Saturday, October 15, 2016

कलेतील लखलखते नावीन्य!

Image result for innovative diwali chocolates & greetings cardsमहाराष्ट्र टाईम्स १५ ऑक्टोबर २०१६:  नव-उद्योजकांची नव-नविन मोबाईल अ‍ॅप बनवण्याची धडपड म्हणजे स्टार्टअप असा आपला समज असेल तर पूर्णपणे चुकीचा आहे. आज कुणालाही जे जे मनापासून करावंसं वाटतं ते त्यानां सुदैवाने टेक्नॉलॉजी द्द्वारे जगभर पोहोचवता येत हेच स्टार्टअप्सच्या यशा मागचं खर गुपित आहे.  गरज आहे एक चांगल्या कल्पनेची! एका नवीन उर्जेची !! आणि दिवाळी म्हटल की परंपरा, उर्जेचा व नवतेचा सुरेख संगम.  रांगोळी, मातीच्या पणत्या, फराळ, फटाकेआकाशकंदील, सुंदर भेटकार्ड आणि सुकामेव्याची जागा घेत असलेली चॉकलेटस आणि भेट वस्तूंचे आकर्षक पॅकिंगची रेलचेल. या क्षेत्रात काम करणार्या उच्चशिक्षित मुलींचा कल्पक सहभाग त्यावर दिवाळीच्या निमित्ताने एक खास नजर.

हौसेचे व्यवसायात रुपांतर करणारी चॉकलेट गर्ल

सध्या चॉकलेट तयार करण्याचा गोड उद्योग तरुण गृहिणींसाठी चांगलाच लाभदायक ठरतो आहे. ३३ वर्षीय रश्मी वासवानी या उद्योजिकेच्या बाबतीत असंच झालंय. तिने हौस म्हणून हा उद्योग सुरु केला आणि अवघ्या सात वर्षात तिचा रेज चॉकलेटीअरहा उद्योग चांगलाच बहरला.

नवी दिल्ली येथील आयएमआयमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारी रश्मी जेव्हा सुट्टीत बेंगळूरूला घरी यायची तेव्हा ती चॉकलेट तयार करण्याची मौज लुटायची. चॉकलेट आवडीने खाणारे तिचे वडिल हे तिचे नेहमीचे गिऱ्हाईकअसायचे. त्यांना आनंदी ठेवण्यासाठी ती विविध प्रकारची चॉकलेटस बनवायची. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला लगेचच एका वित्त सल्लागार कंपनीत नोकरी मिळाली. पण या  नोकरीत ती तीन महिन्यांपेक्षा जास्त रमली नाही. त्याऐवजी तिने चॉकलेट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

दिवाळीच्या सुमारास एखाद्या प्रदर्शनात ती छोटासा स्टॉल लावायची. लोकांना तिची चॉकलेटस आवडायची. एकदा एका उद्योग समूहाने चॉकलेटचा एक बॉक्स घेतला. त्याची टेस्ट आवडल्यानंतर त्यांनी नंतर २०० बॉक्सची ऑर्डर नोंदवली. रश्मी याविषयी सांगते, ‘‘दिवाळी निमित्त मिठाई आणि सुकामेवा यांचे बॉक्सेस भेट देण्यातील तोचतोचपणा घालवण्यासाठी उद्योजकांना एक असा पदार्थ हवा होता जो ग्राहकांच्या नेहमीच्या भेटवस्तूमधील नसेल आणि जो लवकर खराब होणार नाही. चॉकलेट बॉक्स हा त्यासाठी उत्तम पर्याय होता. त्यावर काम करता करताच फॅन्सी चॉकलेटचे मिठाई बॉक्स तयार करण्याची कल्पना सुचली. विदेशी पद्धतीच्या चॉकलेट बारऐवजी ही खास सजवलेली चॉकलेटस उद्योजकांना विशेष आवडली.’’

रश्मीच्या चॉकलेट बारचे वैशिष्ट्य म्हणजे मजेशीर शब्द रचनांनी सजवलेले याचे वेष्टन. हे वेष्टन ग्राहकांना एखाद्या भेटकार्डाप्रमाणे वाटते. विविध आकार-प्रकारातील चॉकलेटस आणि त्यांची गंमतीदार वेष्टने यामुळे अल्पावधीतच रश्मीची चॉकलेट्स ग्राहकप्रिय झाली. तिचा हा व्यवसाय आता इतका नावारूपाला आलाय की बेंगळूरूमधील जो महत्वाचा व्यापारी रस्ता आहे तिथे ‘रेज चॉकलेटीअर’चे (Rage Chocolatier, वेबसाईट: http://www.ragechocolatier.com) स्वतःच्या मालकीचे छोटे दुकान आहे. आता हा व्यवसाय इतका विस्तारलाय की रश्मीचे संपूर्ण कुटुंबच यात सहभागी झालेय. ही ग्राहकप्रियता लक्षात घेऊन रश्मीच्या उद्योगाकडे कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाकडून एक वेगळा प्रस्ताव आला तो असा की, ‘एखाद्या भेटकार्डाप्रमाणे आकर्षक असलेल्या त्यांच्या चॉकलेट वेष्टनावर त्यांनी कर्नाटकमधील महत्वाच्या पर्यटन स्थळांची नोंद करावी.’  त्याप्रमाणे वेष्टन तयार केले असता आंतरराष्ट्रीय विमानतळांनीही त्याची दखल घेतली.  चॉकलेट व्यवसायाचा आगामी विस्तार करण्यासाठी विविध प्रयत्न करीत असलेल्या रश्मीने सामाजिक भानही जपले आहे. लहान मुलांची चॉकलेटची आवड लक्षात घेऊन गरीब व दारिद्र्यरेषेखालील मुलांनाही ती मिळावी यासाठी ती मैत्रिणींना घेऊन अनाथालयातील मुलांना चॉकलेट देण्यासाठी नियमितपणे जात असते.   

आर्ट विथ सुनयना

भेटकार्ड, भेटवस्तू, कागदी पिशव्या, पाकिटे, फ्रेम, कर्णफुले-कुंडले अशा वस्तू तयार करणे ही एक कला आहे. एका मदर-डे ला आईसमान असलेल्या तीन खास महिलांसाठी भेटकार्ड तयार करताना सुनयना नावाच्या २८ वर्षांच्या तरुणीने या कलेला एक वेगळे वळण देण्याचे ठरवले. मग तिने तिचे पालक, भावंडे, मित्र-मैत्रिणी अशा सर्वाना अशी नाविन्यपूर्ण भेटकार्ड, भेटवस्तू तयार करून दिल्या. दिवाळी, ख्रिसमस, न्यू इअरच्या निमित्ताने सुनयनाने एकटीने ORACLE, TISS, TSEC आणि अन्य काही महत्वाच्या कॉलेजमध्ये हाताने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले. त्याला मिळालेल्या प्रतिसादाने तिचा आत्मविश्वास दुणावलाच, शिवाय स्वतःच्या कलेबद्दलचा आदर तिच्या मनात अधिक घट्ट झाला.

एक्सएलआरआय मधून एमबीए करत असलेली सुनयना बीएमएस पदवीधर असून तिने सायकॉलॉजीत एमएस्सी केलंय. टचिंग लाइव्हजया एनजीओने मुलांसाठी कागदी वस्तूंबद्दलची एक कार्यशाळा घेतली होती. त्या कार्यशाळेतील सहभागाने सुनयनाचे पूर्ण आयुष्यच बदलून टाकले. सुनयना म्हणते, ‘‘सातवीत असताना मी चित्रकलेच्या एलिमेंटरी परीक्षेत नापास झाले होते. ही माझी कलेतील एकमेव पात्रता आहे. मला असे वाटते की, माझ्या अंतःप्रेरणेने मला पिसे, प्राणी, फुले, अमूर्त आकार असे काहीही तयार करायला शिकवले. जेव्हा मी या वस्तू जीव ओतून तयार करते तेव्हा या वस्तूंत एकप्रकारचा जिवंतपणा भासतो. माझे ज्या कलेवर प्रेम आहे मी तिचाच ध्यास घेतल्याने माझा जगण्यातला आनंद वाढला आहे.’’

सुनयनाचा ही कल्पना केवळ पोटापाण्याचा उद्योग म्हणून प्रत्यक्षात आलेली नाही. ती तिच्या भेटकार्ड, भेटवस्तूंच्या विक्रीतील २० टक्के रक्कम टचिंग लाइव्हजसारख्या ठिकाणी देते. ही अशी जागा आहे जिथे तिला मुलांचे निःस्वार्थ प्रेम मिळते. यावर सुनयना म्हणते, ‘‘हे ठिकाण मला नेहमी जमिनीवर ठेवते आणि जास्त काम करण्याचा उत्साह देते.’’

केक्सच्या दुकानांशी हातमिळवणी करून तिथे या वस्तूंची मांडणी करण्याची कल्पना सुनयनाच्या डोक्यात आहे. यामुळे ग्राहकाला त्याने निवडलेल्या केकशी मिळते जुळते भेटकार्ड, भेटवस्तू निवडण्याची मोकळीक मिळेल. केकवरचे डिझाइन आणि भेटकार्डवरचे नक्षीकाम एकमेकांशी मिळते-जुळते आहेत की नाहीत हे पाहता येईल. त्याचबरोबर भविष्यात ही रंगीबेरंगी कार्ड, भेटवस्तू यांची मांडणी आणि प्रदर्शन करण्याचे टेबल इस्पितळात असावे असेही तिच्या मनात आहे.

सुनयनाची ही कला नियोजनबद्ध पद्धतीने विकसित झालेली नसली तरी आता तिला तिचा ब्लॉग (www.artwithsunayna.wordpress.com), फेसबुक आणि सोशल मिडियाचे नेटवर्क तयार करून तिच्या कलेचा पद्धतशीर प्रचार प्रसार करायचा आहे. डिस्काऊंट पॅकेजेस तयार करून या वस्तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. शाळा, कॉलेज, एनजीओ, कारखाने यातून आर्ट विथ सुनयनाच्या कार्यशाळा भरवायच्या आहेत. तिचा असा विश्वास आहे की आर्ट विथ सुनयनाया कल्पनेने तिच्या जीवनाला एक अर्थ’, ‘उद्दिष्टमिळवून दिले आहे.  

येणारी दिवाळी नवीन कल्पना, नवीन उर्जा घेवुन येईल, प्रत्येकाच्या मनात असलेले स्टार्टअपचे नवे पर्व सुरु होईल अशी शुभेच्छा.

नितिन पोतदार, कॉर्पोरेट लॉयर

संस्थपक मॅक्सेल फाऊंडेशन

No comments: