Monday, August 10, 2015

एक आई सक्षम होण गरजेच आहे ..

'मटा हेल्पलाइन'च्या हृद्य कार्यक्रमात २५ गुणवंतांना समाजदेणे सुपूर्द
म. टा. वृत्तसेवा, ठाणे

कुणाचे खाऊचे पैसे, कुणाचे पेन्शनचे तर कुणाचे पॉकेटमनीतून बाजूला काढलेले...माध्यम अनेक उद्देश एकच. पैशाअभावीे कुणाचे शिक्षण थांबू नये हाच! बिकट परिस्थितीशी झगडत, अडथळ्यांची पर्वा न करता अथक प्रयत्नांती यश कमावलेल्यांना उच्चशिक्षण घेता यावे म्हणून समाजातून आर्थिक दातृत्व पुढे आले आणि त्यांनी २५ विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला साथ दिली. परिस्थितीशी झुंज देणाऱ्या आणि दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या २५ गुणवंत विद्यार्थ्यांना 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून दानशूर व्यक्तींनी केलेली मदत शनिवारी समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आली. याच समाजदेण्याने त्यांच्या पंखांत नवी जिद्द भरली.

ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये हा दातृत्व सोहळा रंगला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा, मॅक्सेल फाऊंडेशनचे नितीन पोतदार यांच्या हस्ते मुलांना मदतीच्या रकमेचे चेक देण्यात आले. या मदतीलाच व्हॅल्युएबल ग्रूपने आणखी जोड देत, आपल्यातर्फे टॅब देण्यात आले. मागील वर्षीपर्यंत हेल्पलाइनमार्फत दहा मुलांसाठी मदत केली जात होती. यंदा तो आकडा २५पर्यंत गेला आणि त्याच बरोबरीने मदतीचा ओघही वाढला. यंदा वाचकांकडून २ कोटी ८० लाख रुपये मदत जमा झाली.

एक आई सक्षम होण गरजेच आहे ..

नितीन पोतदार, संचालक, मॅक्सेल फाऊंडेशन

आयुष्यातील आव्हाने पेलत 'मटा हेल्पलाइन'च्या गुणवंत मुलामुलींनी मिळवलेल्या यशाच्या गाथा ऐकून माझ्याकडे बोलायला शब्दच उरलेले नाहीत. 'मटा हेल्पलाइन' उपक्रमाला भरघोस मदत करणाऱ्या 'मटा'च्या वाचकांचे या निमित्ताने सर्वाधिक कौतुक वाटते. 'मटा हेल्पलाइन'सारख्या उपक्रमाला अमेरिका, युरोपमध्ये 'क्राऊड फंडिंग' म्हणतात. त्या देशात एखाद्या उद्योजकामागे 'क्राऊड फंडिंग'च्या रूपाने पैसा उभारला जातो. मात्र 'मटा'च्या वाचकांनी सामाजिक जाणिवेतून 'हेल्पलाइन'च्या प्रत्येक मुलामागे 'क्राऊड फंडिंग' केलेले आहे.९० टक्क्यांहून अधिक गुण हा शेवट नसून, करिअरची खरी सुरुवात आहे. देशातील कोट्यवधी मुलांना बिकट परिस्थितीमुळे आजतागायत शाळेचा दरवाजाही दिसलेला नाही, त्या मुलांसाठी 'मटा हेल्पलाइन'च्या मुलांनी नक्की प्रयत्न केले पाहिजेत.  प्रत्येक मुलीने सक्षम होणे गरजेचे आहे, म्हणूनच मॅक्सेल फाउंडेशनच्या वतीने विशेषत: मुलींना लॅपटॉप देत आहोत. कारण, एक आई सक्षम झाली तरच दोन घरं सक्षम होतात. भविष्यात अशाच सक्षमतेची अपेक्षा आहे. 

नोकऱ्या देणारे हात बना!
टक्क्यांवर करिअर निश्चिती करू नका, करिअरच्या दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शकाचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आदी विषयांप्रमाणे आठवी, नववी, दहावीसाठी राज्य सरकारने शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन विषयाचा अंतर्भाव करावा. टेक्नोलॉजीमुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी झालेले असून शेवटच्या स्तरावरील नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नोकरी मागणारे हात होऊ नका, तर नोकऱ्या देणारे हात बनून पुढे या.

लॅपटॉपचा वापर मुलींनी त्यांच्या भावंडांसोबत आजुबाजूच्या मुलांना 'कम्प्युटरसाक्षर' करण्यासाठी करावा. १७ मुलींना दिलेल्या लॅपटॉपमधून किमान १७० विद्यार्थी 'कम्प्युटरसाक्षर' होणे गरजेचे आहे. 'मटा'च्या वाचकांनी हेल्पलाइनच्या माध्यमातून उत्तम कार्य केलेले आहे. 'हेल्पलाइन'चा प्रवास असाच कायम सुरू रहावा यासाठी शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


जिद्द, चिकाटी, मेहनत अनुभवली
दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते

या मुलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेलं हे यश कौतुकास्पद आहे. समाजात काळजी घेणारी माणसं आहेत, हे 'मटा हेल्पलाइन'च्या उपक्रमावरून दिसून आले. समाजाकडून मिळालेल्या मदतीचा विश्वासच मुलांना बळ देणारा आहे. हा मदतीचा प्रचंड ओघ समाजातील संवेदनशीलता आणि भान दाखवतो, असं मला वाटतं. या गुणी मुलांचा सत्कार करताना माझाच सत्कार होतोय की काय असं मला वाटत होतं. आतापर्यंत मी हेल्पलाइनबद्दल ऐकून होतो. मात्र, आज प्रथमच हेल्पलाइन जवळून अनुभवली. मुलांनी दहावीत उत्तमच यश मिळविलं आहे. मात्र, यापुढे त्यांना करिअरसाठी खऱ्या मार्गदर्शनाची गरज भासणार आहे. मुलांनो, तुम्ही मिळविलेलं हे यश, ही टक्केवारी अशीच सोडून देऊ नका. पुढे काय करायचं हे ठरवलं पाहिजे. मार्गदर्शन करणारी व्यक्ती शोधा. आतापर्यंत कायम ठेवली तशीच जिद्द आणि चिकाटी मनात बाळगा. मला यापैकी प्रत्येक मुलाशी संवाद साधून त्याला जाणून घ्यायला आवडणार आहे. त्यांची कहाणी मला त्यांच्याच तोंड़ून ऐकायची आहे. या मुलांचे कष्ट, अभ्यास, कर्तृत्व यातून आमच्यासारख्यांना नक्कीच शिकायला मिळणार आहे. खाण्या-पिण्याचीही आबाळ असताना इतका नेटाने अभ्यास करून, घरकाम, वडिलांना मदत, रात्रशाळेतून शिक्षण हे सहज सोपे नाही. मला आठवतंय, आमची विद्यार्थीदशा अगदीच सुरळीत होती. बालपण तसं चांगल्या परिस्थितीत गेलं. आई-वडिलांचं मार्गदर्शन होतंच. प्रेरणा त्यांच्याकडून मिळतच होती. जिद्द, चिकाटी आणि मेहनत काय असते हे 'मटा हेल्पलाइन'च्या कार्यक्रमातून अनुभवता आलं. ही केवळ सुरुवात आहे. आत्मसंतुष्ट राहू नका. नवनवीन शिकण्याची जिद्द ठेवा. समाजात तुमच्यासारखेच अनेक विद्यार्थी आहेत, त्यांनाही आता तुम्ही मदतीचा हात द्या. दहावीत मिळालेल्या यशावर समाधानी न राहता, आणखी मोठं यश मिळविण्यासाठी जिद्द मनात बाळगा. एकदाच मिळविलेल्या घवघवीत यशापेक्षा यापुढेही यशाचे हे सातत्य कसे टिकवून ठेवता येईल, याकडे लक्ष द्या.No comments: