Wednesday, August 24, 2016

गतिमान ऑलम्पिक – गतिमान स्टार्ट-अप्स ..

Image result for rio olympic 2016महाराष्ट्र टाईम्स २० ऑगस्त २०१६ :  १८९६ साली अथेन्स येथे आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक खेळांची सुरुवात अधिक वेगवान, अधिक उंच आणि अधिक सामर्थ्यशालीया ब्रीदवाक्याने झाली. क्रीडा स्पर्धांचा महाकुंभम्हणून ओळखले जाणारे ऑलम्पिक जगभरातील खेळाडू आणि त्यांचे चाहते यांचा श्वासआहे. इथं प्रत्येक खेळाडूच विश्व काही मिनिटांनी नव्हे तर काही मिली-सेकंदानी बदलून जातं. म्हणून गतिमानता हा ऑलम्पिक स्पर्धेचा खरा श्वास आहे असं म्हटलं तर मुळीच चुकीच होणार नाही. मग अशा स्पर्धेत आजचे गतिमान स्टार्टअप्स तरी मागे कसे राहणार?

या गतिमान ऑलम्पिकचे खास वैशिष्ट्य म्हणजे पोहणे, धावणे, कसरती, सायकलिंग या स्पर्धेत किंवा अगदी हॉकी-फुटबॉल सारख्या वेगवान खेळात एखादा खेळाडू स्पर्धकाचा मागराखणे, त्यांचे बारकावे टिपणे आणि त्याच गतीने प्रेक्षक-चाहत्यांना त्या थराराचा अनुभव देणे ही गती भल्या भाल्यांची मती गुंग करणारी असते.  हीच कामगिरी या ऑलम्पिकमध्ये सिडनी स्थित एक स्टार्ट अप डोअररामा’ (www.doarma.com ) बजावत आहे. या जागतिक खेळांसाठी या स्टार्ट अपने खास तंत्र विकसित केले आहे. खेळाडूंचा माग ठेवणारे जीपीएस, अॅनिमेशन आणि उपग्रहाकडून मिळणाऱ्या प्रतिमा यांचा सुंदर मिलाफ त्यात करण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांना त्रिमितीच्या (थ्रीडी) आभासी जगाचा अनुभव घेता येतो. रिओमध्ये चाललेला इव्हेंट पाहता-पाहता रिअलहोतो. चाहते त्यांच्यासमोरच्या दृष्यांवर नियंत्रण ठेऊ शकतात. तसेच कोणत्याही खेळाडूचा माग काढू शकतात.

चित्रपटकलेत जागतिक प्रतिष्ठेचे मानले गेलेले अकॅडमीपुरस्कार विजेते अॅनिमेटर ख्रिस कूपर यांनी डोअररामाची सुरुवात केली.  मॅरेथॉनसारख्या स्पर्धांचा डोंगराळ भाग दाखवण्यासाठी त्यांच्या कलाकारांनी थ्री डी प्रकारातील २० नकाशे तयार केले. याआधीचे नकाशे हे एकाच ठिकाणचे व्हू दाखवत होते. पण त्यांचे नकाशे एकाच वेळी धावपटूंना नेमका मार्ग दाखवतात आणि प्रेक्षकांना पाहण्यातला आनंदही देतात. नुसते प्रगत तंत्रज्ञान हाताशी असून चालत नाही. त्याला कल्पकता आणि पूर्व नियोजनाची जोड असावी लागते. सायकलिंग, धावणे या स्पर्धांसाठीचे त्रिमिती नकाशे फार आधीपासून तयार करण्यात आलेले आहेत. मात्र जिवंतपणाचा भास निर्माण करणाऱ्या या त्रिमिती नकाशांमुळे स्पर्धांमध्ये एक वेगळीच जानआली आहे. या नकाशांनी ऑलम्पिक नगरीत आगमन करीत असलेल्या धावपटूंना त्यांच्या धावण्याचा मार्ग दाखवला. ७५ लाख प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्याची मोठी कामगिरीही बजावली. यामुळेच या स्टार्ट अप सेवेचा वापर करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली.

मात्र ही सुविधा मोफत असल्याने या स्टार्ट अपसाठी कमाईचा प्रश्न आहेच. सध्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर कंपनी काम करत असून याबद्दल मोठ्या क्रीडा संघटनांशी बोलणे सुरु आहे. त्यात ऑलम्पिक हे एक मोठे आव्हान होते, ते कंपनीने यशस्वीपणे पार पाडले. पण खरी परिक्षा पुढेच आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्व महत्वाच्या स्पर्धा त्रिमिती तंत्राने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून या क्षेत्रात पहिल्या स्थानावर राहण्याचा कंपनीचा अढळ इरादा आहे.

ऑलम्पिक २०२०
मानवनिर्मित उल्का वर्षावाने ऑलम्पिक २०२०च्या उद्घाटनात काहीतरी नाविन्यपूर्ण हवे म्हणून या उगवत्या सूर्याच्या देशात मावळतीचे रंग या नवनिर्मित उल्का वर्षावाने भरले जाणार आहेत आणि हे काम जपानमधील स्टार अलेने (www.global.star-ale.com ) या स्टार्ट आप ने सुरु केली आहे.  अत्यंत लहान आकाराच्या उपग्रहांची एक तुकडी अवकाशात विशिष्ट ठिकाणी आल्यावर मैदानावरील तंत्रज्ञ एक कळ दाबतील, आणि या उपग्रहातून मानवनिर्मित रंगीबेरंगी उल्कांचा वर्षाव होऊ लागेल. हे नयनरम्य तुषारांचे अवकाश नृत्य टोकियो मैदानाच्या ६२ चौ. मैलाच्या परिसरातील सर्वांना पाहता येईल.

आकाशातील अनोख्या आतषबाजीसाठी ८.१ दशलक्ष डॉलर्स उधळलेजाणार आहेत. याशिवाय उपग्रहाचा खर्च वेगळाच असेल. यावर स्टार अलेच्या संस्थापक, खगोलशास्त्रज्ञ लेना ओकाजीमा म्हणतात, याकडे उधळपट्टी म्हणून पाहण्यापेक्षा आकाशातील अडगळ, निकामी उपग्रह नष्ट करण्याचा सुरक्षित मार्ग म्हणून पाहायला हवे.

जागतिक स्पर्धांच्या निमित्ताने ऑलम्पिक फिव्हरसर्वत्र पसरणे ही क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन  देणारी बाब असली तरी रिओ ऑलम्पिकसमोरील एक मोठे आव्हान आहे झिका विषाणूंचे. हा आजार झाल्यास सव्यंग मूल जन्माला येण्याची शक्यता असते. यामुळेच गर्भवती महिलांनी रिओ स्पर्धेत जाऊ नये असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. विशिष्ट प्रकारच्या डासामुळे पसरणाऱ्या झिका आजाराची प्राथमिक लक्षणे लवकर समजण्यासाठी सॅनफ्रान्सिस्को येथील किनसाया (www.kinsahealth.com ) स्टार्ट अपने एक स्मार्ट उपकरण (थर्मामीटर) विकसित केले आहे. ते फक्त शरीराचे तापमान पाहत नाही तर यावर साधी टिचकी मारली असता आजाराची लक्षणे लक्षात येतात. या क्षेत्रातील हे पहिले स्मार्ट फोन अॅप असून त्याला एफडीएचीही मान्यता आहे. त्याची किंमत २३.९९ डॉलर्स इतकी आहे. रिओ ऑलम्पिकमध्ये 'किनसा'ची वैशिष्ट्ये अॅथलेटस व त्यांच्या लवाजम्यास उपयुक्त ठरतील असा विश्वास या स्टार्ट अपचे संस्थापक आणि सीईओ इंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे.

ऑलम्पिकच्या निमित्ताने रिओ येथे येणारे स्पर्धक व प्रेक्षक-पर्यटक यांची सुरक्षा हे एक मोठे आव्हान आयोजकांसमोर आहे. अथेन्स येथील पहिल्या ऑलम्पिक स्पर्धेत १४ देशाच्या २४१ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावर्षी २०६ देशाच्या अंदाचे साडे दहा हजार स्पर्धकांचा सहभाग असून ७५ लाख तिकिटांची विक्री झाली आहे. याशिवाय याकाळात ५ लाख पर्यटक येण्याची शक्यता आहे. या सर्वांची सुरक्षा ही एक मोठी समस्या आहे. ऑस्ट्रेलिया आणि स्पेनच्या खेळाडूंना बंदुकीच्या धाकाने लुटण्याचे प्रकार नुकतेच झालेत. याशिवाय वाढती गुन्हेगारी आहेच. माणसांच्या बरोबरीने अत्याधुनिक साधनांचा सुरक्षेमधला वापर वाढतोय. से व्हीयु (www.sayvu.com ) हे नवे स्टार्ट अप तंत्रज्ञान सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात झाले आहे.

आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण व्यवस्था (आयएसडीएस) यांनी ऑलम्पिकसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेच्या अनेक साधनांपैकी एक संस्था म्हणून से व्हीयुया इस्रायली तंत्रज्ञानाची निवड केली आहे. से व्हीयुचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अमोटझ कोसकास यासंबधात म्हणतात, ‘खास रिओ ऑलम्पिकसाठी आम्ही एक हॉटलाईन केंद्र चालू केले आहे. तातडीच्या कायदा व सुव्यवस्थेला मदत व्हावी असा यातला उद्देश आहे. या व्यवस्थांना वेळीच सावध करून ऑलम्पिकसाठी येणाऱ्या पाहुण्यांची सुरक्षा बळकट करण्याचा प्रयत्न आहे. जीव वाचवण्याच्या सुरक्षेशिवाय तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी, धमक्यांसाठीसुद्धा कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणांना, इस्पितळांना सावध करण्यासाठी या अॅपचा उपयोग होतो. स्थळाचा नकाशा, संकटाचा प्रकार याचा अंदाज कळवता येतो.
दोन दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीने सुरुवात झालेली ही कंपनी आज अमेरिका, चीन, युरोप व आफ्रिकेत उपयुक्त भागीदार मिळवून आपला विस्तार करीत आहे. अमेरिका-इस्रायलच्या बर्ड फौंडेशनकडून कंपनीला एक दशलक्ष अनुदान पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकेच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालय आणि अमेरिकेच्या होमलॅण्ड सिक्युरिटीने संयुक्तपणे हा पुरस्कार दिला आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि तातडीची सेवा देणारे वैद्यकीय व्यावसायिक यांनी संकटकालीन परिस्थितीत त्वरेने प्रतिसाद द्यावा या उद्देशाने त्यांना प्रोच्छाहित-प्रशिक्षित करण्यासाठी सशक्त संपर्क व्यवस्थेसाठी हा पुरस्कार कंपनी वापरणार आहे.

भारतात अनेक प्रकारचे खेळ आणि हजारो होतकरू खेळाडू आहेत. त्यांना जागतिक स्तरावर यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावीच लागते; पण आंतराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी एक वेगळी मानसिकता, तब्येत, सराव याची गरज असते. त्यात त्यांचे तुलनात्मक रेकॉर्डस आणि पुढील स्पर्धात्मक कामगिरीसाठी लागणारी तयारी करून घेताना प्रगत तंत्राज्ञाना बरोबर काही नवीन उपाय व धाडसी निर्णय घ्यावे लागतील. हे करण्यासाठी तरूणांनीच विविध स्टर्टअपच्या माध्यमातुन पुढे यायला हवे. करण्यासारखं खुप आहे हे आज समजल तरी पुष्कळं.   

नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर

संस्थापक, मॅक्सेल फाऊंडेशन

No comments: