Tuesday, January 24, 2017

प्रत्येक कॉलेजमध्ये ‘स्टार्टअप सेल’ हवाच!

 महाराष्ट्र टाईम्स २२ जानेवारी २०१७: मेक इन इंडिया’ या महत्वाकांक्षी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारी २०१६ रोजी ‘स्टार्ट-अप इंडिया, स्टॅंड-अप इंडिया’ असा नारा दिला होता. गेल्या वर्षभरात या ‘स्टार्ट अप’ मोहिमेला बळ देणाऱ्या अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. 

उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी आखलेल्या ‘स्टार्ट अप’ संकल्पनेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांना यात सामावून घेता यावे यासाठी उद्योग धोरणात बदल केले जात आहेत. त्यात उद्योगांची कुठेही अडवणूक होऊ नये यासाठी परवान्यांच्या प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल केल्या असून, स्टार्ट अप ऍक्‍शन प्लॅनमध्ये स्टार्ट अप कंपन्यांना भांडवली करातून वगळण्यात आले आहे. त्याशिवाय दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या ‘स्टार्ट अप’ या महत्वाकांक्षी मोहिमेला महाराष्ट्र सरकारनेही गेल्या वर्षभरात चांगलाच ‘बूस्ट’ दिला आहे. त्यानुसार राज्य नावीन्यता परिषदेच्या नोंदणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या परिषदेचे सहअध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात आयआयएम आणि नॅसकॉमच्या सहकार्याने इन्क्‍युबेटर सेंटर सुरू करण्यात आले आहे. अर्थात पुणे-मुंबईशिवाय नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा राज्यभरातील महत्वाच्या शहरांत ‘स्टार्ट अप्स’ योजना रुजविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत.

‘सिडबी’ने स्टार्ट अप्ससाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी २०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)ने स्टार्ट-अप कंपन्यांना शेअर बाजारांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्यक नियम आणि नियामक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आयटी उद्योजक एन. नारायण मूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील अठरा सदस्यांची पर्यायी गुंतवणूक धोरण सल्लागार समिती स्थापन केली आहे.

एकीकडे २०१२ पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात तरुण लोकसंख्येचा देश असणार आहे. तर दुसरीकडे जागतिकीकरण आणि माहिती-तंत्रज्ञान यांच्या ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत तरुणांसाठी आकर्षक संधींचे दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यात ‘कल्पनाशक्ती’ हेच मुख्य भांडवल असणार आहे.
कॉलेज लाईफ, तरुणांच्या विचारांना, कलागुणांना तसेच जगण्याला एक नवी दिशा, ऊर्जा देणारा कालखंड... स्वतःला शोधण्यास मदत करणारा, स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी आत्मविश्वास देणारा असा एक ‘हॅपनिंग’ काळ... पण प्रश्न असा निर्माण होतो की,  सध्याच्या शिक्षण पद्धती तरुणांमधील कल्पकतेला, संशोधक वृत्तीला कितीसा वाव मिळतो?  विद्यार्थ्यांना जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव देण्यात, त्याला कमावण्याच्या दृष्टीने ‘सक्षम’ बनवण्यात आपण कुठेतरी नक्कीच कमी पडत आहोत. पण एकूणच अभ्यासक्रम बदलेल तेंव्हा बदलेल, तूर्त महाविद्यालयांनी त्या बदलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे.

म. ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय, विलेपार्ले यांच्या मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त ‘टेक ऑफ’ या विषयावरील माझ्या व्याख्यानानंतर ‘स्टार्ट अप’ विषयासंदर्भातील उपस्थित तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ही बाब प्रकर्षाने जाणवली.

स्टार्ट अप’ ही सळसळत्या तरुणाईच्या कल्पक मेंदूंना दाद देणारी, नव्या कल्पनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारी आणि रोजगार निर्मितासाठी प्रेरणा देणारी एक अभिनव अशी संकल्पना आहे. आज जगभरात ‘स्टार्ट अप’ हे एक चलनी नाणे बनले आहे. असे असले तरी अनेकांना यविषयी पुरेशी माहिती नाही.  काय कराव? कशी सुरुवात करावी? याची कसलीच कल्पना तरुणांना नाही.

बदलती जागतिक परिस्थिती तसेच मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्कील इंडिया आणि डिजिटल इंडिया यांसारख्या महत्वाकांक्षी उपक्रमांमुळे आज तरुणांसमोर प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणाला जगाशी ‘कनेक्ट’ करायचे असेल, महत्वाचं म्हणजे 'कल्पनाशक्तीच्या जोरावर मी काहीतरी निर्माण करू शकतो' अशी मानसिकता त्याच्यात निर्माण करायची असेल तर महाविद्यालयात तरुणांमध्ये उद्योजकता विकासासाठी जाणीवपूर्वक ‘प्रोग्रेसिव्ह’ प्रयत्न करायला हवेत. त्यादृष्टीने ‘स्टार्ट अप सेल’ हा अभिनव उपक्रम प्रत्येक महाविद्यालयाने सुरु करायला हवा असा विचार मी मांडला.  इनोव्हेशन्सच्या बळावर आपली ‘स्वतंत्र’ ओळख निर्माण करू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही बाब नवी प्रेरणा, नवी दृष्टी देणारी ठरू शकते. शिवाय 'स्टार्ट अप' ही नवसंकल्पना समजून घेण्यास ती मोठाच हातभार लावू शकते.

सर्वसधारणपणे ‘स्टार्ट अप’ म्हणजे कुठल्याही क्षेत्रात कसलाही अनुभव नसताना केवळ क्ल्पकतेच्या भांडवलावर सुरु केलेला उद्योग-व्यवसाय. उदा: फ्लिपकार्टला, फेसबुक, अमेझॉन, इमेज बझार. इंटरनेटच्या माध्यमातून या स्टार्ट अप्सने अल्पावधीत घराघरात प्रवेश केलाय. आज जगभरातून अशा ‘स्टार्ट अप्स’ना सरकारी, मुख्य म्हणजे समाजाकडुन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळतं आहे. 'नॅसकॉम'च्या अहवालानुसार सध्या देशात ३१०० स्टार्ट अप्स आहेत आणि २०२० मध्ये ही संख्या ११,५०० होईल. त्यातून देशभरात  २५०००० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यावरून स्टार्ट अप विश्वाच्या उज्ज्वल  भविष्याची कल्पना यावी.

काही वर्षांपूर्वीपर्यंत एखादा उद्योग किंवा व्यवसाय सुरु करायचा तर भांडवल आणि जागा या गोष्टी ‘मस्ट’ असायच्या. स्टार्ट अपसाठी या बाबी तितक्या महत्वाच्या नाहीत. कारण ‘ई-कॉमर्स’मुळे आता ‘Idea’ हे मुख्य भांडवल बनले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कल्पकता, नाविन्यपूर्ण विचार करण्याचे कौशल्य आहे त्यांना भरपूर संधी उपलब्ध आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तर त्यात उत्तुंग भरारी घेता येऊ शकते.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेकडे ‘लँड ऑफ अपॉर्च्युनिटी’ म्हणून पहिले जायचे. परंतु आता भारत आणि चीन हे देशही याबाबतीत आघाडीवर आले आहेत.  उद्योजक’ हा अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या घटक असून उद्योजकतेच्या धाडसातून नवीन संपत्ती निर्माण होते. नवीन उत्पादने, नवे तंत्रज्ञान यांना वाव मिळून नवी बाजारपेठ विकसित होते. नवे रोजगार निर्माण होतात. प्रगत देशात यापद्धतीने तरुणांची मानसिकता ‘घडवली’ जाते. आपल्याकडे मात्र शालेय वयापासूनच ‘उत्तम नोकरी’ हे ध्येय दाखवले जाते. खरतरं भारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशात शालेय शिक्षणात  ‘उद्योजकता’ या विषयाचा समावेश होत नाही तोपर्यंत मुलांना नोकरी करणे याऐवजी रोजगार निर्मिती करणे चांगले हे कळणार नाही.  कमावते होण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांना घडवताना जोखीम पत्करून उद्योग काढणे याला एक मूल्य मानले पाहिजे. तसेच अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विद्यार्थीदशेपासूनच मनावर बिंबवले गेले पाहिजे.

शाळा- महाविद्यालयांपासून हे बीज मुलांच्या मनात पेरायचे असेल तर ‘स्टार्ट अप सेल’ हा एक उत्तम उपक्रम आहे असे मला वाटते. या सेलच्या माध्यमातून उद्योजकता परिसंवाद/कार्यशाळाचे आयोजन, इनोव्हेशन्सवर आधारित जत्रा-मेळा,  यशस्वी उद्योजकांचा टॉक शो, बिझनेससंबंधी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल तसेच बिझनेस बुक फेअर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करता येऊ शकेल. यामुळे तरुणांमधील उद्योजकता विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होईलच, शिवाय नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांद्वारे विद्यार्थी आणि तरुणांना मार्गदर्शन करणे, नवसंकल्पनांचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत करणे आणि त्यातून देशाच्या आर्थिक विकासाला गती देणे यांसारखे उद्देश साध्य करता येऊ शकतील. जेव्हा तरुणांच्या डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची उत्तुंग स्वप्ने तरळत असतात तेव्हाच त्या मनाच्या कोर्‍या पाटीवर उद्योजकतेचे धडे त्याला देणे हे सर्वात जास्त परिणामकारक ठरू शकते.

आज जगभर स्टार्ट अपसारख्या संकल्पनेचा पुरस्कार होत असताना भारतात मात्र ७५ टक्के इंजिनिअर आणि ९५ टक्के पदवीधर तरुण शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत असे म्यॅकेन्झी  कंपनीचा अहवाल सांगतो. याच अहवालात शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि जागतिक दर्जाच्या कुशल व्यक्ती घडवणे, सक्षम कामगारवर्ग निर्माण करणे याचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. येणारा काळ हा स्टार्ट अप उद्योजकांचाच असणार आहे. त्यामुळे आता नुसत्या बघ्याच्या भूमिकेतून याकडे न पाहता प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे झाले आहे.

आजच्या तरुण पिढीला सृजनशील उत्पादनक्षम मालमत्ता तयार करण्याचे धडे देण्याची हीच वेळ आहे. यात अनेक आव्हाने आहेत हे खरेच. तसेच उद्योजकीय शिक्षणामुळे सगळेच तरुण उद्योजक होणार नाहीत हेही खरं असलं तरी, या शिक्षणामुळे नव्या पिढीची काही बाबतीतील समज नक्कीच वाढीस लागेल. डिझाईन थिंकींगचे मोल, बहुकौशल्यता आणि एकाचवेळी अनेक कामे करणे, एकत्रितपणे कामे करणे, सर्वांनी मिळून काही निर्माण करण्याची क्षमता आणि एकमेकांच्या सांस्कृतिक जाणिवा जपणे यांसारख्या महत्वाच्या गोष्टींबरोबर त्यांचा परिचय होईल. 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करण्याची त्यांना सवय लागेल. नेहमीच्या पठडीत नसलेल्या गुणवत्तेचा आदर केला जाईल. या सगळ्या जाणीव जागृतीमुळे सामाजिक न्यायावर आधारित देशाची आर्थिक समृध्दीकडे वाटचाल होण्यात नक्कीच मदत होईल.

स्टार्ट अप‘साठी आपल्या देशात सुवर्णसंधीच आहे. अत्यंत कमी वेळात एखादा उद्योजक मोठा होऊ शकतो. एंजल फंड, सिड फंड, व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी, आयपीओ हा त्याचा मार्ग आहे. वेगवेगळे व्हीसी फंड आहेत. ते ठरवलेल्या उद्योगातच, तितकेच पैसे लावतात. त्यात कंपन्या उद्योग, वैयक्तिक, आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणुकीस आतुर आहेत. ‘स्टार्ट अप‘ला जेवढी गुंतवणूकदारांची गरज आहे, तेवढीच गरज त्यांना चांगल्या ‘स्टार्ट अप‘ची आहे. हे फंड व्याजाने पैसे देत नाहीत, तर भागभांडवल घेतात. म्हणूनच तर कित्येक तरुण मंडळी गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांकडे पाठ फिरवत ‘स्टार्ट अप‘कडे आकर्षित होऊ लागली आहेत.

थोडक्यात आजच्या तरुणांनाही बदल हवा आहे. त्यांच्यात बदलाची ताकद आहे. म्हणूनच या ‘एनर्जेटिक यंग इंडिया’ला दिशा आणि प्रोत्साहन देण्यासाठी तरी महाविद्यालयांनी आता आपल्या कोशातून बाहेर पडायला हवे आणि उद्योजकतेचा परीघ विस्तारणाऱ्या ‘स्टार्ट अप सेल’सारख्या उपक्रमाचे स्वागत करायला हवे. 


नितीन पोतदार, कोर्पोरेट लॉयर
nitinpotdar@yahoo.com

Saturday, December 24, 2016

असा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..

Image result for startup for societyमहाराष्ट्र टाईम्स २४ डिसेंबर २०१६: उद्योजकतेची परिभाषा बदलणाऱ्या ‘स्टार्ट अप’ विश्वाचे विविध पैलू मी गेले वर्षभर आपल्यासमोर उलगडण्याच्या प्रयत्न केला. या सदराचा समारोप करताना एक महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर मांडावासा वाटतो, तो म्हणजे, मुळात स्टार्ट अपच्या कल्पनेची सुरुवात नेमकी कशी,  कुठून,  कोणत्या विचारातून होते?  प्रत्येक स्टार्टअपचा नीट अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की,  कुणी स्वतःच्या वैयक्तिक अडचणीतून,  कुणी सामाजिक गरजेतून किंवा समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून स्टार्टअपची सुरुवात केलेली दिसते.  स्टर्टअपमध्ये ज्या तरूणांनी यश मिळवलंय त्यांच्या प्रयत्नांच्या प्रवासाचा नीट अभ्यास केला, तर त्यातून शिकण्यासारखं खूप आहे. या भागात अशाच काही हटके स्टार्ट अपच्या आरंभाचे मूळ शोधण्याचा आज प्रयत्न करुया.

Saturday, December 10, 2016

सौरउर्जा प्रगतीचा महामार्ग!


महाराष्ट्र टाईम्स १० डिसेंबर २०१६: पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यातील दरेवाडी हे गाव, गेली ५०-६० वर्षे रॉकेलच्या दिव्यांवरच जगत होते. या गावात ग्राम ऊर्जा सोल्यूशन्स प्रा. लि. या सौरऊर्जा क्षेत्रातील अनोख्या स्टार्टअपने २०१२ साली कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, गावकऱ्यांच्या एकमताने, उच्च तंत्रज्ञानाची साथ घेऊन सोलर मायक्रो ग्रीड प्रकल्प यशस्वी करून दाखवला आणि संपूर्ण गाव सौरऊर्जाने उजळून निघालं. यात गावातील ३९ घरे, शेतीचे पंप, रस्त्यावरचे दिवे, गिरणी, कम्प्यूटर यांना पुरेल अशी ९.४ किलोवॅट पीक वीज निर्माण करणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली. यासाठी आलेला ३० लाख रुपये खर्च जर्मनीच्या बॉश कंपनीने केला. ग्रामस्थांनी स्थापन केलेली समिती आता दरमहा विजेचे शुल्क गोळा करते व समितीच्या बँक खात्यात जमा करते. त्याचा वापर प्रकल्प चालवण्यासाठी व दुरुस्तीसाठी केला जातो. अशाच प्रकारचा प्रकल्प कर्नाटक राज्यातील २३ घरांच्या विरल गावात करण्यात आलाय. सौर उपकरणांच्या हाताळणी व तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी गावातील तरुणांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

Saturday, November 26, 2016

नोटाबंदी एक नवी संधी ..

Image result for mobile wallet paymentमहाराष्ट्र टाईम्स २६ नोव्हेंबर २०१६: पेटिएम करोया टीव्हीवरील छोटश्या जाहिरातीचा खरा ‘अर्थ’ पाचशे-हजाराच्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना आता पर्यंत चांगलाच समजला असेल.  ‘मोबाईल-वॉलेट-सर्व्हिस’या बाजारपेठेत जगभर यश संपादन केलेली पेटीएम ही एक आघाडीची कंपनीची आहे. याची सुरवात कुणी व कशी केली हे मराठी तरुणांसाठी बघणं फार महत्वाच आहे म्हणून हा आजचा लेख.

पेटीएम या स्टार्ट अपचे संस्थापक विजय शर्मा, मुळचे उत्तर प्रदेशातील अलिगढचे.  शाळेतील ते एक हुशार विद्यार्थी. पुढे इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ते दिल्लीला आले.  इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रे, नियतकालिके यांचे वाचन सुरु केले. महिना दहा हजार रुपयांची नोकरी सोडून आयटी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मोबाईलच्या माध्यमातून विविध प्रकारचे बिले भागवणे या त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेने बॅंकिंग क्षेत्राचे संपूर्ण चित्रच पालटून गेले. 

Wednesday, November 23, 2016

फोर इडियट्स !

महाराष्ट्र टाईम्स १२ नोव्हेंबर २०१६: रुपेश शेनॉय आणि विनायक पालनकर हे दोन तरुण २०११ मध्ये प्रथम एकमेकांना भेटले. शाळांसाठी इआरपी सोल्युशन तयार करणाऱ्या ‘वॅगसन्स’ या स्टार्ट अपसाठी ते हैद्राबादच्या शाळाशाळांमधून फिरले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांचे काम शिक्षणाच्या मुख्य समस्येला भिडणारे नाही.  पुढे आयएसबीमध्ये एमबीए करणाऱ्या अभिषेकला विनायकने,  तर २०१३च्या उत्तरार्धात अमेझॉनचा माजी कोड गुरु दीप शहा याला रूपेशने आपल्या मोहिमेत सामील करून घेतले. सुरुवातीला त्यांनी मार्केटमधील विविध खेळांचे विश्लेषण करायला सुरुवात केली. त्यांच्या मते आजची जगभरातील शिक्षणपध्दती अनेक प्रकारे विस्कळीत अशी आहे. त्यांच्या मते विषयाचा योग्य आशय कोणता, तो कसा मिळणार  आणि  त्याचा स्रोत काय  याबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले आहेत. फक्त परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असल्याने त्यांच्या विषयातील कच्चेपणाची वेळीच दखल घेतली जात नाही. तसेच हल्ली पालकांकडे आपल्या पाल्यांसाठी पुरेसा वेळ नसतो.

Monday, October 31, 2016

ब्युटीफुल सेकंड इनिंग

Image result for senior citizens innings
महाराष्ट्र टाईम्स २९ ऑक्टोबर २०१६: लॅपटॉप, स्मार्ट फोन, सोशल मिडिया हे तरुणांनी वापरायचे गॅझेट असे म्हणण्याचा जमाना आता गेला. उलट ज्येष्ठ नागरिक असलेल्या आजी-आजोबांची ती आता जास्त गरज बनली आहे. ‘वृद्धत्व हे त्रासदायक न होता जास्तीत जास्त सुखद व्हावे यासाठी प्रयत्न करणारा बेंगळूरचा ‘ब्युटीफुल अर्स’ (www.beautifulyears.com) ह्या स्टार्टअपने या एकटेपणावर उपाय शोधला आहे.

Saturday, October 15, 2016

कलेतील लखलखते नावीन्य!

Image result for innovative diwali chocolates & greetings cardsमहाराष्ट्र टाईम्स १५ ऑक्टोबर २०१६:  नव-उद्योजकांची नव-नविन मोबाईल अ‍ॅप बनवण्याची धडपड म्हणजे स्टार्टअप असा आपला समज असेल तर पूर्णपणे चुकीचा आहे. आज कुणालाही जे जे मनापासून करावंसं वाटतं ते त्यानां सुदैवाने टेक्नॉलॉजी द्द्वारे जगभर पोहोचवता येत हेच स्टार्टअप्सच्या यशा मागचं खर गुपित आहे.  गरज आहे एक चांगल्या कल्पनेची! एका नवीन उर्जेची !! आणि दिवाळी म्हटल की परंपरा, उर्जेचा व नवतेचा सुरेख संगम.  रांगोळी, मातीच्या पणत्या, फराळ, फटाकेआकाशकंदील, सुंदर भेटकार्ड आणि सुकामेव्याची जागा घेत असलेली चॉकलेटस आणि भेट वस्तूंचे आकर्षक पॅकिंगची रेलचेल. या क्षेत्रात काम करणार्या उच्चशिक्षित मुलींचा कल्पक सहभाग त्यावर दिवाळीच्या निमित्ताने एक खास नजर.

हौसेचे व्यवसायात रुपांतर करणारी चॉकलेट गर्ल

सध्या चॉकलेट तयार करण्याचा गोड उद्योग तरुण गृहिणींसाठी चांगलाच लाभदायक ठरतो आहे. ३३ वर्षीय रश्मी वासवानी या उद्योजिकेच्या बाबतीत असंच झालंय. तिने हौस म्हणून हा उद्योग सुरु केला आणि अवघ्या सात वर्षात तिचा रेज चॉकलेटीअरहा उद्योग चांगलाच बहरला.

Saturday, October 1, 2016

शाळाबाह्य मुलांचा ‘आधार’

Image result for innovative education methods in indiaमहाराष्ट्र टाईम्स १ ऑक्टोबर २०१६ देशाच्या हजारो मुलांच्या घरात दोनवेळच्या जेवणाचीच भ्रांत असताना त्यांचे पालक मुलांच्या शिक्षणावर पैसे कसे खर्च करणार? सरकारी किंवा महानगर पालिकांच्या शाळांमध्ये कसेबसे शिक्षण घेणारी मुलांनी कुठल्याही परिस्थितीत मधूनच शिक्षण सोडू नये म्हणून कित्येक सेवाभावी संस्था व व्यक्ती काम करतात, मॅथ्यू स्पॅसी त्यापैकी एक. ते खरेतर कॉर्पोरेटक्षेत्रातले. इंग्लंडमध्ये बड्या कंपनीत ते उच्चपदावर काम करत होते. त्यांची कर्तबगारी लक्षात घेऊन भारतातील ‘कॉक्स-अँड-किंग्स’ कंपनीने त्यांना सीईओ म्हणून नेमले. मॅथ्यू स्पॅसी भारतात आले आणि कालांतराने एक वळण घेऊन त्यांनी गरीब मुलांचे शिक्षण सुटू नये यासाठी १९९९ मध्ये “मॅजिक स्कूल”ची (www.magicbus.org) स्थापना केली.

Monday, September 5, 2016

अपयशावर बोलू काही !

Image result for unsuccessful startups in india
महाराष्ट्र टाईम्स ३ सप्टेंबर २०१६ : गेल्या काही वर्षात 'स्टार्टअप' हा जगभरात एक चलनीनाण्याप्रमाणे परवलीचा शब्द झालेला आहे हे मी माझ्या पहिल्या लेखात म्हटलं होतं आणि तशा काही यशकथा आपण गेली आठ महिने बघत आलो.  यशकथा या नेहमीच प्रेरक असतात, परंतु विविध अभ्यास-पाहणींमधून असे दिसून आले आहे की, नव्याने सुरु होणाऱ्या स्टार्ट अपपैकी २० टक्के घवघवीत यश मिळवून मानाने जगतात, तर ८० टक्के पहिल्या तीन वर्षातच मान टाकतात.
 

Wednesday, August 24, 2016

गतिमान ऑलम्पिक – गतिमान स्टार्ट-अप्स ..

Image result for rio olympic 2016महाराष्ट्र टाईम्स २० ऑगस्त २०१६ :  १८९६ साली अथेन्स येथे आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक खेळांची सुरुवात अधिक वेगवान, अधिक उंच आणि अधिक सामर्थ्यशालीया ब्रीदवाक्याने झाली. क्रीडा स्पर्धांचा महाकुंभम्हणून ओळखले जाणारे ऑलम्पिक जगभरातील खेळाडू आणि त्यांचे चाहते यांचा श्वासआहे. इथं प्रत्येक खेळाडूच विश्व काही मिनिटांनी नव्हे तर काही मिली-सेकंदानी बदलून जातं. म्हणून गतिमानता हा ऑलम्पिक स्पर्धेचा खरा श्वास आहे असं म्हटलं तर मुळीच चुकीच होणार नाही. मग अशा स्पर्धेत आजचे गतिमान स्टार्टअप्स तरी मागे कसे राहणार?