Saturday, March 26, 2016

ब्युटीपार्लर एक सिरीअस बिझनेस ..

महाराष्ट्र टाईम्स दी. 26 मार्च २०१६:  आपण विविध सेवांसाठी ‘ह्युमन रिसोर्सेस’ उपलब्ध करून देणे यावर आधारित असलेल्या स्टार्ट-अप बिझिनेस मॉडेलचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागील भागात आपण आधुनिक विज्ञानाची पदवी घेतलेले डॉक्टर्स तसेच प्राचीन शास्त्रांचे जाणकार असलेले भटजीही उपलब्ध करून देणारे स्टार्ट-अप्स बघितले. आज ब्युटीपार्लर या एका स्टार्ट-अप विषयी जाणून घेऊ या. 
Image result for wello wheel

आज स्त्रियांची कार्यक्षेत्रे विस्तारली आहेत.  जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिला नुसतच काम नव्हे तर धडाडीने नेतृत्व करताना दिसत आहेत. स्त्रिया ऑफिस मीटींग्ज, विविध परिषदांमध्ये चर्चेत भाग घेतात, कामानिमिताने देश-विदेशाचे दौरे करतातलेक्ट्रोनिक व सोशल-मिडियातला त्यांचा वावर लक्षणीय असतो.  तसेच कौटुंबिक सामाजिक समारंभात त्या मोकळेपणाने स्वतंत्र विचार मांडताना दिसतात. त्या स्वत:च्या नकळत स्वयंमुल्यमापन करीत असतात आणि आपली स्वयंप्रतिमा देखल जपत असतात.
 
स्मार्ट रहाणी व प्रगत विचारसरणी ..  

१९९४ ह्या एकाच वर्षात मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स या दोन्ही अव्वल दर्जाच्या विश्व सौंदर्यस्पर्धांमध्ये भारताच्या ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेन या सौंदर्यवतींनी बाजी मारलीआणि देशातील तरूणींमध्ये नव्या उत्साहाला उधाण आले. त्यानंतर २०००मध्ये प्रियंका चोप्राला मिस वर्ल्ड पुरस्कार मिळेपर्यंत हा सिलसिला सुरू राहिला. २००१ मध्ये एक पाऊल पुढे जात मिसेस वर्ल्ड हा पुरस्कार भारताच्या आणि तोही एका मराठी महिलेने मिळवला, तिचे नाव डॉ.अदिती गोवित्रीकर. मिसेस वर्ल्ड पुरस्कार फक्त विवाहीत स्त्रियांनाच दिला जातो. सौंदर्य प्रसाधने वापरण्याची मक्तेदारी केवळ तरूणवर्गातील स्त्रियांची नाही, मध्यमवयीन स्त्रियांनाही सुंदर दिसण्याचा हक्क आहे, नव्हे त्या दिसतात, हे सांगणे हा या मिसेस वर्ल्ड स्पर्धेंचा उद्देश. असे पुरस्कार म्हणजे भारतातील सौंदर्य प्रसाधनांची हजारो कोटींची बाजारपेठ काबीज करण्यासाठी परदेशी कंपन्यांची ही खेळी आहे असा सूर तेव्हा निघाला होता. असो.

आज काळाच्या ओघात इतके बदल झालेला आहे की साधी रहाणी म्हणजे गबाळी रहाणी नव्हे हे सगळ्यांनीच मान्य केली आहे.  म्हणुन ‘ब्युटीपार्लर’ ही स्त्रियांसाठी चैनीची नव्हे तर अतिशय गरजेची बाब होऊन गेली आहे.
अधिकारपदावर असलेल्या स्त्रियांचा कल हा नेहमीच आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि प्रेझेंटेबल करण्याकडे असतो. त्यासाठी नियमितपणे सौंदर्यसाधना करणं हे ओघाने आलचं. त्यामुळे उद्योगविश्वात ‘सौंदर्यक्षेत्र’ हा एक उद्दोगक्षेत्र म्हणून उदयास आलेला आहे.

रोजच्या धावपळीत ब्युटीपार्लर गाठणे कित्येक वेळा शक्य नसते. मग ‘विकएन्ड’ जो कुटुंबासाठी राखीव ठेवला जायचा, त्या दिवशी ब्युटीपार्लरमध्ये जावे लागते. बहुसंख्य स्त्रिया अशा साप्ताहीक सुट्टीच्या दिवशीच ब्युटीपार्लरमध्ये जात असल्याने तिथे एकच गर्दी होते. रिषीका चंदन ही करीअरीस्ट महिला याच अडचणीचा सामना करीत होती. या समस्येवर मात करण्याच्या तिच्या प्रयत्नातून आकाराला आला एक स्टार्ट अपज्याचे नाव ‘दि होम सलून’ www.thehomesalon.in .

इंडियन स्कूल ऑफ बिझनेसहैदराबाद मधून एमबीए झालेले रिषीका चंदन आणि तिचे पती निहार थानावाला (सीए) या दोघांनी मिळून ही स्टार्ट अप कंपनी २०१२ साली सुरु केली.  ही कंपनी सुरु होण्याआधी रिषीका एक इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करीत होती. त्यांनी विचार केला जर आज रोजचा किराणा, तयार कपडे व अन्न,  डॉक्टर, कॅब (टॅक्सी) सेवा,  फर्निचर या सेवा घरपोच मिळू लागल्यात तर आपल्याला ब्युटीपार्लरमध्ये मिळणाऱ्या सौंदर्यविषयक सेवा दरवेळी ब्युटीपार्लरमध्ये जाण्याऐवजी घरातच जर तज्ञ आणि कुशल अशा ब्युटीशियनने येऊन सेवा दिली तर?  ही कल्पनाच ‘दि होम सलून’ची निर्मिती करणारी ठरली.

‘दि होम सलून’मुळे स्त्रियांना फेशियल, मेकअप, मॅनीक्युअर, पेडीक्युअर, हेअर स्टाईल आणि हेअर केअर, नेल स्पा अशा विविध सौंदर्यविषयक सेवा घरबसल्या मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी फक्त एक कॉल करायचा किंवा ऑनलाईन बुकिंग करायच की तासाभरात प्रशिक्षित ब्युटीशियन तुमच्या घरात हजर. त्यांच्याकडे ब्युटीविषयक सेवा देणाऱ्या स्टायलिस्ट, ब्युटीशियन या क्षेत्रातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव असलेल्या आहेत. ग्राहकांना अतिशय स्वच्छ आणि उच्च दर्जाची सौंदर्यविषयक सेवा देण्याचे विशेष ‘इन हाउस’ उत्तम प्रशिक्षण त्यांना दिले जाते. सेवेच्या गरजेप्रमाणे सर्व साधनसामुग्री, ग्राहकांसाठीचा अॅप्रन, अगदी वटरहिटर सुद्धा ही मंडळी घरी घेऊन येतात आणि घरातच ‘स्पा’चाही ‘फील’ दिला जातो.

दर्जा’, व्यावसायिकतापण होम फ्रेंडली पर्यायामुळेच या स्टार्ट अपची दिवसेंदिवस वाढ होतेय हे विशेष! मुळात ब्युटीपार्लरमध्ये उच्च दर्जाची सेवा मिळते आणि घरगुती मिळणारी सेवा ही सुमार दर्जाची असते हा लोकांचा सौंदर्यविषयीचा दृष्टीकोन बदलण्याचे आव्हान या स्टार्ट अपने पेलले आहे.  सध्या जवळपास ५० तज्ज्ञ मंडळी ‘दि होम सलून’साठी काम करतात. ब्रायडल शवर, बेबी शवर तसेच किटी पार्टीजमध्ये स्पा कॉर्नर तयार करण्याच्या ऑर्डर्सही घेतल्या जात आहेत.  सुरुवातीला फक्त पवईपुरती मर्यादित असलेली त्यांची सेवा आता संपूर्ण मुंबईभर आणि पुण्यातही पसरत आहे. लवकरच भारतातील मोठी शहरेही आपल्या विस्ताराखाली आणण्याचे प्रयत्न कंपनीने सुरु केले आहेत.  
गुतंवणूकदारांच्या अर्थसहाय्यामुळे होम सलोनची आगेकूच जोमात सुरु आहे.  FICCIच्या रिपोर्टनुसार भारताच्या सौंदर्यविषयक मार्केटची उलाढाल ४९००० कोटी रुपये आहे. ह्यात ब्युटी प्रोडक्ट्स, सलून, कॉस्मेटिक ट्रीटमेंटसचा समावेश होतो. ह्यापैकी ८५ टक्के वाटा हा स्त्री ग्राहकांद्वारा येतो.  ‘व्हेंचर नर्सरी’ ह्या गुंतवणूक फर्मने ही कल्पना उचलून धरली आणि ‘दि होम सलून’ला भांडवल पुरवठा केला. आज ‘दि होम सलून’ला महिन्याला ८०० पर्यंत अपइन्टमेन्ट मिळतात. उत्तम टीमवर्क, प्रशिक्षित स्टाफ,  वाढती बाजारपेठ आणि सेवेचे उच्च दर्जाचे प्रमाणीकरण या माध्यमातून कुठेही तडजोड न करता ‘दि होम सलून’ची सौंदर्यसेवा बाजारपेठ काबीज करत चालली आहे.

एका घरगुती गरजेतून एक ‘स्टार्ट अप’ची कल्पना उदयास येऊन ‘दि होम सलून’च्या रुपात ती वास्तवात आलेली आहे. काळ बदलतो, माणसं बदलतात, तसा समाज बदलतो, त्यांच्या गरजा बदलतात, नव्या गरजा निर्माण होतात. या गरजांची पूर्तता करण्यासाठी नवी उद्योगक्षेत्रे उदयास येतात, नव्हे कल्पक व्यक्ती अशा उद्योगक्षेत्रांना जन्म देऊन स्वत:ची  आर्थिकप्रगती करतात तसेच इतरांसाठी रोजगारही निर्माण करतात. त्यासाठी बदलणार्‍या समाजाच्या गरजा ओळखणं गरजेचं आहे.


No comments: