नव्हता. तिथेसुद्धा विद्यापीठांमध्ये फार कमी जण गेले. भारतात जे थोडेफार राहिले, त्यांच्याही नोकऱ्या अशाच स्वरूपाच्या होत्या. रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी हे खातं सरकारच्या अखत्यारित आहे. त्यात पगाराचं कोष्टक आयआयटी पदवीधराच्या दृष्टिकोनातून तेव्हा कमी होतं. याउलट, खासगी कंपन्यांमध्ये सेल्स, मार्केटिंग यात त्यांना जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळत होत्या. त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी मध्ये फारसं कुणी दाखल झालं नाही. जे विद्यार्थी जॉइन झाले, त्यांना थोडंफार काम करता आलं. उदा. रॉकेट रिसर्चमध्ये आपण बरंचसं काम केलेलं आहे. परम संगणकामध्ये आपल्याकडे चांगलं काम झालेलं आहे.