Sunday, June 5, 2016

तरुणांनी सैराटचं झाल पाहिजे ..

सैराट हा माझा मते एक सिनेमा नसून आपल्या जगण्यातलं कटु आणि तितकंच भयाण वास्तव दाखवतो. कुणी म्हणत हा सिनेमा एक मनाला खोलवर चटका लावणारी प्रेमकथा आहे, कुणी म्हणत आपल्या जातीव्यवस्थेवर केलेलं कठोर भाष्य आहे, तर कुणी म्हणत हा सिनेमा ऑनर किलिंगवर आहे.
खरं तर सैराट सिनेमात दाखवलेली लव-स्टोरी स्टोरी हे निमित्तमात्र आहे. सैराट जातीच्या, धर्माच्या आणि वर्गाच्या खूपच पलीकडे जातो. गाव, खेडी, भाषा, राज्य, आणि खर तर देशांच्या ही सीमेपलीकडे तो जातो. आपण जन्मापासून ज्यां विचारांवर, आचारांवर, संस्कारावर आणि खर तर खोट्या अहंकारावार वाढतो ते आपल्याला ‘माणूस’ बनण्यापासून किती लांब ठेवतात याची प्रचीती आपल्याला सिनेमा बघताना वारंवार येतरहाते. आपल्या जुन्या रूढी परंपरांचा आपल्याला आपलाच राग येवू लागतो.


शिकून ‘मोठ’ होणं म्हणजे फक्त पैसे, प्रसिद्धी त्यातून समाजात आणि सत्तेत स्थान मिळवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड वाटते. जग साक्षरतेच्या पुढे जावून ज्ञानधिष्टीत युगात आलेलं आहे. म्हणजे नेमक काय? तर आपण एका क्षणात एका क्लिकवर जगात कुठल्याही माणसांशी आपल्या कंप्यूटद्वारे जोडू शकतो, आपला मेसेज पाठवू शकतो - त्यातून अर्थपूर्ण ‘संवाद’ साधाला जातो का हा मोठा प्रश्न आहे? जगाची सगळी महिती आज गुगल वर उपल्बद झाली असली तरी माणसांनी माणसासारखं जगण्याचा किंवा इतरांना जगु देण्याची माहिती अजूनही कुठल्याच वेबसाईट वर अजूनही मिळत नाही. ‘सोशल मिडिया’वर आपलं हजारो मित्रांशी जोडलं जाण किती वरवरच आहे, तात्कालिक आहे हे आपण सार्वजण जाणतो. 
प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला पण आपण अजूनही विचारांनी ‘मोबाईल’ झालेलो नाही, आपल्या रोजच्या वागण्यात आपण किती रिजीड होतो हे कधीकधी आपल्याला समजतच नाही.ईबोला नावाच्या वायरस पेक्षाही ‘ईगो’ नावाचा वायरसमुळे आपल्या कित्येक पिढ्या जिवंतपाणी मरून गेल्या, नव्हे अजूनही रोज मरत आहेत, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. उद्या सैराटमुळे आंतरजातीय लग्न कुठल्याही विरोधाशिवाय होऊ लागली म्हणजे आपण खूप पुढे गेलो का? म्हणून आज गरज आहे ती विचारांनी परशा आणि कृतीत आर्ची होऊन सैराट होण्याची! तरुण पिढीने फक्त इंग्रजी मध्ये बोलण्याची ! सैराट होण्याची.
मग आपल्याला सैराट सिनेमा का आवडला? कारण तो आपल्या रोजच्याजगण्याताली क्रूर विसंगती दाखवतो. कुठेतरी आपल्या उमेदीला, स्वप्नाला, आपल्यातल्या त्यां परशा आणि आर्चीला याचे चटके बसलेले आहे. आपण रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करतो, कुठेतरी आपली उपेक्षा झालेली आहे, आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे, आपल्याच माणसांकडून आपला अपमान झालेला आहे, आणि तो आपण निमुटपणे मनाविरुध्द सहन देखील केलेला आहे. आपण होरापोळलोय! नव्हे आपण अजूनही रोज होरपळतोच आहोत. जगाशी लढण्यात कुठेतरी आपण कमी पडतो याची जाणीव होते आणि सैराट आपल्या त्यां सगळ्या वेदानांना वाट करून देतो. आपल्याला तो आरसा दाखवतो – आपण रक्तबंबाळ होतो. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये आपण आत्महत्या करतो. हे त्याच यश आहे.
या यशाला खरी उंची मिळाली ती दिगदर्शक नागराज मंजुळेनी दिलेल्या विविध मुलाखतींची. तो मनापासुन बोलतो, सोपं पण थेट आणि नम्रपणे स्वत:चे विचार मांडतो. त्याच्या बोलण्यात कुठेठेही दांभिकता नाही, पिस्तुल्या किंवा फॅन्ड्रीच्या यशाची अरेरावी नाही. नागराजने मराठी सिने सृष्टीत नकळतपणे स्वत:ची अशी एक मोठी रेष नक्कीच ओढलेली आहे... मराठी सिनेमाने २००४ नंतर खरा 'श्वास' घेतला आहे .. त्याने सुद्दा सैराट व्हायला काय हरकत आहे?

नितीन पोतदार - 
nitinpotdar@yahoo.com

No comments: