Monday, September 5, 2016

अपयशावर बोलू काही !

Image result for unsuccessful startups in india
महाराष्ट्र टाईम्स ३ सप्टेंबर २०१६ : गेल्या काही वर्षात 'स्टार्टअप' हा जगभरात एक चलनीनाण्याप्रमाणे परवलीचा शब्द झालेला आहे हे मी माझ्या पहिल्या लेखात म्हटलं होतं आणि तशा काही यशकथा आपण गेली आठ महिने बघत आलो.  यशकथा या नेहमीच प्रेरक असतात, परंतु विविध अभ्यास-पाहणींमधून असे दिसून आले आहे की, नव्याने सुरु होणाऱ्या स्टार्ट अपपैकी २० टक्के घवघवीत यश मिळवून मानाने जगतात, तर ८० टक्के पहिल्या तीन वर्षातच मान टाकतात.
 
चुका म्हणजे ठोस अनुभव !

कल्पकता हे स्टार्ट अपचे मुख्य भांडवल असले आणि एखादी कल्पना कितीही प्रेमात पडणारी असली तरी त्याला वास्तव आणि उपयुक्तता यांची जोड असावी लागते.  अनेक पदवीधर इंजिनियर्सना उद्योगशीलता म्हणजे काय हेच माहित नसते. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील त्यांचा प्रवास हा पूर्व तयारीशिवायचा असतो.

आपल्याला काय द्यायचेय यापेक्षा मार्केटची काय गरज आहे हे ओळखून उत्पादनात आवश्यक ते बदल न केल्याने, ते उत्पादन युजर फ्रेंडली नसल्याने जवळपास ४२ % उद्योग बंद झालेले आहेत.

अमेरिकेतील स्टार्ट अप भांडवल उभारणीसाठी कुटुंब-मित्र परिवार यांच्यावर अवलंबून असतात. भारतात मात्र गुंतवणूकदार, व्हेंचर कॅपिटलिस्ट, धोका पत्करून गुंतवणूक करणारे यांवर अवलंबून राहतात. यामुळे संस्थापक- सह संस्थापकांना स्वातंत्र्य राहत नाही. त्यातून वाद उद्भवल्यास ते उद्योगातून लवकर बाहेर पडतात.

आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्यातील स्पर्धा लक्षात घेऊन सज्ज न राहिल्यास १९ टक्के उद्योग बंद पडलेले दिसतात.

मार्केटिंग हा कोणत्याही उद्योगाचा पाया असतो. पण त्याकडे योग्य आर्थिक आणि बौद्धिक लक्ष न पुरवल्याने १४ टक्के उद्योग स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेले आहेत.

सिलिकॉन व्हॅलीत अपयशाच्या कारणांची मोकळी चर्चा होते. आपल्या चुकांकडे डोळसपणे पहिले जाते. म्हणूनच तिथे शेकडो नवउद्योजक अपयशाची ठेच लागल्यावरही पुन्हा उठतात आणि आधीच्या चुका टाळून नवीन कल्पनांच्या बळावर यशाच्या दिशेने मार्गक्रमण करतात.

आपल्याकडे मात्र अपयश उघडपणे सांगण्याची पद्धतच नाही. म्हणजे जो अपयश झाला तो स्वत: तर सांगणार नाहीच, पण व्यवसाया-उद्योगाबाबत मार्गदर्शन करणारेही अपयशगाथांना कोसो मैल दूर ठेवतात. याचे कारण त्यांना वाटते अशी उदाहरणे देऊन आपण लोकांची उमेद कमी करू, किंवा त्यांना नकारात्मक सांगणे योग्य नाही. अशा गोष्टी सांगितल्या तर आपली लोकप्रियता कमी होईल असाही एक विचार असतो.

उलट अपयशाची मागची कारणे नीट समजून घेतली तर नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांना अपयश टाळण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्यात, काय दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन मिळू शकते म्हणून अपयाशावर खुली चर्चा झाली पाहिजे. यशाप्रमाणेच अपयशापासून ‘पुढच्याच ठेस मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे बरेच काही ‘शहाणपण’ शिकता येते. नव्याने उद्योग सुरु करू इच्छीणाऱ्या अनेकांना पुढील उदाहरणांवरून नक्कीच बरेच काही शिकता येईल.


डाझो 
भारतातील हा पहिला घरपोच अन्नपदार्थ देणारा Dazo हा अॅप आधारित उद्योग ऑक्टोबर २०१५ मध्ये बंद पडला. संस्थापकांची विश्वसार्हता गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन, अॅमोझॉन इंडियाचे कंट्री मॅनेजर अमित अगरवाल, कॉमन फ्लोअरचे सह संस्थापक सुमित जैन, टॅक्सी फॉर शुअरचे सह संस्थापक अप्रयमेया राधाकृष्णा असे सोन्यासारखे गुंतवणूकदार असूनही डाझो (Dazo) वाचू शकले नाही.

डाझोचे संस्थापक शशांक कुमार सिंघल हे इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे पदवीधर ; सहसंस्थापक मोनिका रस्तोगी या सुद्धा अशाच उच्च प्रशिक्षित. असे सगळे असूनही स्थापनेनंतरच्या वर्षभरातच हे स्टार्ट अप बंद पडले. या स्टार्ट अपची सुरुवात स्वतःचे शेफ बाळगून व विश्वासार्ह भागीदार घेऊन इंटरनेट किचन म्हणून झाली. बेंगळूरूच्या काही भागात ही सेवा पुरवली जायची. परंतु अनेक उपहारगृहाच्या पदार्थांचा दर्जा आणि त्यांच्याकडून मिळणारी डिलिव्हरी या गोष्टी डाझोच्या नियंत्रणात राहिल्या नाही आणि येथूनच घसरण चालू झाली. यावर उपाय म्हणून संस्थापकांनी सुरुवातीचे Tapcibo हे नाव बदलून डाझो (Dazo) असे नामकरण केले. कारण cibo हा अन्नपदार्थांसाठी वापरला जाणारा इटालियन शब्द नव्या ग्राहकांना समजत नव्हता. पण नाव बदलूनही घसरण थांबू शकली नाही. गेल्या वर्षी टायनी आऊल (TinyOwl) आणि झोमाटो (Zomato) यांसारख्या फूड स्टार्ट अप्सना काही अडचणी सतावू लागल्यात. म्हणजे विक्रीच्या साखळीतील तुम्ही निवडलेले पुरवठादार-विक्रेते दर्जेदार असणे आवश्यक आहे, संख्या वाढावी म्हणून कोणाचीही निवड करु नये हा धडा यातून मिळतो.

आस्क मी
इ-व्यापार हे एक कठीण कवचाचे फळ आहे. गुंतवणूकदारांचा पैसा वापरून हा खेळ खेळला जातो. अलीकडे इ-व्यापार संकेतस्थळांचा डोलारा डगमगू लागला असून त्यात मोठे नुकसान होत असल्याचे प्रसारमाध्यमांतून समोर येत आहे. ‘आस्क मी बाजार’ ही त्यातलेच  प्रातिनिधिक उदाहरणं.

गेट इट इन्फो सर्व्हिसेस’ या विविध उत्पादने विकणाऱ्या विक्रेत्यांची माहिती एकत्र करून येलो पेजेस प्रसिद्ध करणाऱ्या कंपनीने २००६ साली डिजिटल माध्यमाचा स्वीकार करून ‘आस्क मी डॉट कॉम’ची निर्मिती केली. पुढे मलेशियातील ‘अॅस्ट्रो एन्टरटेन्मेंट नेटवर्क ली.’ (एईएनएल) या कंपनीने ९७ टक्के हिस्सा घेत ‘गेट इट’ विकत घेतली व इ-व्यापारातील तेजी हेरून ‘आस्क मी बाजार डॉट कॉम’ हे इ-व्यापार संकेतस्थळ सुरु केले. कंपन्या, व्यापारी आणि ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने कंपनीने ‘आस्क मी ग्रोसरी’, ‘आस्क मी फर्निचर’ अशी उपसंकेतस्थळेही सुरु केली. गेल्या जुलैपर्यंत कंपनीचे काम व्यवस्थित सुरु होते. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला  एईएनएल या कंपनीने ‘आस्क मी’ मधील गुंतवणूक काढून घेतल्याने कंपनी प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहे.

लुमोस

हे लोखंडी सामानाचे स्टार्ट अप आपण आधी पाहिलेल्या स्टार्ट अपपेक्षा वेगळे आहे. त्याचे संस्थापक आपले काय चुकले,  आणि इतर त्याच्या चुकांपासून काय शिकू शिकतात याची मनमोकळी चर्चा करतात. २०१४ मध्ये लुमोसची (Lumos) स्थापना झाली. संस्थापकांना असे स्मार्ट स्विचेस तयार करायचे होते की, ज्यामुळे घरातील सर्व विद्युत उपकरणे स्वयंचलित होतील. या स्विचेसच्या आतील बाजूस वस्तुमान मोजणारे असे सेन्सॉर्स असतील की जे सभोवतालची परिस्थिती आणि मनुष्याची उपस्थिती यांचा मागोवा घेऊन स्वयंचलिततेचा अचूक निर्णय घेतील.  आलेल्या अपयशाबद्दल कंपनीचे सहसंस्थापक यश कोटक म्हणतात, ‘‘सर्वात मुख्य म्हणजे आम्ही यातील तज्ज्ञ नव्हतो. म्हणजे उत्पादनाचा अपेक्षित वापर करणारे नव्हतो; उत्पादन विकसित करण्यापूर्वी आमचा त्या विषयाचा व्यासंग नव्हता; किंमतीच्या बाबतीत आम्ही पक्षपाती राहिल्याने आधाराबद्द्लच्या आमच्या निर्णयावर त्याचा परिणाम झाला; आणि हार्डवेअर-लोखंडी सामानाला आम्ही कमी लेखले.’’ 

चुका होणार म्हणून आपण काही करूच नये हे साफ चुकीच नव्हे तर दुर्दैवी पाऊलं ठरेल.  खर तर यशस्वी स्टार्ट अप्स देखील अंतर्मुख होऊन इतरांच्या चुकांचे विश्लेषण केले तर मोठ यश फार लांब नाही. कारण अजूनही दुसरे गुगल, अॅपल अथवा ट्विटर निर्माण व्हायचे आहे.  

नितीन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर
संस्थापक, मॅक्सेल फाऊंडेशन

No comments: